सुनंद सारथ्याला बोधिसत्वाचे भाषण ऐकून अत्यंत आनंद झाला. तो म्हणाला “तुझी वाणी इतकी गोड असतां तूं आपल्या आईबापांशी एक शब्द देखील का बोलला नाहीस?”

बोधिसत्व म्हणाला “हे सारथी, माझे सांधे धरले होते म्हणून मी लंगडा झालों नाहीं! माझें कर्णेंद्रिय नष्ट झालें होते म्हणून मी बहिरा झालों नाही! मला पडजीभ नव्हती म्हणून मी मुका झालों नाही! परंतु पूर्वजन्मामध्यें मी एका देशाचा राजा होऊन वीस वर्षे राज्य केलें, व त्यामुळे ऐंशी हजार वर्षें नरकांत पडलो! या गोष्टींची आठवण होऊन मला मागेपुढें राज्यपद देतील या भीतीनें मी लुला नसतांच लुला झालो, बहिरा नसताच बहिरा झालो, आणि मुका नसताच मुका झालो! आता माझ्या पित्यानें आपल्या खुषीनेंच मला वनात टाकून दिलें आहें. आतां मी येथें तपश्चर्या करून सुखानें कलक्रमणा करीन!”

सारथी म्हणाला, “हे रात्रपुत्र! तूं धन्य आहेस! तुझ्यासारखा थोर सत्पुरुष मी जन्मांत पाहिला नाही. तुझ्या दृढनिश्चयाची कमाल आहे! तुझ्या सहवासांत काल घालविणें यासारखी दुसरी कोणतीहि गोष्ट मला प्रिय वाटत नाही. तेव्हां तापसवेष स्वीकारून तुझा शिष्य होण्याची मला परवानगी दे!”

बोधिसत्व म्हणाला, “जर तुला येथें रहावयाचें असेल, तर हा रथ परत करून राजाच्या ऋणांतून मुक्त होईन ये.”
सारथी म्हणाला “मी तुझ्या वचनाप्रमाणें वागण्यास तयार आहे. परंतु मी परत येईपर्यंत तूं येथेंच राहिलें पाहिजेंस.”
बोधिसत्वानें तेथें राहण्याचें कबूल केल्यावर सारथी वाराणसीला गेला. तेथे त्याला प्रथमत: चंदादेवीने पाहिले. ती म्हणाली “हे सारथी! माझ्या मुलाची वाट तू काय केलीस? तो खडड्यांत घातला असता ओरडला नाही काय? हातपाय हालवून आपणाला गाडू नको अशी त्यानें खूण केली नाही काय!” हे शब्द उच्चारीत असतां चंदादेवीचा कंठ दाटून आला, आणि तिच्या डोळयावाटें एकसारख्या अश्रुधारा वाहू लागल्या.

सारथी म्हणाला “देवी! तुझा मुलगा बहिरा, लुला किंवा मुका नाही! केवळ आपणाला राज्यावर बसवितील या भीतीनें त्यानें हे व्रत स्वीकारले होते.”

नंतर वनामध्ये घडलेला सर्व प्रकार त्यानें राजाला आणि राणीला निवेदन केला. राजानें ताबडतोब आपला रथ सज्ज करविला व चंदादेवीसहवर्तमान मोठ्या लवाजम्यानिशी सुनंद सारथ्यानें दाखविलेल्या मार्गानें तो तेमिय होता तेथें गेला.

आपल्या पित्याला पाहून बौधिसत्व त्याला सामोरा गेला, आणि म्हणाला “हे तात, आपलें आरोग्य चांगले आहेना? आपली सर्व राज्यव्यवस्था नीट चालली आहेना?”

काशीराजा म्हणाला “आमचें सर्व काही ठीक चाललें आहे.”

बोधिसत्व म्हणाला “आपल्या आगमनानें मला फार आनंद झाला आहे!”

याप्रमाणें बोधिसत्वानें पित्याचें स्वागत केयावर राजा म्हणाला “मुला, तूं दृढनिश्चयाची कमाल केली आहेस? आतां तूं पुन: राजपद स्वीकार. वनामध्यें तपश्चर्या करण्याचा हा माझा काल आहे, तुझा नव्हे. तूं तरुण आहेस. तेव्हा राजभार सहन करण्यास तूं सर्वथैव समर्थ आहेत.”

बोधिसत्व म्हणाला “महाराज, पण मला जरी सर्व राजसंपत्ति दिली, तरी पुढे येणार्‍या भयप्रद जरामरणापासून माझा बचाव करूं शकाल काय? या नश्वर तारुण्यावर विश्वास ठेवून चैनीमध्ये दिवस घालविण्यास कोणता शहाणा तयार होईल?”

राजानें आणि चंदादेवीने आपल्या मुलाला माघारें नेण्यासाठी आपली शिकस्त केली, परंतु बोधिसत्वाचा दृढ निश्चय तिळमात्र ढळला नाही. त्यानें तेथें बांधिलेल्या पर्णकुटीमध्यें वास करून सर्व जन्म योगाभ्यासांत घालविला.

याप्रमाणें बोधिसत्वानें आपला निश्चय ढळू न देता अधिष्ठान पारंमितेचा अभ्यास केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel