[१८]
यज्ञयाग


एके समयीं बुद्धगुरू मगधदेशांत संचार करीत असतां खाणुमत नांवाच्या ब्राह्मणग्रामीं आला. हा गांव मगधदेशाच्या बिंबिसारराजानें कूटदंत नांवाच्या ब्राह्मणाला दान दिला होता. बुद्ध तेथें पोहोंचला त्या वेळीं कूटदंत ब्राह्मणाच्या घरीं एक मोठा यज्ञ होणार होता. सातशें बैल, सातशें गोऱ्हे, सातशें कालवडी, सातशें बकरे आणि सातशें मेंढे यज्ञांत मारण्यासाठीं आणिले होते.

बुद्ध आपल्या गांवांत आल्याचें वर्तमान ऐकतांच खाणुमत गांवांतील ब्राह्मण एकत्र जमून बुद्धदर्शनाला निघाले. ते कूटदंतब्राह्मणाच्या वाड्यावरून चालले असतां, कूटदंतानें ते कोठें जातात याची चौकशी केली. कूटदंताच्या हुजर्‍यानें त्याला इत्थंभूत वर्तमान सांगितल्यावर तो त्या हुजर्‍याला म्हणाला "तूं या ब्राह्मणांनां सांग, कीं, कूटदंतदेखील बुद्धाच्या दर्शनाला जाऊं इच्छीत आहे. तेव्हां त्याच्यासाठीं तुम्हीं जरा थांबा."

कूटदंताच्या यज्ञासाठीं पुष्कळ ब्राह्मण खाणुमत गांवाला आले होते. त्यांनां कूटदंत बुद्धदर्शनाला जाणार आहे हें वर्तमान समजल्यावर ते त्याच्यापाशीं येऊन म्हणाले "भो कूटदंत, गौतमाच्या दर्शनाला तूं जात आहेस, ही गोष्ट खरी आहे काय?"

कूटदंत म्हणाला "होय, मला देखील गौतमाच्या दर्शनाला जावें असें वाटतें."

ब्राह्मण म्हणाले "भो कूटदंत, गौतमाच्या दर्शनाला जाणें तुला योग्य नाहीं. जर तूं त्याच्या दर्शनाला जाशील, तर त्याच्या यशाची अभिवृद्धि होईल; आणि तुझ्या यशाची हानि होईल! यासाठी गौतमानेंच तुझ्या भेटीला यावें, आणि तूं त्याच्या भेटीला जाऊं नये, हें चांगलें. तूं उत्तम कुलांत जन्मला आहेस, धनाढ्य आहेस, विद्वान् आहेस, सुशील आहेस, पुष्कळांचा आचार्य आणि प्राचार्य आहेस, वेदमंत्र शिकण्यासाठीं चोहोंकडून तुजपाशीं अनेक शिष्य येत आहेत; तूं गौतमापेक्षां वयानें मोठा आहेस, आणि मगधराजानें तुझा बहुमान करून हा गांव तुला इनाम दिला आहे. तेव्हां, गौतमानें तुझ्या भेटीला यावें, आणि तूं त्याच्या भेटीला जाऊं नये, हेंच योग्य आहे."

कूटदंत म्हणाला "आतां माझें म्हणणें काय आहे तें ऐका. श्रमणगौतम थोर कुलांत जन्मलेला आहे; तो मोठ्या संपत्तीचा त्याग करून श्रमण झाला आहे; तरुण वयांतच त्यानें संन्यास घेतला आहे; तो तेजस्वी आहे; तो सुशील आहे; मधुर बोलणारा आहे; त्याचें वचन कल्याणप्रद आहे; तो पुष्कळांचा आचार्य आणि प्राचार्य आहे; कामासक्तीपासून मुक्त होऊन तो शांत झाला आहे; तो कर्मवादी आणि क्रियावादी आहे; सर्व राष्ट्रांतील लोक त्याचें धर्मवाक्य श्रवण करण्यासाठीं येत असतात. तो सम्यक्संबुद्ध, विद्याचरणसंपन्न, लोकविद् दम्यपुरुषांचा सारथि व देवमनुष्यांचा शास्ता आहे, अशी त्याची सर्वत्र कीर्ति पसरली आहे. बिंबिसारराजा आपल्या अमात्यांसह त्याचा शिष्य झाला आहे. तसाच कोसलदेशचा पसेनदिराजा देखील त्याचा शिष्य झाला आहे. या राजांनां जसा तो पूज्य आहे, तसाच तो पौष्करसादि ब्राह्मणांनां पूज्य आहे. एवढी त्याची योग्यता असून सध्या तो आमच्या गांवीं आला आहे. त्याला आम्हीं आमचा अतिथि समजलें पाहिजे, आणि अतिथि या नात्यानें त्याच्या दर्शनाला जाऊन त्याचा सत्कार करणें, हें आम्हांला योग्य आहे."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel