त्या वेळीं पसेनदिजवळ सुदर्शन नांवाचा तरुण मनुष्य होता; त्याला राजा म्हणाला "सुदर्शना, तूं ही गाथा पाठ कर, व माझ्या भोजनाच्या वेळीं म्हणत जा. याजबद्दल मी तुला रोज शंभर कार्षापण देत जाईन.''

सुदर्शनानें ती गाथा पाठ केली, व राजाच्या आज्ञेप्रमाणें रोज भोजनसमयीं तो ती गाऊं लागला. तिचा राजाच्या मनावर सुपरिणाम होऊन त्यानें जास्ती अन्न खाण्याचें सोडून दिलें, व त्यायोगें त्याच्या देहाची जडता नष्ट होऊन अंग हलकें झालें. तेव्हां तो उद्गारला "भगवान् किती तरी दयाळु आहे! तो मला पारमार्थिक गोष्टींचाच उपदेश करितो असें नाहीं, माझ्या ऐहिक हिताची देखील त्याला काळजी आहे!''

(ख) मुलगी झाली म्हणून विषाद मानूं नये

एकदां पसेनदिकोसल राजा जेतवनविहारांत बुद्धदर्शनाला आला असतां राजवाड्यांतून एक दूत येऊन त्यानें राजाच्या आवडत्या राणीला- मल्लिकादेवीला मुलगी झाल्याचें वर्तमान त्याला कळविलें. तें ऐकून राजाला फार वाईट वाटलें.

तेव्हां बुद्ध म्हणाला "महाराज, एकादी स्त्री देखील पुरुषांपेक्षा चांगली असते. ती जर बुद्धिमती, सुशील, आणि वडील माणसांचा मान राखणारी पतिव्रता निघाली, तर तिला दोष कोण देऊं शकेल? आणखी तिच्या पोटीं जो पुत्र होतो, तो मोठा शूर होतो. अशा सौभाग्यवती स्त्रीच्या पोटीं जन्मलेला पुत्र राज्य चालविण्यास देखील समर्थ असतो. म्हणून, हे जनाधिप, तूं तुझ्या मुलीचा प्रेमानें सांभाळ कर.''

(ग) कृपणपणा आणि औदार्य यांचा परिणाम

एके दिवशी पसेनदिराजा भरदुपारींच जेतवनांत आला, व बुद्धाला नमस्कार करून एका बाजूला बसला. तेव्हा बुद्ध म्हणाला "महाराज, तूं एवढ्या दुपारी कोणीकडे चालला आहेस?''

राजा म्हणाला, "भगवान, या श्रावस्तीमध्यें नुकताच एक धनाढ्य सावकार मरण पावला. तो निपुत्रिक असल्यामुळें त्याची दौलत ताब्यांत घेण्यासाठीं मी गेलों होतों. आत्तांच सर्व मालमत्ता राजवाड्यांत पाठवून देऊन मी इकडे आलों आहें. भदंत, या सावकाराची केवढी संपत्ति म्हणून सांगूं! ऐंशीं लाख सोन्याचे नाणेंच निघालें. रूप्याची तर गणनाच नाही! पण भदंत, या गृहस्थाचें जेवण म्हटलें म्हणजे कण्याचा भात आणि आंबील, एवढेंच काय तें होतें! खादीशिवाय दुसरें वस्त्र कांही बिचार्‍याने वापरलें नाहीं, आणि याचें यान म्हटले म्हणजे एक जर्जरित रथ! त्या रथाला देखील वर आच्छादन नव्हतें. तो एक डोक्यावर पर्णछत्र (ताडपत्राची छत्री) धरून त्या मोडक्या रथांत बसून फिरत असे!''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel