जीवक म्हणाला "महाराज! भिऊं नका. तुह्माला फसवून शत्रुच्या ताब्यांत देण्यासाठीं मीं येथें आणिलें नाहीं. आपण पुढें व्हा. हे समोरच्या ओसरीवर दिवे जळत आहे.''

जीवकाच्या आम्रवनाबाहेर आपले हत्ती उभे करून राजा सर्व मंडळीसह पायींच बुद्धगुरु बसला होता त्याठिकाणीं गेला. जीवकानें राजाला बुद्धाची ओळख करून दिली. परंतु त्याची भेट घेण्यापूर्वीच भिक्षुसंघाची शांत आणि गंभीर चर्या पाहून तो उद्गारला "माझ्या उदायिभद्र कुमार अशा प्रकारच्या शांतीनें संपन्न होवो!''

हे राजाचे उद्गार ऐकून बुद्ध म्हणाला "महाराज! तूं आपल्या प्रेमाला अनुसरूनच बोललास.''

"होय भगवन्, उदायिभद्र माझा आवडता मुलगा आहे,'' अजातशत्रूनें उत्तर दिलें, व बुद्धाला आणि भिक्षुसंघाला नमस्कार करून तो एका बाजूला बसला.

एका बाजूला बसल्यावर अजातशत्रु म्हणाला "भगवन्, निरनिराळे योद्धे, न्हावी, स्वयंपाकी, माळी, धोबी, बुरूड, कुंभार, कारकून वगैरे लोक आपापल्या कलेचें इहलोकींचे फळ मिळवीत असतात. आपल्या कलेच्या बळावर द्रव्यार्जन करून ते आपला उदरनिर्वाह करितात, आपल्या आईबापांचा सांभाळ करितात, आणि श्रमणब्राह्मणांनां दक्षिणा देऊन परलोकी स्वर्गाचा मार्ग खुला करितात. पण भगवन्, या लोकांच्या शिल्पाचें जसें प्रत्यक्ष फळ दाखवितां येतें, तसें श्रामण्याचें प्रत्यक्ष फळ दाखवितां येईल काय?''

बुद्ध म्हणाला ''हा प्रश्न तूं दुसर्‍या श्रमणब्राह्मणांनां विचारून पाहिला आहेस काय?''

राजा म्हणाला "होय. एकदां मीं पूरणकश्यपाला भेटून हा प्रश्न विचारला. तेव्हां पूरण मला म्हणाला `करणाराला किंवा करविणाराला, मारणाराला किंवा मारविणाराला, परदारागमन करणाराला, खोटें बोलणाराला, किंवा अन्य कोणतेहिं कर्म करणाराला त्या कर्मापासून पाप जडत नाही. त्याचप्रमाणें कोणतेंहि चांगलें कृत्य केलें असतां पुण्यप्राप्रि होते, ही दृष्टिदेखील खोटी आहे.' याप्रमाणें भगवन्, पूरणकश्यपाला श्रामण्याचें प्रत्यक्ष फळ विचारलें असतां त्यानें आपला अक्रियावाद सांगितला.

''पुन: एकदां मीं हा प्रश्न मक्खलिगोसालाला विचारला होता. तेव्हां तो मलां ह्मणाला `प्राण्याच्या शुद्धीला किंवा संक्लेशाला कांही कारण लागत नाही. आपल्या प्रयत्नानें मनुष्य मोक्ष मिळत नसतो. मूर्ख किंवा शहाण्या मनुष्याला सर्व योनींत जन्म घेतल्यावर आपोआप मोक्ष मिळणार आहे.' याप्रमाणें मक्खलिगोसालाला मीं श्रामण्यफळासंबंधानें प्रश्न विचारला असतां त्यानें आपला संसारशुद्धिवाद पुढें केला.

"दुसर्‍या एका प्रसंगी अजित केसकंबालाला मीं हा प्रश्न विचारला असतां तो मला म्हणाला `बर्‍यावाईट कर्माचें फळ भोगावें लागतें, ही गोष्ट खोटी आहे. चार महाभूतांपासून हा देह बनलेला आहे. मनुष्य मृत्यु पावल्यावर पृथ्वीचा अंश पृथ्वींत जातो, वायूचा अंश वायूंत, उदकाचा अंश उदकांत, आणि अग्नीचा अंश अग्नींत जातो; मनुष्याच्या मरणोत्तर कांहीएक शिल्लक रहात नाहीं. दानाची प्रशंसा केवळ मूर्ख मनुष्यें करीत असतात; त्यांच्या बोलण्यांत कांहींच अर्थ नसतो.' याप्रमाणें अजित केसकंबालाला मीं श्रामण्यफलासंबंधानें प्रश्न केला असतां त्यानें आपला उच्छेदवाद प्रतिपादिला.

"भगवन् एकदां पकुध कात्यायनाला मी हा प्रश्न विचारला असतां तो मला म्हणाला `पृथ्वि, उदक, तेज, वायु, सुख, दु:ख आणि जीव, हे सात पदार्थ नित्य आहेत. ते कोणींच उत्पन्न केलें नाहींत. अर्थात् एकाला दुसरा मारतो किंवा मारवितो, ही गोष्ट खोटी आहे.' याप्रमाणें एकुध कात्यायनाला मीं श्रामण्यासंबंधानें प्रश्न केला असतां त्यानें आपला सप्तपदार्थवाद किंवा अन्योन्यवाद सांगितला.

"नंतर एकदां मी निर्ग्रंथ नाथपुत्राला भेटलों व त्याला प्रश्न विचारला, तेव्हां तो मला म्हणाला `निर्ग्रंथ कोणत्याच पापाला शिवत नसतों; सगळ्या पापाचा नाश करण्याचा तो प्रयत्न करितो; सर्व पाप धुऊन टाकितो आणि पापावरणापासून मुक्त राहतो. याला मी चातुर्यामसंवरसंवृत्त असें म्हणतों.' याप्रमाणें निर्ग्रंथ नाथपुत्राला मीं श्रामण्यफलासंबंधानें प्रश्न विचारिला असतां त्यानें आपला चातुर्यामसंवर सांगितला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel