त्यानंतर बुद्ध मुचिलिंदवृक्षाखालून राजायतनवृक्षाखाली गेला, आणि तेथें विमुक्तिसुखाचा अनुभव घेत बसला. त्या वेळी तपुस्स आणि भल्लिक नावांचे दोन व्यापारी उत्कलदेशाहून त्या मार्गानें व्यापार करण्यासाठी चालले होते. त्यांच्या आप्तइष्टांनी त्यांना बुद्धगुरू जवळ आहे, हे वर्तमान सांगितलें. तेव्हा ते बुद्धाच्या दर्शनाला आले, व त्याची ती गंभीर मुद्रा पाहून त्या दिवसांपासून त्याचे शिष्य झाले. बुद्धाच्या उपसकांत (गृहस्थ शिष्यांत) हेच दोघे पहिले उपासक होते.

एका आठवड्यानंतर बुद्ध न्यग्रोधवृक्षाखाली जाऊन बसला. तेथें त्याच्या मनात असा विचार आला की, “मला जे धर्मज्ञान झाले आहे, त्याचा बोध प्रपंचामध्ये गढून गेलेल्या माणसांना होणे शक्य नाही. मी जर धर्माचा उपदेश केला, आणि लोकांना माझ्या धर्माचें ज्ञान नीटपणे झाले नाही, तर त्यायोगे मला विनाकारण त्रास मात्र होणार आहे! तेव्हां आतां धर्मोपदेशाच्या खटपटीला न लागता एकांतामध्येच कालक्रमण करावे हे बरें!”

हा बुद्धाचा मानसिक विचार तत्क्षणीच ब्रह्मदेवानें जाणला आणि तो मोठ्याने आपणापाशीच उद्गारला, “अरेरे! जगाची मोठी हानि होत आहे! सम्यकसंबुद्धाचे मन धर्मोपदेशाकडे न वळता एकांतवासाच्या सुखाकडे वळत आहे!”

तेव्हा ब्रह्मदेव ताबडतोब ब्रह्मलोकांमध्ये अंतर्धान पावला आणि बुद्धासमोर प्रकट झाला; व बुद्धाला हात जोडून म्हणाला “हे बुद्धगुरो, तुझ्या अमृततुल्य धर्माचा लोकांना उपदेश कर. या जगामध्ये ज्यांच्या ज्ञानावर अज्ञानमलाचें पटल घट्ट बसलें नाही, असे पुष्कळ प्राणी आहेत. केवळ तुझे धर्मवाक्य त्यांच्या कानी न पडल्यामुळे त्यांची हानि होत आहे. जर तूं उपदेश करशील, तर त्यातील रहस्य जाणणारे पुष्कळ लोक या जगांत सांपडतील. हे बुद्धगुरो! आजपर्यंत या मगधदेशांत जे धर्म प्रचलित झाले, ते परिशुद्ध नव्हते. कांकी, ज्यांच्या अंत:करणाचा पापमल सर्वथैव धुऊन गेला नाही, अशा माणसांकडून त्यांचा प्रसार झाला होता, म्हणून मलरहित अंत:करणानें जाणलेला हा तुझा धर्म लोकांना ऐकूं दे! हें अमृताचें द्वार लोकांसाठी उघडे कर!

पर्वतशिखरावर राहून जसे आपण खालच्या प्रदेशांतील लोकांकडे पहातो, तसा प्रज्ञेच्या शिखरावर चढून तू या जन्मजरादिक दु:खांनी पीडित झालेल्या लोकांकडे निर्भयपणे पहा! हे शूरवीर! माराशी युद्ध करून तूं विजय मिळविला आहेस. हे लोकनायक! तूं सर्व ऋणांतून मुक्त झाला आहेस. आता लोकांमध्ये संचार करून तुझ्या धर्माचा प्रसार कर. तुझा धर्म जाणणारे पुष्कळ लोक तुला भेटाल्यावाचून राहणार नाहीत.”

बुद्धानें ब्रह्मदेवाची विनंति मान्य केली, व आपल्या सद्धर्माचा प्रथमत: कोणाला उपदेश करावा याचा तो विचार करू लागला. आळारकालामानें जर या धर्माचे श्रवण केले, तर त्याला तेव्हाच याचे रहस्य समजेल, असा विचार बुद्धाच्या मनामध्ये आला.
पण कालाम एका आठवड्यापूर्वी निधन पावला होता. ही गोष्ट अंतर्ज्ञानाने जाणून बुद्ध उद्गारला “अरेरे! कालाम मोठा तपस्वी होता. तो आज जर जीवंत असता, तर माझ्या उपदेशाचें तत्त्व त्याला आयासा वांचून समजले असतें. पण आता दुसरा कोणता मनुष्य माझा धर्म जाणावयाला समर्थ आहे? उद्रक रामपुत्र हा कालामाप्रमाणेच मोठा तपस्वी आहे. तो माझा धर्ममार्ग लवकर जाणूं शकेल.

पण उद्रक रामपुत्राचा पूर्वदिशवशीच अंत झाला होता. ही गोष्टहि जेव्हा बुद्धाने अंतर्ज्ञानाने जाणिली, तेव्हां तो आपणाशीच म्हणाला “आतां माझ्याबरोबर जे पांच तपस्वी रहात होते, ते माझा धर्म प्रथमत: श्रवण करावयाला योग्य आहेत. मी जेव्हा तपश्चर्या करीत होतो, तेव्हा त्यांनी पुष्कळ मदत करून मला आभारांत ठेविले आहे. पण ते या वेळी कोठे रहात असतील?”
ते पाच तपस्वी वाराणसीजवळ ऋषिपतन नावाच्या उपवनामध्ये रहात होते. हे बुद्धाने दृदिव्यष्टीने जाणून काशीला जाण्याचा बेत करून तो उरुवेलेहून निघाला.

वाटेंत आजीवकपंथचा उपक नावाचा श्रमण त्याला भेटला आणि म्हणाला “आयुष्यमन गौतम! तुझें मुख अत्यंत प्रसन्न दिसत आहे. आणि तुझी अंगकांति तेजस्वी दिसत आहे, तू कोणत्या आचार्याचा शिष्य आहेस?”

बुद्ध म्हणाला “माझा धर्ममार्ग मीस्वत:च शोधून काढला आहे. तेव्हा मी कोणाचा शिष्य आहें असें सांगू?”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel