संजय बेलठ्ठपुत्राला जेव्हां मीं हा प्रश्न विचारला, तेव्हां तो मला म्हणाला `तुम्ही जर परलोक आहे काय असें विचाराल, तर तें मला ठाऊक नाहीं. परलोक नाहीं हें देखील मला ठाऊक नाहीं. प्राण्याला कर्माप्रमाणें फळ मिळतें किंवा नाही, हें मला सांगतां येत नाहीं. तथागत मरणानंतर उत्पन्न होतो किंवा नाहीं, हेंहि मी सांगू शकणार नाहीं.' याप्रमाणें बेलठ्ठपुत्राला श्रामण्यफलासंबंधानें प्रश्न विचारला असतां त्यानें आपला विक्षेपवाद (अज्ञेयवाद) सांगितला.

"भगवन्, यांपैकीं एकादा देखील माझ्या मनाचें समाधान करूं शकला नाहीं; पण माझ्यासारख्या राजाला श्रमणांचा कोणत्याहि रीतींनें अपमान करणें प्रशस्त नाहीं, असा विचार करूं या आचार्यांविरुद्ध कांहीएक न बोलतां मी मुकाट्यानें माघारा आलों.''

बुद्ध म्हणाला "महाराज, तुझा एकादा दास आपल्या दुर्गत स्थितीला कंटाळून भिक्षु होईल, व मोठ्या साधुत्वानें वागेल. अशा मनुष्याला तूं पकडून पुन: दासकर्म करावयाला लावशील काय?''

अजातशत्रु म्हणाला "नाहीं. अशा मनुष्याला मी माझ्यासमोर आसन देईन; आणि वस्त्रान्नाची त्याला ददात पडूं नये, अशी व्यवस्था करीन.''

"तर मग महाराज, श्रामण्याचें हे प्रत्यक्ष फल म्हणतां येणार नाहीं काय?''

"भगवन्, नि:संशय याला श्रमण्याचें प्रत्यक्ष फल म्हणतां येईल.''

बुद्ध म्हणाला "एकादा दरिद्री मनुष्य आपल्या अल्प संपत्तीचा त्याग करून भिक्षु होईल, व भिक्षूला पाळावयाचे जे नियम असतात ते सर्व पाळील. पोटापुरत्या अन्नानें आणि देहआच्छादनापुरत्या वस्त्रानें तो संतुष्ट होईल, व लोभ, क्रोध, आळस, चंचलता आणि कुशंका या पांच आवरणांपासून आपलें चित्त मुक्त करून तो सावधगिरीनें वागेल. जसा एकादा मनुष्य ऋणांतून मुक्त व्हावा, किंवा भयंकर व्याधींतून मुक्त व्हावा, बंधनागारांतून मुक्त व्हावा, दास्यांतून मुक्त व्हावा, अथवा जंगलांतून सुरक्षितपणें पार पडावा, तसा हा भिक्षु या चित्ताच्या पांच आवरणांपासून मुक्त होऊन सर्व ध्यानाचा लाभ करून घेईल; तेव्हां त्याला प्रत्यक्ष श्रामण्यफल मिळालें, असें म्हणण्यास हरकत राहील काय?''

अजातशत्रु म्हणाला "भगवन्, त्यासा नि:संशय श्रामण्याचें फल मिळतें, असें ह्मणावें लागेल.''

आणखीहि निरनिराळ्या मार्गानें बुद्धानें श्रामण्याचें प्रत्यक्ष फल कसें मिळतें हें सांगितल्यावर अजातशत्रु बुद्धाला, धर्माला आणि संघाला शरण जाऊन बुद्धोपासक झाला, व ह्मणाला "भगवन्, मी मोठा अपराध केला आहे. मी अत्यंत मूर्खपणानें माझ्या धार्मिक पित्याच्या मरणाला कारण झालों, याजबद्दल मला पश्चात्ताप होत आहे. भगवन्, या अपराधाची मला क्षमा करा.''

बुद्ध म्हणाला "महाराज, हा तुझा अपराध झाला, यांत संशय नाहीं; पण या अपराधाबद्दल तुला पश्चात्ताप होत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल पश्चात्ताप होणें, आणि पुन: तसा अपराध होऊं न देणें, हें आर्यश्रावकातें कर्तव्य होय.''

अजातशत्रु म्हणाला "भगवन्, मीं आतां जातों. माझ्यामागे पुष्कळ कामें आहेत.''

"ठीक आहे,'' बुद्धाने उत्तर दिलें.

अजातशत्रु निघून गेल्यावर बुद्ध भिक्षूंनां म्हणाला "या राजाच्या हातून जर पितृहत्येचें पाप घडलें नसतें, तर येथल्या येथेंच याला सोतापत्तिफलाचा लाभ झाला असता!''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel