[९]
सुदत्त ऊर्फ अनाथपिंडिक श्रेष्ठी


शाक्यांनां यथावकाश उपदेश करून बुद्धगुरू कपिलवस्तूहून मोठ्या भिक्षुसमुदायासहवर्तमान पुन:  राजगृहाला आला. तेथें तो सीतवनामध्यें रहात होता. त्या वेळीं अनाथपिंडिक नांवानें प्रसिद्ध असलेला श्रावास्ति येथील श्रेष्ठी कांही कामानिमित्त राजगृहाला आपल्या मेहुण्याच्या (बायकोच्या भावाच्या) घऱी आला होता.

यावेळीं अनाथपिंडिकाचा मेहुणा मोठ्या गडबडींत होता. त्याच्या घरी भोजनसमारंभाची तयारी चालली होती. तें पाहून अनाथपिंडिक त्याला म्हणाला “मी तुमच्याकडे आलों असतां तुम्ही सर्व कामें टाकून माझें आदरातिथ्य प्रथमत: करीत होतां;  पण आज मी पहातों, कीं, मोठ्या भोजनसमारंभाच्या तयारींत तुमचे चित्त गढून गेलें आहे. उद्यां तुमच्या घरीं लग्नसमारंभ होणार आहे, किंवा मोठा यज्ञ होणार आहे, किंवा बिंबिसारराजाला आणि त्याच्या सरदारांनां उद्या तुम्ही आपल्या घरीं मेजवानी देणार आहां?”

तो म्हणाला “तुम्ही म्हणतां यांपैकीं कांहीं नाहीं. उद्यां मी माझ्या घरी बुद्धाला आणि त्याच्या भिक्षुसंघाला आमंत्रण केलें आहे.”

“बुद्ध म्हणतां!” अनाथपिंडिकाच्या मेहुण्यानें उत्तर दिलें.

“होय बुद्ध म्हणतों.” अनाथपिंडिकाच्या मेहुण्यानें उत्तर दिलें.

अनाथपिंडिक म्हणाला “बुद्ध हा शब्ददेखील या लोकीं दुर्लभ आहे! या वेळीं त्या भगवंताचें दर्शन घेणें शक्य आहे काय?”

अनाथपिंडिकाचा मेहुणा म्हणाला “बुद्धाच्या दर्शनाला जावयाची ही वेळ नव्हे. उद्यां सकाळी योग्य वेळीं  तूं त्या भगवंताची भेट घे.”

अनाथपिंडिकाला त्या रात्री निद्रा कशी ती आली नाहीं. पहाट होईपर्यंत तो बिछान्यावरून सकाळ झाली असें समजून तीनदा उठला. शेवटीं अरुणोदयाच्या पूर्वी उठून तो सीतवनाकडे चालता झाला. वाटेंत एकाएकी मोठा अंधकार उद्भवला. अनाथपिंडिक घाबरून मागें सरण्याच्या बेतात होता; इतक्यात त्या प्रदेशात रहाणारा सीवक नांवाचा यक्ष त्याला म्हणाला “हे गृहपति, सीतवनाच्या बाजूला तुझें प्रत्येक पाऊल मोठें पुण्य प्रसवत आहे. म्हणून मागें न सरतां पुढें हो!”

हें यक्षाचें भाषण ऐकून अनाथपिंडिकाच्या मनाला धीर आला आणि त्याच्या दृष्टीसमोर आलेला अंधकार नष्ट झाला. अनाथपिंडिक सीतवनामध्यें पोहोंचला त्या वेळीं बुद्धगुरू पहाटेला उठून मोकळ्या जागेंत चक्रमण करीत होता. अनाथपिंडिकाला पाहून तो एका आसनावर जाऊन बसला आणि “सुदत्ता, इकडे ये,” असें म्हणाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel