(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
योगिताचा जन्म झाला आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला.मुलगी होवो किंवा मुलगा होवो कुणीही चालले असते.तिच्या आईला मुलगा हवा होता .तर तिच्या बाबाला मुलगी हवी होती . योगिताच्या आईच्या,सुधाच्या सासू सासरे व आई वडिलांनी तिला सांगितले या वेळी नाही तर पुढच्या वेळी तुला मुलगा होईल.रंजीस होऊ नकोस. योगिताच्या आईबाबांनी सुधा व सुधाकरने, डॉक्टरने सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट अजून कुणालाही सांगितली नव्हती.डॉक्टरनी स्पष्टपणे सांगितले होते की यापुढे मूल होऊ देणे सुधाच्या प्रकृतीला योग्य ठरणार नाही. तिच्या जीवाला धोका संभवतो.
दोघांनीही यापुढे मूल होऊ द्यायचे नाही असे ठरविले होते .बाबांचा काही प्रश्न नव्हता. त्यांना मुलगीच हवी होती .आईने तिला मुलासारखे वाढवायचे ठरविले. मुलाची हौस योगितावर भागवायची असे ठरविले. जवळजवळ पाच सहा वर्षांपर्यंत ती मुलासारखीच वाढवली गेली .बाहुल्या, बार्बी ,भातुकली, अग संबोधन,मुलींचे खेळ,तिच्यापासून कटाक्षाने दूर ठेवण्यात आले . तिचे खेळही मुलांचेच असत.विटीदांडू हुतूतू इत्यादी.
बाबांना हे काही विशेष पसंत नव्हते.शेवटी ती मुलगी म्हणूनच मोठी होणार आहे .तेव्हा ती मुलगी म्हणूनच मोठी झालेली चांगली असे त्यांचे मत होते.लहानपणी जे संस्कार होतात ते दृढ असतात.मुलीवर मुलीचेच संस्कार झाले पाहिजेत.आपली मते आपल्या जवळ सुधाचे समाधान त्यात आहे ना? तिला आनंद मिळत आहे ना? विशेष कांही बिघडत नाही. वळचणीचे पाणी वळचणीलाच जाणार. त्यांनी जे चालले होते त्यात विशेष ढवळाढवळ केली नाही.योगिताच्या ऐवजी सुधाने तिचे नाव योगेश्वर ठेविले.योगा योगू अशी हांक न मारता ती योगिताला योगेश्वर म्हणूनच नेहमी कटाक्षाने हांक मारीत असे.
शाळेत नाव घालताना अर्थातच मुलगी योगिता म्हणून तिचे नाव घालावे लागले.
लहानपणापासूनच योगिता मुलांसारखी बेधडक होती.मुलांचे खेळ तिला आवडत .मुलांमध्ये खेळणे तिला आवडे .नाजूकपणा असा कुठेही नव्हता .दोन द्यावे,दोन घ्यावे ,मस्ती करावी, उंडारावे,बिनधास्त असावे,असा तिचा स्वभाव होता.बाबांना त्यामध्ये काही गैर वाटत नसे.मुलगा म्हणून वाढविल्यावर असे होणारच .त्यांनीही तिला,संगीत नृत्य याऐवजी कराटे जुडो या क्लासना घातले होते.मुलांना काय आणि मुलींना काय स्वसंरक्षण व गरज पडल्यास आक्रमण करता आले पाहिजे असे त्यांचे मत होते .
थोडक्यात ती एकूण पुरुषी होती. आईनेही तिला मुलगा म्हणून वाढविले होते.तसेच संस्कार तिच्यावर झाले होते.ती अकरा बारा वर्षांची झाली आणि तिच्या शरीरात मुलीला अनुरूप असा फरक पडू लागला.ती वयात आली. ती पूर्ण मुलगी झाली.तिच्यात काहीही कमी नव्हते . तिचा स्वभाव धीट आक्रमक पुरुषी असा होता.साडी नेसणे तिला आवडत नसे.नटणं मुरडणं कुंकू काजळ केशभूषा ब्युटी पार्लर या पासून ती कोसो दूर होती.सलवार कमीज ती क्वचित घालीत असे.सुटसुटीत पडतो म्हणून ती पॅन्ट टी शर्ट घालीत असे .नाही म्हणायला तिने केस वाढविले होते. शोल्डर कट केला होता. लहानपणी तर ती हाप पँट घालून फिरत असे.
असे असले तरी ती दिसण्यात पुरुषी नव्हती.ती एक बऱ्यापैकी देखणी मुलगी होती. मध्यम उंची,उंच कपाळ,बदामी डोळे, किंचित दाट भुवया,निमुळती हनुवटी,गहू वर्ण,ओष्ट शलाका न लावताही तारुण्याने रसरसलेले गुलाबी ओठ,काळेभोर दाट केस, एखाद्या तरुणाला घायाळ करण्यास पुरेशी सामुग्री तिच्याजवळ होती .
ती कॉलेजात गेली .कॉम्प्युटर इंजिनीअर झाली .नोकरीलाही आयटी क्षेत्रात लागली .तिचा पुरुषी पोषाख कायम होता .कॉलेज, सोसायटी आणि आता ती जिथे काम करत होती तिथे, तिला अनेक मित्र होते .त्यातील कुणाशीही ती लग्न करील असे दिसत नव्हते .
तिची आई तिच्या बाबांजवळ नेहमी म्हणत असे.मी उगीचच योगिताला योगेश्वर म्हणून वाढविले .लहानपणी तिच्यावर पुरुषी संस्कार झाले.या पोरीचे होणार कसे?हिला नवरा मिळणार कसा ?हिच्या प्रेमात पडणार कोण ?लग्न झाल्यावर ही प्रत्येक गोष्टीत नवऱ्याचा सहभाग मागत राहील.त्यावर योगिताचे बाबा म्हणत त्यात गैर काय आहे?संसार दोघांचा आहे. खांद्याला खांदा लावला म्हणून काय झाले .पुढे तिचे बाबा म्हणत.योग्य वेळी सर्व काही ठीक होईल.काळजी करू नको ."लग्नाआधी पती निपजवतो वधू तिच्या भार्ये". शेवटी बाई ती बाई तुम्हाला मी काय म्हणते ते कळायचे नाही. असे आई म्हणत असे आणि त्या संभाषणाचा शेवट होत असे.
तिच्या लग्नाचा विषय निघाला की नेहमी योगिता म्हणे घाई काय आहे ?करूं सावकाश.त्यावर वेळच्या वेळी सर्व गोष्टी झाल्या म्हणजे ठीक असते असे तिची आई म्हणत असे .
बघता बघता योगिता अठ्ठावीस वर्षांची झाली होती .नेहमी तिची आई तिला म्हणे.या वयात तू मला झाली होतीस आणि चार वर्षांची होतीस.योगिता म्हणे तुझा काळ वेगळा, माझा काळ वेगळा.त्यावर तिची आई म्हणे मुले जन्माला नउ महिने नऊ दिवसांनीच येतात.मुली काय आणि मुले काय वयात यायची तेव्हाच येतात. योगिता म्हणे पुरे झाले आई आता आणखी वाढवू नकोस. सगळे माझ्या लक्षात आले .
एकूण काय तर मुलीचे लग्न ही सुधाच्या काळजीची बाब होती.काही माणसांचा स्वभावच असा असतो .काळजी केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.काळजी करण्यासाठी असे लोक कारणे शोधून काढीत असतात .मूल होत नाही म्हणून काळजी, मुलगी झाली म्हणून काळजी,पुढे तिचे लग्न होत नाही म्हणून काळजी ,लग्न झाल्यावर तिचे सासरी कसे होईल म्हणून काळजी.काळजीच काळजी असो.
योगिता आपल्या प्रकृतीची काळजी नेहमीच घेत असे .योग, योग्य व्यायाम, योग्य आहार,त्यामुळे तिची प्रकृती नेहमी तंदुरुस्त असे .ती बारीक जरूर होती .परंतु कृश नव्हती.तिच्या शरीराला जिथे हवी तिथे गोलाई होती.
रोज सकाळी पार्कमध्ये जॉगिंगला जायची तिची सवय होती.आजही ती त्याचप्रमाणे गेली होती.ती ट्रॅकवरून धावत असताना तिला आजपर्यंत न दिसलेली एक नवीन व्यक्ती दिसली. तीस पस्तिशीचा तो तरुण असावा .ट्रॅकवरून न धावता किंवा न चालता तो एकाच जागेवर उभा राहून तो त्याच्या मोबाइलवर जरा मोठ्या आवाजात बोलत होता .ते पाहून योगिताला त्या तरुणाचा जरा रागच आला.एका वेळी एकच काम करावे असे तिचे कांहीसे योग्य तर कांहीसे एकांतीक मत होते.व्यायामाच्या वेळी व्यायाम, गप्पांच्या वेळी गप्पा, कामाच्या वेळी काम,असा तिचा नियम होता .याविरुद्ध बरेच लोक वागताना प्रत्यक्षात दिसत.कुणाला त्यात काही चूकही वाटत नसे. एकाच वेळी काही लोक तर यशस्वीपणे अनेक कामे करताना दिसत .ते ती मान्यही करीत असे .तरीही तिचे मत कायम होते.
हल्ली कुणीही केव्हाही कुणालाही त्याला स्वत:ला वेळ असेल तेव्हा फोन करतो .आणि तो घेतलाही जातो .गाडी चालवीत असतानाही फोन घेतला जातो .किंवा दुसऱ्याला केला जातो .त्यामुळे अनेक अपघात घडतात.
दुसऱ्याला वेळ असेल तेव्हा तो फोन करणार त्यात काही विशेष चूक नाही.तरीही काळ वेळ बघितला पाहिजे. दुसर्यांची सोय गैरसोय लक्षात घेतली पाहिजे.आपल्याला वेळ नसेल, आपल्याला गैरसोयीचे असेल,तर नंतर फोन करतो असे स्पष्ट सांगावे .वेळप्रसंगी फोन कट करायलाही हरकत नाही. असे तिचे प्रांजल मत होते .आपल्या मतावर ती ठाम होती .
तिची मते प्रत्येकाला पटतीलच असे नाही.निदान व्यायामाच्या वेळी व्यायाम असे असावे असे तिचे मत होते. काही वेळा ती ते अनोळखी इसमाला बोलूनही दाखवीत असे.त्यावर तिचे मत पटले नाही तरी काहीजण तिच्याकडे पाहून गप्प बसत असत.पण काही जण आमचे आम्ही पाहून घेऊ तुम्हाला आमच्या प्रश्नात लुडबूड करण्याचे काम नाही असे (उद्धट)योग्य उत्तर देत असत .
बहुतेक वेळा तिला चूक वाटले तरी ती गप्प बसत असे.आज तिला गप्प राहावे असे वाटेना.त्या तरुणाची फिरकी घ्यावी असे तिला वाटले.तिने धावता धावता त्या तरुणाला सांगितले."एका वेळी एकच काम,फोनवर नंतर बोलता येईलना ?एवढे अर्जंट काय आहे ?" असे म्हणून ती ट्रॅकवरून पुढे धावत सुटली.त्या तरुणाचे तिच्याकडे ती अकस्मात बोलल्यामुळे लक्ष गेले .त्याने फोनवरील बोलणे बंद केले .किंचित गती वाढवत धावत त्याने तिला गाठले .तुमचे बोलणे अगदी बरोबर आहे.यापुढे मी लक्षात ठेवीन.पुढे आणखी काही न बोलता तो तिच्याबरोबर ट्रॅकवर धावत राहिला.
अशी दोघांची प्रथम ओळख झाली.फेर्या पुर्या झाल्यावर दोघेही एका बाकावर विश्रांती घेत ,गप्पा मारीत बसली.एकमेकांची चौकशी करताना दोघेही शेजारी शेजारी असलेल्या बिल्डिंगमध्ये काम करीत असतात असे त्यांच्या लक्षात आले .
कदाचित आता पर्यंत एकमेकांनी परस्परांना अनेकदा पाहिले असेलही परंतु ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली नव्हती.तो तरुण उमदा होता.एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग ऑफिसर म्हणून काम करीत होता .
दोघानाही एकमेकांचा स्वभाव पसंत पडला.तिचा आगाऊपणा त्याने खपवून घेतला.त्याचा उमदेपणा, त्याची दुसऱ्याला समजून घेण्याची पद्धत, तिला कुठे तरी अनुकरणीय वाटली.केंव्हाही कुणाशीही बोलताना तो स्वतःची मतें, विचार मध्ये आणित नसे.थोडक्यात तो एक उत्कृष्ट श्रोता होता .तिचा स्वभाव याच्या बरोबर उलट होता. दुसरा बोलत असताना ती सारखा त्याला विरोध करीत असे .टीका करीत असे .दुसऱ्याची मते खोडून काढीत असे .त्यामुळे तिच्याबद्दल ती उर्मट उद्धट आगाऊ आहे असे बऱ्याचजणांचे मत होत असे.
दोघे रोज भेटू लागली .त्यांचा ऑफिसला जाण्याचा रस्ता एकच असल्यामुळे बरोबरच येउ जाउ लागली .घरी परत येताना बर्याच वेळा कॉफीशॉपमध्ये कॉफी होत असे.योगिताला तिचा योगेश्वर भेटला असे वाटू लागले होते !योगितामध्ये तिला नकळत हळूहळू बदल होत होता.तिने तिचा पुरुषी पोशाख अजून सोडला नव्हता तरीही नकळत ती स्वतःकडे जास्त लक्ष देऊ लागली होती.
योगिताच्या आईचे तिच्याकडे लक्ष होते.
आपली मुलगी मधूनच कुठेतरी हरवलेली असते.
आपल्याच विचारात गुंग असते .
विचारात असताना तिच्या चेहऱ्यावर किंचित हास्य उमटते.
ती आरशात जास्त वेळा स्वतःला निरखीत असते.
आपल्यातील स्त्रीत्वाची तिला जास्त जाणीव होत आहे .
ऑफिसात जाताना मंद सुगंधाचा स्प्रे ती कपड्यांवर मारते.
ती आपले कपडे जास्त कसोशीने निवडते.इत्यादी गोष्टी तिच्या आईच्या लक्षात आल्या होत्या.
एक ना एक दिवस आपली मुलगी आपल्याला सर्व काही सांगेल याची तिला खात्री होती.
तिची आई तिच्यातील बदल कौतुकाने निरखीत होती.
*एक दिवस तर योगिताने कमालच केली. ऑफिस सुटल्यावर तिने अभिजितला विचारले.*
*मला शॉपिंगला जायचे आहे.माझ्या बरोबर येणार का ?*
* तो तर एका पायावर तयारच होता..
(क्रमशः)
२६/६/२०२०©प्रभाकर पटवर्धन