[१४]
महाप्रजापति गौतमी
आणि भिक्षुणीसंघाची स्थापना

बुद्ध आपल्या उतारवयांत एकदां कपिलवस्तूमध्यें रहात असतां त्याला महाप्रजापति गौतमीनें भिक्षुणींचा संघ स्थापन करण्यास विनंति केली; पण भिक्षुणींचा संघ स्थापन केला असतां भिक्षूंच्या आणि भिक्षुणींच्या संघांत तंटे उपस्थित होण्याचा संभव असल्यामुळें बुद्धानें गौतमीची विनंति मान्य केली नाही. नंतर बुद्ध कपिलवस्तूहून धर्मोपदेश करीत करीत वैशालीला आला.

महाप्रजापति गौतमीहि आपलें केशवपन करून पुष्कळ शाक्य स्त्रियांबरोबर वैशालीला आली. चालण्याच्या श्रमानें तिचे पाय सुजले होते. तिला पाहून आनंद म्हणाला “काय ही तुझी स्थिति! तूं इतकी विपद्ग्रस्त कां दिसतेस?”

महाप्रजापति म्हणाली “आनंदा, बुद्धगुरू स्त्रियांनां प्रव्रज्या देण्यास तयार नाहींत. याजबद्दल मला अत्यंत खेद होतो!”

“असें जर आहे, तर तूं जरा येथेंच बस. मी भगवंतांना पुन: एकदां विनंति करून पहातों.”

असें म्हणून आनंद बुद्धाजवळ गेला आणि म्हणाला “भगवन्! महाप्रजापति गौतमी पायींपायी कपिलवस्तूहून येथवर आली आहे. चालण्याच्या श्रमानें तिचे पाय सुजले आहेत. आपण स्त्रियांनी भिक्षुणी होण्याचा अधिकार देत नाहीं, याजबद्दल तिला अत्यंत दु:ख वाटत आहे. तेव्हां भगवन्! आपण आपल्या या पंथामध्यें स्त्रियांनां प्रव्रज्या घ्यावयाला अनुज्ञा द्या.”

बुद्ध म्हणाला “आनंदा, या भानगडींत तूं पडूं नकोस.”

आनंद म्हणाला “भगवन्, आपल्या धर्माचा साक्षात्कार होणें स्त्रियांनां शक्य आहे कीं नाहीं?”

बुद्ध म्हणाला “माझ्या धर्माचें रहस्य समजणें पुरुषांप्रमाणेंच स्त्रियांनांहि शक्य आहे.”

“असें जर आहे, तर आपण महाप्रजापतीच्या विनंतीला मान कां देत नाही? लहानपणीं आपणाला तिनेंच वाढविलें आहे. मायादेवी निवर्तल्यावर तिनेंच आपणाला दूध पाजलें आहे. तेव्हां तिच्या मनाचें समाधान करण्यासाठीं स्त्रियांनां प्रव्रज्या घेतां येईल, असा आपण नियम करा.”

आनंदाच्या म्हणण्याला मान देऊन बुद्धानें महाप्रजापतीला आणि तिच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनां प्रव्रज्या दिली, व त्यांचा एक निराळा भिक्षुणीसंघ स्थापन केला. या भिक्षुणीसंघांत खेमा आणि उप्पलवण्णा या दोघी प्रमुख भिक्षुणी होत्या. याशिवाय आणखीहि पुष्कळ प्रसिद्ध भिक्षुणी होऊन गेल्या. त्यांनां थेरी (स्थविरी) म्हणत असत. त्यांचे कांही उद्गार थेरीगाभा या पालिग्रंथामध्यें संग्रहित केले आहेत.

इसवी सनाच्या चौथ्या शतकांत भिक्षुणीसंघाचा लोप झाला असावा. आजकाल ब्रह्मदेशामध्यें अशाच प्रकारची एक संस्था आहे. पण त्या संस्थेतील स्त्रियांनां भिक्षुणी न म्हणतां दशशीलधारिणी उपासिका म्हणतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel