पदमच्चुतमच्चतं असंखतमनुत्तरं।
निव्बानमिति भासन्ति वानमुत्ता महेसयो।।


ज्यांच्या वासनेचा क्षय झाला आहे असे महर्षी निर्वाण हें अच्युतपद आहे, त्याला अंत नाहीं, तें अत्यंत परिशुद्ध (असंस्कृत) आहे आणि तें लोकोत्तर आहे, असें म्हणतात (अभिधम्मत्थसंग्रह.)

अर्हत्पद प्राप्त झाल्याबरोबर निर्वाणाचा साक्षात्कार होतो. तथापि सर्व दु:खांचा नि:शेष नाश होत नाही. लोभद्वेषमोहजन्य मानसिक पीडा तेव्हांच नाहीशी होते;  परंतु शारीरिक दु:ख आयुष्य संपेपर्यंत रहातें. बुध्दाला छत्तिसाव्या वर्षीच निर्वाणपदाचा साक्षात्कार झाला होता. त्या वेळी त्यांचे लोभद्वेषादिजन्य मानसिक दु;ख नष्ट झाले. परंतु शीतोष्णरोगादिजन्य शारीरिक दु:ख पूर्णपणें नष्ट झालें नाहीं. देहावसानी तेंहि दु:ख नष्ट झालें. अर्हतांच्या मरणाला परिनिर्वाण म्हणतात. कारण मरणानें त्यांच्या शारीरिक दु:खाचाहि अंत होतो. परिनिर्वाणानंतर अर्हगत् कोणत्या स्थितीत असतो याचें वर्णन कोठे आढळत नाहीं. ती स्थिति अनिर्वचनीयच आहे. बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणाला महापरिनिर्वाण म्हणतात.

३.
चार आर्य सत्यें आणि आर्य अष्टांगिक मार्ग


चतुन्नं अरियसच्चानं यथाभूतं अदस्सना।
संसारितं दीघमध्दानं तासु तास्वेव जातिसु।।
तानि एतानि दिठ्ठानि भवनेत्ति समूहता।
उच्छिन्नमूलं दुक्खस्स नत्थि दानि पुनव्भवो।।

चार आर्य सत्यांचे यथाभूत ज्ञान न झाल्यामुळें दीर्घ काळपर्यंत त्या त्या योनींत जन्मलों. परंतु आतां या सत्यांचें ज्ञान झालें; व त्यामुळें तृष्णेंचा नाश झाला. दु:खाचें मूळ समूळ नष्ट झालें. आतां आणखी पुनर्जन्म राहिला नाहीं. (महापरिनिब्बाणसुत्त).

त्रिपिटकांत चार आर्य सत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहें. हीं कामे आर्य सत्यें बौद्धधर्माचा पाया आहेत असें म्हटलें असतां चालेल. बुद्ध भगवंतानें प्रथमत: वाराणसींत पंचवर्गीय भिक्षूंनां या चार आर्य सत्यांचाच उपदेश केला. हा उपदेश पहिल्या व्याख्यानाच्या शेवटीं मी दिलाच आहे. या उपदेशाची अनेक सुत्तांतून विस्तृत व्याख्या केली आहे. अट्ठकथांकारांनींहि यावर विस्तारानें टीका लिहिली आहे. पहिल्या व्याख्यानांतील चार आर्य सत्याचें वर्णन धम्मचक्रपवत्तनसुत्तास अनुसरून केल्यामुळें अति संक्षिप्त झालें आहे. या आर्य सत्यांचा आमच्या वाचकवर्गास विशेष बोध व्हावा म्हणून त्या अति संक्षिप्त वर्णनाचा इतर सुत्तांतील वर्णनाच्या आधारें थोडा विस्तार करीत आहे.

दु:खसमुदय - या सगळ्या दु:खांचें कारण काय? कोणी म्हणतात, दु:ख हा आत्म्याचा धर्म आहे; कोणी म्हणतात, दु:ख जगताच्या कर्त्यांनें किंवा आपणांहून भिन्न अशा कोणत्या तरी व्यक्तीनें उत्पन्न केलें असावें; परंतु बुद्ध भगवान म्हणतो, दु:ख हा आत्म्याचा धर्म नव्हें किंवा तें दुसर्या कोणीतरी उत्पन्न केलें आहे, असेंहि नव्हे, तर ते कार्यकारणनियमानें उत्पन्न झालें आहे. तृष्णा आहे, म्हणून दु:ख आहे. तृष्णा नाहीं तर दु:खहि नाहीं. तृष्णा म्हणजे अतृप्ति. ती तीन प्रकारची. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. कामतृष्णा म्हणजे चैनीच्या पदार्थाची तृष्णा. या तृष्णेपासून जगाच्या दु:खांत मोठी भर पडली आहे. ‘‘कामतृष्णेनें क्षत्रिय क्षत्रियांबरोबर भांडतात. पिते पुत्रांबरोबर भांडतात, पुत्र पित्यांबरोबर भांडतात, आणि आप्त आप्तांबरोबर भांडतात. या चैनीसाठींच हीं सारी भांडणें होतात. १ (१ महादुक्खक्खंधसुत्त, मज्झिमनिकाय) बरें भांडण करून एखाद्यानें चैनीच्या पदार्थाचा मोठा वाटा मिळविला, तरी त्यापासून त्याला सुख होत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel