एके दिवशी अजातशत्रूला भेटून तो त्याला म्हणाला “हे राजपुत्र, पूर्वीप्रमाणे आजकालची माणसें दीर्घायुषी होत नसतात. कधीं कोणाला मरण येईल याचा नेम नसतो. तेव्हा बापाच्या पूर्वीच राज्यसुखाचा उपभोग घेतल्यावाचून तुला मरण येण्याचा संभव आहे. म्हणून मी म्हणतों, कीं, बिंबिसाराला मारून तूं राजा हो, व बुद्धाला मारून मी बुद्ध होतों.”

अजातशत्रूला आपल्या गुरुची ही युक्ति पसंत पडली व नागवी तलवार हातात घेऊन तो आपल्या पित्याला मारण्यासाठी अंत:पुरांत शिरला. तेथें बिंबिसाराच्या शिपायांनी त्याला पकडलें व आपल्या धन्यासमोर नेऊन उभे केले. बिंबिसार म्हणाला ”मुला, तूं हें अघोर कृत्य करावयाला कां सज्ज झालास?”

अजातशत्रु म्हणाला “मी राज्य करावयाला उत्सुक झाल्यामुळें आपणावर तलवार उगारावयाला सिद्ध झालों, याची मला क्षमा असावी.”

बिंबिसारराजानें ताबडतोब आपल्या मंत्रिमंडळाला बोलावून आणून त्यांच्यासमक्ष राज्यकारभार अजातशत्रूच्या हवाली केला. अजातशत्रूनें कांही दिवसानंतर आपल्या पित्याला कैदेंत टाकून उपवासानें ठार मारिलें.

याप्रमाणे अजातशत्रूला राज्याचा संपूर्ण अधिकार मिळाल्यावर देवदत्त त्याला म्हणाला “आतां तूं मला मदत केली पाहिजेस. मारेकर्‍यांनां पाठवून तूं जर बुद्धाचा प्राण घेशील, तर मी लवकरच बुद्ध होईन.”

अज्ञातशत्रूनें देवदत्ताच्या सांगण्याप्रमाणे कांही मारेकरी पाठविले; पण बुद्धाला न मारतां उलट ते त्याचे शिष्य होऊन राहिलें. तेव्हा देवदत्ताला अतिशय चीड आली व स्वत: बुद्धाला मारण्याचा त्यानें निश्चय केला.

एके दिवशी बुद्धगुरू गृघ्रकूत पर्वताच्या सावलीत चंक्रमण करीत होता. ही संधी पाहून देवदत्त जवळच्या टेंकडीवर चढला, व तेथून त्यानें एक मोठा दगड बुद्धावर ढकलून दिला. खडकावर आदळून वाटेंत  त्या दगडाचे तुकडेतुकडे होऊन गेले, पण त्याची एक चीप बुद्धाच्या पायांत शिरली व मोठी जखम झाली. बुद्धगुरू वरती देवदत्ताकडे पाहून म्हणाला “खून करण्याच्या विचारानें, मूर्खा! तूं जे हें दुष्टकृत्य केलेंस, त्याच्यायोगें तूं मोठ्या पापाचा वाटेकरी झाला आहेस¡”

बुद्धाला देवदत्ताने जखम केली हें वर्तमान सर्वत्र पसरलें. देवदत्त बुद्धाचा खून करील अशी कांही भिक्षुंनां भीति वाटून त्यांनी बुद्ध ज्या विहारांत रहात होता, त्याच्या आसपास पहारा करण्यास सुरुवात केली. त्यांची हालचाल पाहून व स्वाध्यायाचें पठण ऐकून बुद्ध आनंदाला म्हणाला “हे भिक्षु येथें रात्रदिवस कां फिरत आहेत?”

आनंद म्हणाला “भगवन्! देवदत्ताकडून आपल्या जीवाला धक्का पोहोचूं नये म्हणून हे येथें पहारा करीत आहेत.”

बुद्धानें आनंदाकडून त्या भिक्षुंनां बोलावून आणिलें, व तो त्यांनां म्हणाला “भिक्षुंहो, माझ्या देहाची इतकी काळजी घेण्याचें कांहीं कारण नाहीं. माझ्या शिष्यांपासून माझें रक्षण व्हावें अशी माझी इच्छा नाहीं. तेव्हां तुम्ही येथें पहारा न करतां आपापल्या कामाला लागा.”

बुद्धगुरूच्या पायांची जखम कांही कालानें बरी झाली, व तो हिंडूं फिरूं लागला. एके दिवशी राजगृहांत पिंडपाताला जात असतां त्याला पाहून देवदत्त हस्तिशाळेंत गेला, आणि तेथील मुख्य माहुताला म्हणाला “मी राजाचा गुरू आहें. हें तूं मीं सांगितलेलें काम ऐकशील, तर मी राजाकडून तुला मोठें बक्षीस देववीन. पण जर माझ्या कामांत कसूर करशील, तर या नोकरीवरून तुला दूर करण्यांत येऊन शिक्षा करण्यांत येईल.”

माहुत म्हणाला “गुरुमहाराज, आम्ही आपल्या आज्ञेबाहेर कधीहि जाणार नाहीं. आमच्या महाराजांप्रमाणेंच आपणहि आम्हांला वंद्य आहां.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel