सिद्धार्थ लवकरच बुद्ध होणार, या आशेने ब्रह्मादिक देवगण छत्रचामरें, पुष्पमाला इत्यादि साहित्य घेऊन बुद्धपूजा करण्यासाठी बोधिवृक्षाखाली जमले होते, पण जेव्हा त्यांनी चारी बाजूंनी वातवेगाने धांवत येणारी ती मारसेना पाहिली, तेव्हा त्याचे सर्व धैर्य गळून गेले. एकदेखील देव त्या ठिकाणी राहूं शकला नाही! देवांचा राजा शक्र आपला विजयशंख घेऊन पृथ्वीच्या अंताला जाऊन दडून बसला. ब्रह्मदेवाने बुद्धपूजा करण्यासाठी श्वेतच्छत्र आणिलें होते ते सुमेरुपर्वताच्या पायथ्याशी टाकून तो देखील ब्रह्मलोकी जाऊन स्वस्थ बसला. इतर देव तर मलादिक पूजासामग्री जिकडेतिकडे फेकून देऊन दशदिशा पळत सुटलें! तात्पर्यं, ‘कठिण समय येतां कोण कामास येतो!’ या म्हणीप्रमाणें सिद्धार्थाच्यारक्षणाला त्याच्या पुण्यायीवाचून दुसरा कोणीही उपयोगी पडला नाही.

मारानें आपल्या सैन्याला पुढे पाठवून गिरिमेखल नांवाच्या हत्तीवर आरूढ होऊन तो मागोमाग निघाला. माराच्या फौजेनें सिद्धार्थाचा पराजय करण्याची पराकाष्टा केली. आपल्या शस्त्रास्त्रांचा तें बोधिसत्त्वावर एकसारखा वर्षाव चालविला होता, पण त्या तीक्ष्ण शस्त्रास्त्रांची फुले होऊन बोधिसत्वाच्या पायांपाशी पडली!

माराला आपल्या सेनेला जय मिळण्याची आशा राहिली नाही, तेव्हां त्यानें आपल्या प्रभावानें भयंकर तुफान उठविले. आसपासचे वृक्ष तटातट उपटून पडूं लागलें, धुळेनें आकाश भरून गेले; पशुपक्ष्यादिकांचा एकच आक्रोश सुरू झाला! परंतु बोधित्वाचा समाधि तिळमात्र ढळला नाही, आणि तो ज्या वृक्षाखाली बसला होता, त्याचे एक पान देखील हललें नाही.
ते पाहून मार अत्यंत संक्षुब्ध झाला, व त्याने भयंकर पाऊस पाडावयाला सुरुवात केली. जिकडेतिकडे महापूर आला, परंतु बोधिसत्वाचे आसन कोरडे राहिल्यामुळे आणि पाण्याच्या एका थेंबानें देखील त्याच्या अंगाला स्पर्श न केल्यामुळे त्याच्या समाधीत मुळीच व्यत्यय आला नाही.

तदनंतर मारानें पाषाणवृष्टि, शस्त्रवृष्टि, अंगारवृष्टि, तापलेल्या राखेची वृष्टि, तापलेल्या वाळूची वृष्टि आणि तापलेल्या चिखलाची वृष्टि अशा अनुक्रमे निरनिराळ्या सहा वृष्ट्या उत्पन्न केल्या. परंतु त्यापासूनहि बोधिसत्वाच्या समाधीला अंतराय झाला नाही.
ते पांहून मार फार खिन्न झाला. तथापि प्रयत्न न सोडता शेवटी यानें भयानक अंधकार उतपन्न केला. ती वैशाखशुद्ध पौर्णिमेची रात्र होती. जिकडेतिकडे शुभ्र चांदणें पडले होतें. परंतु बोधिवृक्षाच्या आसपास मारानें इतका दाट अंधाकर पसरवला, की, माराचा गिरिमेखल हत्ती किंवा आसपासच्या पर्वतांची शिखरें घुबडांना देखील दिसेनाशी झाली. पण बोधिसत्वाच्या ज्ञानरवीपुढे या मारनिर्मित अंधकाराचें काहीच चालले नाही. त्याच्या समाधीला मुळीच व्यत्यय आला नाही.

आजपर्यंत त्या कडव्या माराला पराभव कसा तो मुळीच माहीत नव्हता. आपल्या स्वत:च्या परभावाचा उपयोग करण्याचा प्रसंग त्याला कधीच आला नाही. एकाद्या श्रमणाने किंव ब्राह्मणाने त्याचें अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असता, तो आपल्या फौजेची एकादी लहानशी तुकडी पाठवून त्याला तेव्हाच चीत करून टाकीत असे. सिद्धार्थ साधारण तपस्वी नव्हता, हे जाणूनच मारानें आपल्या सर्व सैन्याला त्याच्यावर एकदम तुटून पडावयाला आज्ञा केली होती. परंतु आपल्या फौजेचा बोधिसत्वाकडून सपशेल पराभव होईल, हे त्याच्या ध्यानीमनीदेखील आलें नाही. आतां तर त्यानें जवळजवळ आपली सर्व शक्ति वेंचली, पण बोधिसत्व काही केल्या त्याला दाद देईना. तेव्हा माराला याप्रसंगी किती दु:ख झालें असेल, याची कल्पनाच केली पहिजे.

आतां आपलें काळें तोंड घेऊन परत जावें, किंवा आपल्या हत्तीवरून खाली उतरून सिद्धार्थावर तुटून पडावें, या दोहोंपकी माराला एकच मार्ग खुला राहिला होता. आपल्या पराभवाची वार्ता घेऊन माघारें जाणे न आवडल्यामुळे बोधिसत्वावर स्वत: हल्ला करण्याचे धाडस करणेंच माराला इष्ट वाटलें. तो हत्तीवरून खाली उतरला, आणि बोधिसत्वाजवळ येऊन त्याला म्हणाला “सिद्धार्था, येथून मुकाट्याने चालता हो, नाही तर मी तुझा एका क्षणार्धांत माझ्या सैन्याकडून नाश करवून टकितो!”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel