कालाम म्हणाला “सिद्धार्था, पहिल्या चार पायर्‍यांना मी ध्यानें म्हणतो. पहिल्या ध्यानामध्ये वितर्क, विचार, प्रीति, सुख आणि एकाग्रता या पंच मनोवृत्ति राहतात व बाकी सर्व मनोवृत्ति नष्ट होतात. वितर्क म्हणजे इंद्रियगोचर विषयामध्ये चित्ताचा पहिला प्रवेश होय. विचार ध्यानाविषयाचे सूक्ष्म निरीक्षण करतो. वितर्काहून विचार विशेष शांत असतो. प्रीति म्हणजे ध्यानामध्ये योग्याला प्राप्त होणारा आनंद होय. सुख प्रीतीहूनहि शांत स्वभावाचे असतें. प्रीतीच्या लाटा जेव्हा शांत होतात, तेव्हा योग्याला समाधिसुख काय आहे हें समजते. एकाग्रता म्हणजे ध्यानविषयामध्ये तल्लीनता. एकाग्रतेवाचून मनुष्याला क्षणिक समाधिदेखील साधावयाचा नाही. दुसर्‍या ध्यानामध्ये वितर्क आणि विचार या दोन मनोवृत्ति नष्ट होऊन प्रीति, सुख आणि एकग्रता या तीनच नवोवृत्ति शिल्लक राहतात. तिसर्‍या ध्यानामध्यें प्रीतिदेखील निघून जाते. येथे योगी सुख आणि एकाग्रता यांचाच अनुभव घेत असतो. चवथ्या ध्यानामध्ये एकाग्रताच काय ती शिल्लक राहतें. आणि तिला उपेक्षेचें पाठबळ मिळाल्यामुळे ती अत्यंत परिशुद्ध होते. ही चार ध्यानें साध्य झाल्यावर योग्यानें अनंत आकाशाचें ध्यान करावें. आकाशावर ध्यान करून जो समाधि प्राप्त होतो, त्याला आपण आकाशनंत्यायतनसमाधि असे म्हणतो. या समाधीचा पूर्ण लाभ झाल्यावर योग्याने विज्ञानावर ध्यान करावें.  विज्ञानाची व्याप्ति आकाशाच्याहि पलीकडे आहे. तेव्हा योगी आकाशाची पायरी सोडून या पायरीवर गेला, म्हणजे सर्व विश्व त्याला विज्ञानमय दिसतें. विज्ञानावाचून दुसरी कोणतीच गोष्ट त्याला दिसत नाही. या समाधीला आपण विज्ञानानंत्यायतनसमाधि असे म्हणतो. त्याच्या पलीकडची आणि शेवटची पायरी म्हटली, म्हणजे योग्यानें अभावावर ध्यान करावें, ही होय. या जगामध्यें कोणत्याहि वस्तूचें अस्तित्व नाही, सर्व जगभावरूपी आहे, असे ध्यान केले असतां या समाधीचा लाभ होतो. हा समाधि अभावरूपी असल्यामुळें आपण याला आकिंचन्यायतनसमाधि असें म्हणतों. श्रद्धा, वीर्य, स्मृति, समाधि आणि प्रज्ञा या पांच मनाच्या शक्ति आहेत. याला मी मानसिक इंद्रियें असें नाव दिले आहे. योग्यानें या इंद्रियांना विषम होऊ न देता यांचे साम्य संपादन केलें पाहिजे. विशेषत: श्रद्धा आणि प्रज्ञा यांचे आणि वीर्य व समाधि यांचे साम्य असले पाहिजे. स्मृतीचा उपयोग सर्वत्र करावा लागतो. माझें मन स्वस्थ आहे की अस्वस्थ आहे. इत्यादि गोष्टीसंबंधानें तो विवेक, त्यालाच स्मृति असें म्हणतात. या स्मृतीच्या द्वारें क्षद्धा आणि प्रज्ञा, वीर्य आणि समाधि यांची समता केली पाहिजे. हे सिद्धार्था! तूं जर या पांच इंद्रियांचे समत्व संपादून अनुक्रमें मी सांगितलेल्या सर्व समाधीच्या पायर्‍यांचा अभ्यास करशील, तर तुला शेवटल्या पायरीचा- आकिंचन्यायतन समाधीचा लाभ झाल्यावर माझ्या धर्माच्या रहस्याचा तुला साक्षात्कार झाला, असे म्हणता येईल.”

सिद्धार्थानें गुरूचा उपदेश श्रवण करून एकांतामध्ये चिंतन करण्याचा क्रम चालविला. तो आपल्या मनाशीच म्हणाला “माझ्या आचार्यानें श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधि आणि प्रज्ञा या पांच मानसिक शक्तीचें समत्व संपदावयाला मला सांगितलें, हे ठीकच आहे. कांकी, व्यवहरांत देखील या शक्तीचें साम्य असणें अत्यंत आवश्यक आहे. आमची श्रद्धाच जर वाढत गेली, आणि तिच्याबरोबर प्रज्ञेची वाढ झाली नाही, तर आम्ही भलत्याच वस्तूवर विश्वास ठेवितो. कोणीं कांही सांगितले, तरी ते आम्हांला खरें वाटतें. उलटपक्षी, आमची प्रज्ञा वाढत गेली, आणि तिला जर श्रद्धेंचे बंधन नसलें, तर ती उच्छृंखल होऊन जातें. तिच्यामुळे आम्ही गर्वानें फुगून जातो, व दंभाच्या भक्ष्यस्थानी पडतो. पण प्रज्ञेला जेव्हा श्रद्धेची जोड मिळतें, तेव्हा या दोन्ही मानसिक शक्तीचा सुखकारक परिणाम घडतो. त्याचप्रमाणें आमचें वीर्य (उत्साह) जर वाढत गेलें, आणि त्याला समाधीचें बंधन नसलें, तर तें उच्छृंखल होऊन जातें. अतिशय उत्साहामुळें मनुष्याला आपण काय करितों याचें देखील भान रहात नाही. पण नुसती समाधिदेखील अपायकारक आहे. समाधीची शक्ति जर वढत गेली, तर मनुष्य आळशी बनेल, व त्याच्या हातून कोणतेंहि लोकोपयोगी कृत्य व्हावयाचें नाही, परंतु वीर्य आणि समाधि या दोन शक्तींची समता केली असतां इष्ट परिणाम घडून येईल. स्मृतीचा उपयोग सर्वत्र करावा लागतों, हे आमच्या गुरूंचे म्हणणे बरोबर आहे. राजाचा मुख्य प्रधान जसा इतर प्रधानांची कामें तपासून पहातों, त्याप्रमाणे स्मृतीनें श्रद्धा आणि प्रज्ञा, वीर्य आणि समाधि यांच्या कार्यांवर देखरेख ठेविली पाहिजें. आता आमच्या गुरूलाच या पांच शक्तींचें साम्य संपादिता आलें आणि इतरांना तें येणार नाही, असें नाही. माझ्या अंगीहि या पाच शक्ति आहेंत, आणि मी देखील यांची समता संपादन करावयाला समर्थ आहे.”

सतत परिश्रम करून आणि वर सांगितलेल्या पंच मानसिक शक्तींचे समत्व संपादून सिद्धार्थानें अल्पावकाशातच आंकिंचन्यसमाधि साध्य केला; आणि कालामाजवळ जाऊन तो त्याला म्हणाला “भो आचार्य, आपण ज्या समाधीच्या सात पायर्‍या सांगितल्या, त्यांचा क्रमश: अभ्यास करून शेवटली पायरी मला साध्य झाली आहे. आतां यापुढें माझें कर्तव्य काय आहे, तें मला सांगा.”

कालाम म्हणाला “आतां यापुढे तुला कोणतीहि गोष्ट करावयाची राहिली नाही. माझ्या धर्मरहस्याचा जसा मला साक्षात्कार झाला आहे, तसाच तो तुलाहि झाला आहे. आतां तूं माझ्यासारखाच या धर्मपंथांचा प्रमुख पुढारी होऊन शिष्यशाखा वाढविण्याचा प्रयत्न कर.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel