सिद्धार्थाच्या आज्ञेप्रमाणें छन्नानें तेथूनच रथ माघारा फिरविला. पण राजाला हें वर्तमान समजलें तेव्हा त्याचें मन अत्यंत उद्विग्न झालें.

कांही दिवसांनी सिद्धार्थ पुन: फिरावयाला निघाला. तेव्हा त्याला वाटेंत एक प्रेत दिसलें. तें पाहून तो आपल्या सारथ्याला म्हणाला “छन्न, या माणसाला येथे कां निजविलें आहे? आणि हे इतके लोक येथें जमून ही एक प्रकारची शिबिका कां तयार करीत आहेत?”

छन्न म्हणाला “हे आर्यपुत्र! हा मनुष्य गतप्राण झाला आहे! आतां हे लोक याला या यानांत घालून श्मशानांत नेऊन गाडून किंवा जाळून टाकतील. तुम्हा आम्हांला कधीना कधीं ही अवस्था प्राप्त होणारच आहे! या युगामध्ये मनुष्याचें आयुष्य फार झालें तर शंभर वर्षें आहे; पण सर्व मनुष्यें शंभर वर्षे जगतातच असें नाही. अनेक आधिव्याधींनी खंगून जाऊन पुष्कळ माणसें पन्नाससाठीच्या आंतच मृत्युमुखी पडतात!”

सिद्धार्थ म्हणाला “छन्न येथूनच माघारें जाऊं. मला उद्यानक्रीडेंची हौस राहिली नाही!”

सिद्धार्थ मागें फिरला, हे वर्तमान ऐकून राजाचे चित्त अत्यंत अस्वस्थ झालें.

सिद्धार्थ आपल्या वाड्यांमध्ये जाऊन आपल्या महालामध्यें एकटाच बसला. तेथें दुसर्‍या कोणालाहि हुकुमावाचून आंत येण्याची त्यानें मनाई केली, आणि तो आपणाशीच म्हणाला “मी जेव्हा म्हातारा मनुष्य पाहिला आणि त्यासंबंधानें माझ्या तरुण मित्रांशी बोललों, तेव्हा त्यांनी माझी केवळ अवहेलना केली, जणू काय त्यांना व मला कधीहि वृद्धावस्था येणार नाही!

त्याचप्रमाणें व्याधिग्रस्त माणसाला पाहून माझें चित्त जेव्हां अस्वस्थ झालें, तेव्हां माझे मित्र माझी थट्टा करू लागले. आता जर मी त्यांना त्या मृत मनुष्याची गोष्ट सांगितली, तर पुन: एकवार ते माझी थट्टा करतील! जरा, व्याधि आणि मरण या तीन अवस्थांचे अवलोकन करण्यास त्यांच्या अंगी जणू काय सामर्थ्यच राहिलें नाही! पण या जरेचा विचार केला असतां मनुष्याचा तारुण्यमद पार नष्ट होतो; व्याधीच्या विचारानें बलमद निघून जातो; आणि मृत्यूच्या विचारानें आयुष्यमद नाहीसा होतो. हे तीनहि मद नष्ट झाले म्हणजे या प्रपंचामध्ये आम्हांला आनंद कसा वाटेल? प्रापंचिक जन आटलेल्या डबक्यांतील माशाप्रमाणें तृष्णेने तडफडत आहेत. तथापि, या तीन मदांमुळें ते परस्परांशी भांडत आहेत! परस्परांचा मत्सर करीत आहेत! परस्परांचा विरोध करीत आहेत! पण माझे हे मद नष्ट झाल्यामुळे मी आता या कलहपूर्ण प्रपंचांत रहाण्यास योग्य नाही; मला प्रपंचाची भीति वाटत आहे!”

राजपुत्राला राजवाड्यांतील सर्व सुखांनी आनंद होईनासा झाला. पुन: एकवर तो उद्यानांत जाण्यास निघाला. तेथे गेल्यावर एका वृक्षाखाली बसलेला एक काषायवस्त्रधारी भिक्षु, त्याच्या पहाण्यांत आला. त्याला पाहून तो सारथ्याला म्हणाला “छन्न, हा मनुष्य कोण आहे? यानें जरी काषायवस्त्रे धारण केली आहेत, तथापि याची मुद्रा अत्यंत गंभीर दिसत आहे!”

छन्न महणाला “आर्यपुत्र याला श्रमण किंवा भिक्षु असे म्हणतात. यानें प्रपंचांचा त्याग केला आहे. तेव्हा तुमच्याआमच्याप्रमाणें प्रापंचिक दु:खाची याला वारंवार बाधा होत नसल्यामुळें याची मुद्रा शांत दिसत आहे!”

सिद्धार्थ कांही वेळ विचारमग्नस्थितीत उद्यानांमध्यें फिरला. नंतर रथांत बसून आपल्या वाड्याकडे जाण्यास निघाला. त्या वेळी कृशागौतमी नांवाची तरुण क्षत्रियकन्या आपल्या वाड्याच्या गच्चीवर बसली होती. तिनें सिद्धार्थ रथांत बसून जात असताना त्याजकडे पाहिले, आणि पुढील उद्गार काढिले :--

सुखी माता याचीच असे पाहीं,
सुखी जगतीं याचाच तो पिताहि;
सुखी लोकीं स्त्री सत्य ती विलोकीं
जिला लाभे पति यासमान लोकी*!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*मूळ गाथा अशी आहे :--
निब्बुता नून सा मता निब्बुतो नून सो पिता
निब्बुता नून  नारी यस्यायं ईदिसो पति।
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
शहरांत गर्दी असल्यामुळें सिद्धार्थाचा रथ मंदगतीनें चालला होता. तेव्हा कृषागौतमीचे उद्गार त्याच्या सहज कानी आले. तो आपणाशीच म्हणाला “माझ्यासारखा जिला पुत्र असेल, ती आई सुखी होते, तो बाप सुखी होतो व जिला असा पति मिळेल ती भार्या सुखी होते, असे या क्षत्रियकुमारींचे म्हणणे आहे; परंतु खरा सुखी कोण? मला वाटतें, की, ज्याच्या अंत:करणांतून काम, क्रोध आणि मोह हे तीन प्रकारचे अग्नि विझून गेले, तोच खरा सुखी होय! आजच्या आज गृहत्याग करून आत्यंतिक सुखाचा मार्ग शोधून काढण्याचा मी प्रयत्न केला पाहिजें. या कुमारीनें मला आत्यंतिक सुखाची (निर्वाणीची) आठवण दिल्यामुळे ती मला गुरुस्थानी आहे. तेव्हा तिला काही गुरुदक्षिणा देणे योग्य आहे.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel