(२१)
खोटें न बोलण्याविषयी राहुलाला उपदेश


कोणे एके समयीं बुद्ध भगवान् राजगृहांतील वेणुवनांत रहात होता. त्या वेळी आयुष्मान् राहुल राजगृहाजवळ अम्बलठ्ठिका या ठिकाणीं रहात होता. एके दिवशीं संध्याकाळी बुद्धगुरू राहुल होता त्या ठिकाणी गेला. राहुलानें भगवंताला दुरून पाहून आसन मांडिलें, व पाय धुण्यासाठीं पाणी आणून ठेविलें. बुद्धगुरूनें आसनावर बसून पाय धुतले. राहुल त्याला नमस्कार करून एका बाजूला बसला.

बुद्धाने पाय धुण्याच्या पात्रात थोडे पाणी शिल्लक ठेविलें, आणि तो राहुलला ह्मणाला ``राहुल, हें अत्यल्प उदक तूं पहात आहेस काय?’‘

"होय भदंत,’‘ राहुलाने उत्तर दिलें.

"राहुल, ज्याला खोटें बोलण्याविषयीं लाज वाटत नाहीं, त्या माणसाचें श्रामण्य या पाण्याप्रमाणें क्षुल्लक समजावयाला पाहिजे.’‘

नंतर बुद्धानें तें पाणी फेंकून दिलें आणि तो ह्मणाला ``राहुल, ज्याला खोटें बोलण्याची लाज वाटत नाही, त्याचें श्रामण्य या पाण्याप्रमाणें त्याज्य होय!’‘

पुन: बुद्ध तें भांडें पालथें घालून राहुलाला ह्मणाला, ``राहुल, ज्याला खोटें बोलण्याची लाज वाटत नाही, त्या माणसाचें श्रामण्य या भांड्याप्रमाणें पालथें पडलेलें आहे, असें समजावें!’‘


तें भांडें पुन: सारखे ठेवून बुद्ध ह्मणाला, ``राहुल हें रिकामें झालेलें भांडें तूं पहात आहेस ना! ज्याला खोटें बोलण्याची लाज वाटत नाही त्याचें श्रामण्य या भांड्याप्रमाणें रिकामें होय!

"राहुल, लढाईसाठी सज्ज केलेला एकादा राजहस्ती आपल्या सर्व अवयवांनी लढाई करील, पण सोंड तेवढी राखून ठेवील, तेव्हां असें ह्मणता येईल, कीं, या हत्तीनें आपलें जीवित धन्याच्या कार्यासाठी वाहिलें नाहीं. परंतु तोच हत्ती जर लढाईमध्ये सोंडेचा पूणर्पणे उपयोग करूं लागला, तर राजकार्याला त्यानें आपलें सर्व जीवित अर्पण केलें आहे असें ह्मटलें पाहिजे. त्याचप्रमाणे ज्याला खोटें बोलण्याची लाज वाटत नाही, त्याला कोणत्याही पापाची लाज वाटणार नाहीं असें मी ह्मणतों. ह्मणून हे राहुल, थट्टामस्करीसाठी देखील खोटें बोलूं नये, असा तूं निश्चय कर.

" राहुल, आरशाचा उपयोग काय?’’

" प्रत्यवेक्षण करण्यासाठीं आरशाचा उपयोग होतो,'' राहुलानें उत्तर दिले.

"त्याचप्रमाणें राहुल, आपल्या मनाशीं प्रथमत: प्रत्यवेक्षण करून मग कायावाचामनानें तूं कर्में करीत जा. कायेनें, वाचेनें आणि मनानें एकादें कर्म करावयाला जेव्हां तूं आरंभ करशील, तेव्हां प्रथमत: तूं त्या कर्माचें   प्रत्यवेक्षण कर; आणि प्रत्यवेक्षणामुळें जर तें कर्म आत्मपरहिताच्या आड येणार आहे असें तुला आढळून आलें, तर त्याचा तूं एकदम त्याग कर! पण तेंच कर्म आत्मपरहित साधणारें आहे, त्याचा सुखकारक परिणाम होणार आहे, असें दिसून आल्यास त्याचा अंगीकार कर. करीत असतांनां देखील एकाद्या कर्माचें तूं प्रत्यवेक्षण करावे, आणि तें कर्म आत्मपरहिताला बाधक आहे असें आढळून आल्यास पुढें चालू ठेवावें. आणखी राहुल, कोणतेंही कर्म केल्यावर देखील त्याचें तूं प्रत्यवेक्षण करावें. तें कर्म वाईट होतें, आत्मपरिहताला विघ्न करणारे होते, आणि दु:खविपाक होतें, असें आढळून आल्यास तथागतापाशी किंवा विद्वान भिक्षूपाशीं त्याचा तूं आविष्कार करावा, व त्या दिवसापासून पुन: तें कर्मं करूं नये. पण आपल्याकडून घडलेलें कर्म आत्मपरहितसाधक असून सुखविपाक आहे असें आढळून आल्यास, मुदित अंत:करणाने त्या कर्माचा तूं पुन:पुन: अभ्यास करावा.

"हे राहुल, अतीत कालीं ज्या साधुसंतांनीं आपलीं कायिक, वाचिक, आणि मानसिक कर्में परिशुद्ध केलीं, तीं त्यांनी या प्रत्यवेक्षणाच्या योगेच केलीं, भविष्यकालीं साधुसंत आपली कर्में परिशुद्ध करितील, ते या प्रत्यवेक्षणाच्याच योगें करितील; आणि सांप्रत जे साधुसंत आपलीं कर्में परिशुद्ध करितात, ते देखील याच प्रत्यवेक्षणानें करितात. म्हणून, हे राहुल, पुन:पुन: प्रत्यवेक्षण करून कायिक, वाचिक आणि मानसिक कर्में शुद्ध करण्यास शीक.''

भगवान् असें बोलल्यावर राहुलानें त्याच्या बोलण्याचे अभिनंदन केलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel