बोधिसत्व म्हणाला “हे मार! तुझ्या सैन्याची मला चांगली पारख आहे. नाना प्रकारच्या चैनीच्या वस्तू ही तुझी सगळ्यांत पुढें जाणारी सैन्याची तुकडी होय. त्याच्या मागोमाग अरिरति, तहान आणि भूक, तृष्णा, आळस, कुशंका, गर्व, कीर्तीची आशा, आत्मस्तुति आणि परनिदा या तुझ्या तुकड्या येत असतात. साधारण तपस्व्याकडून यांपैकी एकाद्या तुकडीचा पराजय होणें शक्य नाही; पण मला तुझ्या या सर्व सेनेची मुळीच पर्वा वाटत नाही. कच्च्या मातीचे भांडे जसे दगडानें सहज फोडिता येते, तसा माझ्या प्रज्ञेच्यायोगे तुझ्या सेनेचा मला पराभव करिता येईल!

मार म्हणाला “हे जाऊं दे. पण तूं ज्या आसनावर बसला हें, तें आसन माझें आहे. त्यावर बसण्याचा तुला अधिकार नाही, म्हणून मी म्हणतो, कीं, तूं येथून उठून ताबडतोब चालता हो!”

बोधिसत्व म्हणाला “मरा! हे आसन तुझे आहे याचा पुरावा काय?”

हा सिद्धार्थाचा प्रश्न ऐकून माराच्या फौजेतील पुष्कळ योद्धे पुढें सरसावले आणि “हे आसन माराचें आहे, याला आम्ही सक्षी आहो!” असें म्हणून लागले. तेव्हा मार बोधिसत्वाला म्हणाला “हा पहा माझा पुरावा. हे सर्व लोक हे आसन माझें आहे, अशी साक्ष देत आहेत. आतां हे तुझें आहे याला काय पुरावा आहे, तो दाखीव; नाहीतर मुकाट्यानें येथून निघून जा.”
बोधिसत्व म्हणाला “हे मार! मी अनेंक जन्मी दानपारमिता परिपूर्ण केल्यामुळे या आसनवर बसण्यास अधिकारी झालों आहे.”
मार म्हणाला “पण तूं दानपारमिता पूर्ण केली याला साक्षी कोण?”

बोधिसत्व आपला उजवा हात पृथ्वीकडे करून म्हणाला “हे मार! माझ्या पुण्यकर्माला दुसरा कोणी जीवंत साक्षी येथें मिळणे कठीण आहे. ही सर्वसहा सर्वव्यापी वसुंधरा माझ्या पुण्यकर्माबद्दल साक्ष देईल!”

बोधिसत्वानें हे शब्द उच्चारल्याबरोबर भयंकर गर्जना होऊन पृथ्वी दुभंग झाली व तिच्या पोटांतून एक सुंदर देवता तेथें प्रकट झाली, आणि ती माराला म्हणाली, “मारा! सिद्धार्थकुमारानें पूर्वजन्मी अनेक प्रसंगी महादान दिल्याबद्दल मी साक्षी आहे. याने याचकांच्या हातावर सोडलेल्या पाण्यानें भिजलेले हे माझे केस अद्यापि वाळले नाहीत—“

असें बोलून पृथ्वीदेवतेनें आपले केश पिळून त्यांतून पाणी काढलें. त्याचा प्रवाह एवढा मोठा झाला की, मार, त्याची सेना आणि त्याचा गिरिमेखल हत्तीदेखील कोठल्याकोठे वाहून गेला!

याप्रमाणें मारसेनेची दुर्दशा झाल्यावर ब्रह्मदि देवलोक बोधिवृक्षाभोवती जमले व सिद्धार्थाव दिव्यपुष्पवृष्टि करून त्यांनी त्याचा जयजयकार केला. तेव्हा सिद्धा आपणशीच उद्गारला:--

जन्मजन्मींची संसृती अपार,
धावंता मी पावलों कष्ट फार;
कोण कर्ता या देहमंदिराचा,
श्रांत झालों लाविता शोध याचा.
बोध कत्याला आज मला झाला,
पुन: घरटें बांधिता नये त्याला;
सर्व त्याची साधनें झालिं भिन्न,
देहगेहाचें कूट तसें छिन्न.
टाकुनीयां संस्कार चित्त माझें,
लोभ तृष्णेचें दूर करी ओझें;
मारसेनेची नसे भीति आता,
ज्ञानलोभें बोईन जगत्त्राता.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(हे शेवटचे दोन चरण वृत्त पुरे करण्यासाठी पदरचे घातले आहेत. मूळ गाथा अशा आहेत :--
अनेकजातिसंसारं संधाविस्सं अनब्बिसं
गहकारकं गवेसन्तो दुक्खा जाति पुनप्पुनं।
गहकारकं दिट्टो ऽसि पुन गेहं न काहसि
सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसंखितं
विसंखारगतं चितं तव्हानं स्वयमज्झगा।)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel