ब्राह्मण म्हणाले "भो कूटदंत, तूं जी गौतमाची ही स्तुति केलीस, तिजमुळें आम्हांला असें वाटतें, कीं, सद्गृहस्थानें शंभर योजनें जाऊन देखील त्याचें दर्शन घेणें योग्य होईल. चला, आपण सर्वच त्याच्या दर्शनाला जाऊं."

तेव्हां कूटदंत त्या सर्व ब्राह्मणसमुदायासह आम्रयष्टि नांवाच्या वनामध्यें बुद्ध रहात होता तेथें आला, व बुद्धाला कुशलप्रश्नादिक विचारून एका बाजूला बसला. त्या ब्राह्मणांपैकीं कांहीं बुद्धाला नमस्कार करून, कांहीं आपलें नामगोत्र कळवून, व कांहीं कुशलप्रश्नादि विचारून एका बाजूला बसले.

नंतर कूटदंत बुद्धाला म्हणाला "आपणाला उत्तम यज्ञविधि माहीत आहे असें मीं ऐकिलें आहे. तो जर आपण आम्हांला समजावून सांगाल, तर चांगलें होईल."

बुद्ध म्हणाला "प्राचीनकालीं महाविजित नांवाचा एक मोठा राजा होऊन गेला. एके दिवशीं एकांतामध्यें बसला असतां त्या राजाच्या मनांत असा विचार आला, कीं, 'आपल्याजवळ पुष्कळ संपत्ति आहे. तिचा जर आपण महायज्ञांत व्यय केला, तर आपल्याला चिरकाल फायदा होईल.'

हा विचार त्यानें आपल्या पुरोहिताला कळविला; आणि तो म्हणाला 'हे ब्राह्मण, महायज्ञ करावयाची माझी फार इच्छा आहे. तो कोणत्या रीतीनें केला असतां माझें हित होईल तें मला सांग.'

"पुरोहित म्हणाला 'सध्या आपल्या राज्यांत शांतता नाहीं. गांव आणि शहरें लुटलीं जात आहेत; लोकांनां चोरांपासून फार उपद्रव होत आहे. अशा स्थितींत जर आपण लोकांवर कर बसवाल, तर कर्तव्यापासून विमुख व्हाल. आतां आपणाला असें वाटेल कीं, फांशीं देण्यानें, तुरुंगांत घालण्यानें, छी:थू करून किंवा राज्यांतून हांकून लावून या चोरांचा बंदोबस्त करतां येईल; परंतु अशा उपायानें राज्यांतील अंदाधुंदीचा पूर्णपणें निकाल व्हावयाचा नाहीं. कांकीं, अशा उपायांनीं जे वठणीला येणार नाहींत, ते पुन: बंडें उपस्थित करितील.

"आतां ही बंडाळी मोडव्याला खरा उपाय म्हटला म्हणजे हा आहे- जे आपल्या राज्यांत शेतकी करूं इच्छितात त्यांनां आपण बीं-बियाणें द्या; जे व्यापार करूं इच्छितात, त्यांनां भांडवल द्या; जे सरकारी नोकरी करूं इच्छितात, त्यांनां योग्य वेतन देऊन त्यांचा योग्य कामाकडे उपयोग करा. अशा रीतीनें सर्व माणसें आपणाला आवडणार्‍या कामांत दक्ष झाल्यावर आपल्या राज्यांत बंडाळी माजण्याचा संभव रहाणार नाहीं. वेळोवेळीं कर वसूल झाल्यामुळें आपल्या तिजोरीची अभिवृद्धि होईल. बंडवाल्यांचा उपद्रव नसल्यामुळें लोक मुलांबाळांचें कोडकौतुक पुरवीत दरवाजे उघडे ठेवून निर्भयपणें मोठ्या आनंदानें कालक्रमणा करितील.'

"पुरोहितब्राह्मणानें सांगितलेला बंडाळीचा बंदोबस्त करावयाचा उपाय महाविजितराजाला पसंत पडला. आपल्या राज्यांत शेती करण्याला समर्थ अशा लोकांनां बीं-बियाणें देऊन त्यानें शेती करावयाला लाविलें; लहानसहान व्यापार्‍यांनां भांडवल देऊन त्यांचा व्यापार वाढविला; आणि योग्य माणसांची निवड करून त्यांची सरकारी कामावर यथायोग्य स्थलीं योजना केली. या उपायानें महाविजिताचें राष्ट्र अल्पावकाशांतच समृद्ध झालें. राज्यांतील लोक इतके सुखी झाले, कीं, चोर्‍या, दरोडे नामशेष होऊन दरवाजे उघडे टाकून आपल्या मुलांनां खेळवीत ते मोठ्या आनंदानें काल कंठूं लागले.

"एके दिवशीं महाविजितराजा पुरोहिताला म्हणाला 'भो पुरोहित! तुम्ही सांगितलेल्या उपायानें मीं माझ्या राज्यांतील बंडाळी मोडून टाकिली आहे; माझ्या तिजोरीची सांपत्तिक स्थिति फारच समाधानकारक आहे; व राष्ट्रांतील सर्व लोक निर्भयपणें आणि आनंदानें रहात आहेत. आतां महायज्ञ करावयाची माझी इच्छा आहे. तेव्हां तो यज्ञ कशा प्रकारें करावा याचा मला उपदेश करावा.'

"पुरोहित म्हणाला 'महायज्ञ करण्याचा जर आपला विचार आहे, तर आपण या कामीं आपल्या प्रजेची अनुमति घेतली पाहिजे. तेव्हां प्रथमत: सर्व राज्यांतील लोकांनां जाहिरनाम्याच्याद्वारें आपली इच्छा कळवून सर्व लोकांची या कामीं संमति मिळवा.'

"पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणें राजानें 'आपण यज्ञ करणार आहों. याला आपल्या लोकांची अनुमति आहे किंवा नाहीं हें सर्वांनीं निर्भयपणें आणि स्पष्टपणें आपणाला कळवावें,' असा जाहिरनामा लाविला, व त्याप्रमाणें लहानमोठ्या सर्व लोकांनीं यज्ञ करण्याविषयीं आपलें अनुकूल मत दिलें.

"तेव्हां पुरोहितानें यज्ञाची सर्व सिद्धता केली, व तो राजाला म्हणाला 'यज्ञाला आरंभ केला असतां आपली पुष्कळ संपत्ति या यज्ञांत जाणार आहे, असा विचार तुम्हीं मनांत आणतां कामा नये. यज्ञ चालला असतां, आपली संपत्ति नाश पावत आहे, व यज्ञ झाल्यावर आपली संपत्ति नाश पावली, असा विचार मनांत आणतां कामा नये. आपल्या यज्ञांत बरेवाईट लोक येतील. पण त्यांत जे सत्पुरुष असतील, त्यांवर दृष्टि देऊन आपण यज्ञ करावा, व आपलें चित्त आनंदित ठेवावें.'

"महाविजिताच्या यज्ञामध्यें गाई, बकरे, मेंढे इत्यादि प्राणी मारण्यांत आले नाहींत; झाडें तोडून त्याचे यूप करण्यांत आले नाहींत; दर्भांचा उपयोग करण्यांत आला नाहीं; दासांनां आणि मजुरांनां जबरदस्तीनें कामावर लावण्यांत आलें नाहीं. ज्यांची इच्छा होती त्यांनींच काम केलें, व ज्यांची इच्छा नव्हती त्यांनीं तें केलें नाहीं. तूप, तेल, लोणी, दहीं, मध आणि गूळ, एवढ्या पदार्थांनींच तो यज्ञ परिपूर्ण करण्यांत आला.

"तदनंतर राष्ट्रांतील श्रीमंत लोक मोठमोठाले नजराणे घेऊन, महाविजितराजाच्या दर्शनाला आले. त्यांनां राजा म्हणाला 'गृहस्थ हो, मला तुमच्या नजराण्यांची मुळींच गरज नाहीं. धार्मिक कराच्या रूपानें माझ्याजवळ पुष्कळ द्रव्य सांठलें आहे. यापैकीं तुम्हांला जर कांहीं पाहिजे असेल, तर तें खुशाल घेऊन जा.'

"याप्रमाणें राजानें त्या धनाढ्य लोकांचे नजराणे घेण्याचें नाकारल्यावर त्यांनीं तें द्रव्य खर्चून अंध, पंगु वगैरे अनाथ लोकांसाठीं महाविजितराजाच्या यज्ञशालेच्या चारी दिशांनां धर्मशाळा बांधून तेथें गोरगरिबांनां दानधर्म केला."

ही बुद्धानें सांगितलेली यज्ञाची गोष्ट ऐकून कूटदंताबरोबर आलेले ब्राह्मण उद्गारले "फारच चांगला यज्ञ! फारच चांगला यज्ञ!"

नंतर बुद्धानें कूटदंतब्राह्मणाला आपल्या धर्माचा विस्तारानें उपदेश केला. त्याचें श्रवण करून कूटदंत बुद्धाचा उपासक झाला आणि म्हणाला "भो गौतम, सातशें बैल, सातशें गोऱ्हे, सातशें कालवडी, सातशें बकरे व सातशें मेंढे, या सर्व प्राण्यांनां यूपापासून मोकळें करितों; त्यांनां मी जीवदान देतों. ताजें गवत खाऊन आणि थंड पाणी पिऊन ते शीतल हवेमध्यें आनंदानें राहोत!"

कूटदंतब्राह्मणानें दुसर्‍या दिवशीं बुद्धाला आपल्या घरीं भिक्षुसंघासह आमंत्रण केलें, व आपण स्वत: सर्व व्यवस्था ठेवून बुद्धाला आणि भिक्षुसंघाला संतृप्त केलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel