[८]
सुतसोमजातक

आमचा बोधिसत्व एके समयीं कुरुदेशांत इंद्रप्रस्थ नगरीमध्ये कौरव्य नांवाच्या राजाच्या पट्टराणीच्या पोटी जन्मास आला. त्याचें नांव सुतसोम असे ठेवण्यांत आलें. तो वयांत आल्यावर कौरव्यराजानें त्याला तक्षशिला नगरीमध्ये शास्त्राध्यसनासाठी पाठविले.

त्याच वेळी काशीच्या राजाचा मुलगा ब्रह्मदत्त विद्याभ्यासासाठी तक्षशिलेला जाण्यास निघाला होता. मार्गामध्ये या दोघा राजकुमारांची एका धर्मशाळेंत गांठ पडली. परस्परांची परस्परांशी ओळख झाल्यावर त्या उभयतांचे सख्य जमलें. तक्षशिलेपर्यंत त्यांनी एकत्र प्रवास केला, व पुढें ते एकाच आचार्यगृही विद्याभ्यासासाठी राहिले.

बोधिसत्वाचा आचार्य अत्यंत प्रसिद्ध असल्यामुळे त्याच्यापाशी आणखीहि पुष्कळ राजकुमार विद्याभ्यासासाठी रहात असत. सुतसोमाने अल्पावकाशांतच त्या सर्वांमध्ये पहिले स्थान मिळविलें. आचार्याने त्याचे प्रावीण्य पाहून त्याला आपला साहाय्यकारी केलें. बोधिसत्व आपल्या सहाध्यायांना मोठ्या कळकळीनें शिकवीत असे. तथापि त्या सर्वांमध्ये ब्रह्मदत्तावर त्याचें विशेष प्रेम होते.

सुतसोमानें अभ्यास पुरा झाल्यावर गुरुदक्षिणा देऊन पितृगृही जाण्यास आचार्यांचा निरोप घेतला. त्याच्याबरोबर इतर राजकुमारांनीहि आचार्यांची योग्य बोळवण करून त्याची आज्ञा घेतली. ते सर्व बोधिसत्वाबरोबरच गुरुगृह सोडून निघालें. बोधिसत्वावर त्यांचे फार प्रेम होते. ते त्याला आचार्यांप्रमाणेंच मानीत असत. त्याला सोडून जात असतां त्यांना फार वाईट वाटले. ते म्हणाले, “सुतसोम! तूं जरी आमच्यापैकीच एकजण आहेस, तरी तुझ्या बुद्धिमत्तेमुळें आणि सद्गुणांमुळें तू आम्हाला गुरूसारखा पूज्य आहेस. तेव्हा तुझ्या उपकृतीतून मुक्त होण्यासाठी आम्ही तुला कांही तरी गुरुदक्षिणा देणे योग्य आहे.”

सुतसोम म्हणाला “गडे, हो मी काहीं गरीब ब्राह्मण नाही. येथून गेल्यावर माझा पिता मला युवराज करणार आहे. अर्थात संपत्तीच्या बाबतीत कोणत्याहि प्रकारें मला कमतरता रहाणार नाही. परंतु माझ्या स्मरणासाठी तुम्ही जर कांही देत असाल, तर मी तुमच्यापाशी एकच गोष्ट मागतों.”

ते सर्व राजकुमार एकदम म्हणालें “अवश्यमेव माग! आमच्या हातून घडण्यासारखी सेवा करण्याला आम्ही तयार आहो.”

बोधिसत्व म्हणाला “तुम्ही आपापल्या राज्यांत गेल्यावर माझी आठवण ठेवण्यासाठी उपोसथव्रत *(*दोन्ही अष्टमी, पौर्णिमा व कृष्णचतुर्दशी या चार दिवसांला उपोसथ दिन असे म्हणतात. या दिवशी जे पुरुष आणि ज्या स्त्रिया धर्मचिंतनात काल घालवतात, त्यांना अनुक्रमें उपासक आणि उपासिका असें म्हणतात. उपासकांना आणि उपासिकांना या दिवशी पाळण्यासाठी बुद्धांनी आठ नियम घालून दिले आहेत ते येणेप्रमाणे:-- १ प्राणघात न करणे; २ चोरी न करणे; ३ अब्रह्मचर्य न करणे (ब्रह्मचारी राहणे); ४ खोटे न बोलणे; ५ मद्यादि मादक पदार्थांचे सेवन न करणें; ६ माध्यान्हानंतर न जेवणे; ७ मनोविकार उद्दीपित करणार्‍या नृत्यगीतादि गोष्टी न पाहणे व गंधमसल्यादि (विलासाचे) पदार्थ धारण न करणे; ८ उंच आणि मोठ्या बिछान्यावर न निजणे.

हे आठ नियम पूर्वीच्या बुद्धांच्या काळीहि प्रचारांत होते, असे बौद्ध लोक मानितात.) पालन करा.”

राजकुमारांनी हे व्रत पाळण्याचें कबूल केले व बोधिसत्वाचा निरोप घेऊन ते आपापल्या राज्यांत गेले.

ब्रह्मदत्तकुमाराला त्याच्या पित्याच्या मरणानंतर राज्यपद मिळालें. तथापि बोधिसत्वाला दिलेल्या वचनाप्रमाणें तो उपोसथव्रत पाळीत असे. उपोसथाच्या दिवशी आपल्या राजधानीमध्ये कोणत्याहि प्राण्याचा वध करू नयें, असा हुकूम त्यानें केला होता. परंतु राजवाड्यांतील सुखांत गढून गेल्यामुळे गुरूगृही जडलेला साधेपणा ब्रह्मदत्ताच्या अंगी राहिला नाही. त्याला हळूहळू मांसभक्षणाची इतकी चटक लागली, की, उपोसथाच्या दिवशीदेखील त्याला मांसावाचून अन्न चालेना!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel