( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग  समजावा.)

वर्गामध्ये टाचणी पडली तरी आवाज  येईल एवढी शांतता होती.आशुतोष सरांचा तास चालू होता.सर इंग्रजी शिकवत असत.इंग्लिश विषय घेणार्‍यांसाठी पदवीपर्यंत व पदव्युत्तर शिक्षणातही प्रत्येक वर्षी शेक्सपियरचे एक तरी नाटक अभ्यासाला असेच.प्रत्येक पातळीवर सरांचा नाटकासाठी एखादा तरी पिरिएड असेच.शेक्सपियरचे नाटक शिकवताना सर अगदी तल्लीन होऊन जात असत.सर त्या त्या भूमिकेत शिरून अभिनयासह त्या त्या विशिष्ट पात्राचे वर्णन करीत असत.केवळ त्यांच्याच वर्गातील नव्हे तर इतर वर्गातील विद्यार्थीही सरांचा शेक्सपिअरवर आज तास आहे असे म्हटले कि गर्दी करून वर्गात बसत असत.केवळ आर्टसचे विद्यार्थी नव्हे तर कॉमर्स, सायन्स, या शाखांचे विद्यार्थीही त्यांच्या तासाला येऊन बसत असत.इतर वर्गातील विद्यार्थी आपल्या तासाला येऊन बसतात याची सरांना अर्थातच कल्पना होती.त्यांनी कधीही अशा मुलांना मज्जाव केला नाही.जेवढी वर्गात गर्दी जास्त तेवढा त्यांचा शिकवण्याचा उत्साह वाढत असे.    

प्रत्येक पात्राचे वर्णन करताना, त्याचे गुण व अवगुण यांचे विश्लेषण करताना, त्यांचा अभिनय पाहण्यासारखा असे.आशुतोष सर त्या त्या भूमिकेत शिरत असत.हॅम्लेटचे वर्णन करताना ते हॅम्लेट होत तर त्याच्या  सावत्र  बापाचे किंवा त्याच्या आईचे वर्णन करताना जणू काही ते तेच होत असत.हॅम्लेटच्या निरनिराळ्या आवृत्त्याही आहेत.त्या निरनिराळ्या आवृत्त्यामध्ये थोडा थोडा फरक आहे.तोही ते चांगला समजावून देत असत.स्त्रीपात्राचे वर्णन करताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहाण्यासारखे असत.त्यांचा आवाजही मृदू मुलायम किनेरा होत असे.सरांच्या रक्तात शेक्सपियरची नाटके वाहत असत.शेक्सपिअरन भाषा कळण्याला कठीण आहे.कुठच्याही भाषेच्या बाबतीत हेच होते.काळाच्या ओघाबरोबर भाषेमध्ये बदल होत जातात.त्यामुळे जुनी भाषा समजायला कठीण जाते.ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना  अर्थातच समकालीन भाषा वापरली.आज आपल्याला ज्ञानेश्वरीतील भाषा कळत नाही.त्यामुळे ज्ञानेश्वरी अर्वाचीन भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न अनेक जणांनी केला आहे.शेक्सपियरच्या नाटकांबद्दलही तेच आहे. 

आशुतोष सर उंचेपुरे सावळे आणि बऱ्यापैकी देखणे होते.वर्गात सर्वच मुली त्यांच्याकडे टक लावून पाहात असत.ते अविवाहित आहेत असा सर्वांचा समज होता.त्यांना त्यांच्या पत्नीबरोबर फिरताना कधीच कुणी पाहिले नव्हते.ती भूमिका आपल्याला मिळावी असे त्यांच्या वर्गातील व इतर वर्गातील मुलींनासुद्धा वाटत असावे. 

सुमित्रा त्यापैकी एक होती.वर्गात बसून प्रत्येकवेळी हनुवटीवर हात टेकून सरांकडे अनिमिष नेत्रांनी ती टक लावून पाहत असे.नोट्स काढण्यापेक्षा ती त्यांचे भाषण ऐकण्यात आणि त्यांच्याकडे पाहण्यातच वेळ दवडत असे.  

ती सरांच्या प्रेमात पडली होती.सरांची सर्वच विद्यार्थ्यांशी व विद्यार्थिनीशी वर्तणूक एकाच प्रकारची असे.तिने त्यांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचे ठरविले.डिफिकल्टी विचारायला जाणे हा एक राजमान्य  मार्ग होता.सराना कॉमनरूममध्ये भेटायला त्यानिमित्ताने ती वारंवार जात असे.सर्वच मुलींचे आपल्याकडे लक्ष असते याची सराना कल्पना होती.त्यावरून त्यांचे सहकारी प्राध्यापक त्यांना चिडवतही असत.कांहीवेळा मुलींनी त्यांना गराडा घातलेला असे.त्यावेळी जसा गोपीत कृष्ण तसे तुम्ही दिसता असे त्यांचे मित्र त्यांना चिडवीत असत.  

सुमित्रेच्या नजरेतून, तिच्या वारंवार भेटण्यावरून, ती आपल्यात गुंतली आहे.दिवसेंदिवस जास्त जास्त गुंतत जात आहे याची त्यांना कल्पना आली होती.आपण विवाहित आहोत हे तिला कसे समजावून सांगावे हे त्यांना कळत नव्हते.त्यांचा प्रेमविवाह झालेला होता.कॉलेजात शिकत असतानाच ते एका मुलीच्या प्रेमात अडकले होते.दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला होता.त्यांची पत्नी नंदिनी एक वर्षाचा कोर्स करण्यासाठी परदेशात गेली होती.याची अर्थातच मुलाना कल्पना नव्हती.

दरवर्षी कॉलेजात स्नेहसंमेलन मोठ्या दणक्यात पार पडत असे.यावर्षी इंग्लिश नाटक करावे.निदान त्यातील कांही प्रवेश करावे असा विचार कांहीजणांनी मांडला.शेवटी हो ना करता करता ऑथेल्लो नाटकातील कांही प्रवेश करावेत असे ठरले.सुमित्रा वर्गप्रतिनिधी होती.तिने डेस्डिमोनाची भूमिका करावी असे ठरले.ऑथेल्लोची भूमिका करण्यासाठी कुणी मिळत नव्हते.भूमिका करण्यासाठी कांही विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली.शेक्सपियरची भाषा कुणालाही पेलवत नव्हती. शेवटी ऑथेल्लोची भूमिका सरांनी करावी असे ठरविण्यात आले.डेस्डिमोनाचा सुमित्राचा आनंद गगनात मावेना.तालमीच्या निमित्ताने दोघेही जास्त जवळ आली.सरांपेक्षा सुमित्रा जास्त जवळ आली असे म्हणणे योग्य ठरेल.

आशुतोषही आपणावर प्रेम करतात अशा गोड समजुतीत सुमित्रा होती.तिची जवळीक अाणि डोळ्यांतील भाव दिवसेंदिवस गडद होत जात होते.या सर्वाला वेळीच आळा घातला पाहिजे असे सरांनी ठरवले.आशुतोष सर आपल्याबाजूने सुमित्राजवळ अंतर राखून होते.सुमित्रा मात्र जास्त जास्त  भावनिक दृष्ट्या व शारीरिकदृष्टय़ाही सरांजवळ येत होती.एक दिवस सरांनी तिला त्यांचे लग्न झाले आहे. त्यांची पत्नी परदेशात एक वर्षाच्या कोर्ससाठी गेली आहे. वगैरे गोष्टी सांगितल्या.त्यांच्या पत्नीचा नंदिनीचा फोटोही तिला दाखविला.

सुमित्रावर अक्षरशः आकाश कोसळले.एक दिवस तर ती अन्नपाण्याशिवाय होती.आपल्या लेकीला अकस्मात काय झाले ते तिच्या आईला कळेना.दोन दिवस तर ती कॉलेजात गेली नाही तालमीलाही हजर राहिली नाही.तिच्या मैत्रिणी तिच्या घरी गेल्या.सुमित्रेने तिची प्रकृती बरी नाही म्हणून सांगितले.तिच्यामुळे स्नेहसंमेलनातील महत्त्वाच्या नाटकाच्या तालमी व्यवस्थित होत नाहीत. तू निदान तालमींना तरी हजर रहा असे त्यांनी सांगितले.आशुतोष सरांचा निरोप मुलीनी तिला दिला.तिच्या एका मैत्रिणीने सरांना फोन लावला.सर तिच्याजवळ फोनवर बोलले.सरांचा शब्द ती मोडू शकत नव्हती.ती आपले सर्व दु:ख गिळून तालमीना हजर राहू लागली.

ऑथेल्लो नाटकातील शेवटचे कांही प्रवेश करण्यात येणार होते.ऑथेल्लोला त्याची पत्नी  डेस्डिमोनाचा संशय येतो.तो तिचा गळा दाबून तिची हत्या करतो.या प्रवेशाच्या वेळी सुमित्राला सरांनी खरेच आपला गळा दाबून जीव घ्यावा असे वाटत होते.अर्थातच तसे झाले नाही.नाटक संपले तरी सुमित्राच्या मनातील वादळ तसेच होते.तिचे मन सर दुसर्‍याचे आहेत, आपले होऊ शकत नाहीत, हे तिला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते.परंतु सुमित्राची मन:स्थिती ताळ्यावर येत नव्हती.तिला सर्व काही समजत होते परंतु उमजत नव्हते.

अशाच विमनस्क स्थितीत रस्त्यातून जात असताना,तिचा अपघात झाला.  भरधाव वेगाने येणारी एक मोटार तिच्या  लक्षात आली नाही.जेव्हां लक्षात आली आणि दूर होण्याचा तिने प्रयत्न केला त्यावेळी वेळ निघून गेली होती.ती मोटारीखाली आली होती.होत्याचे नव्हते झाले.सुमित्रा आता या जगातून निघून गेली होती.कॉलेजमध्ये सर्वांनीच तिच्याबद्दल हळहळ व्यक्त केली.एक शोकसभाही आयोजित करण्यात आली होती.त्यात कांही विद्यार्थी, विद्यार्थिनी, आशुतोष सर व प्राचार्य यांनी भाषणे दिली.शोकप्रस्ताव आणि सांत्वनपर पत्र तिच्या घरी घेऊन स्वतः आशुतोष सर गेले होते.

प्रत्यक्षात सुमित्रा या जगातून गेली नव्हती.ती जरी देहरूपाने या जगात नसली तरी अमानवी अस्तित्व या दृष्टीने ती या जगात होती.तिला सरांशी लग्न करायचे होते.सरांबरोबर संसार करण्याचे स्वप्न ती पाहात होती.तिच्या मनाने सरांबरोबरच्या  तिच्या संसाराची अनेक चित्रे पाहिली होती.आशुतोष सराना पाहिल्यापासून, तिचे मनोरंजन चालत असे.सरांबरोबर संसार करण्याची स्वप्ने ती पाहत होती.  सरांचे लग्न झालेले नाही असे ठामपणे तिला वाटत होते.त्यामुळे तर तिने कल्पनेने अनेक मनोरे रचले होते.

तिची वृत्ती, तिची नजर, तिची इच्छा, लक्षात आल्यावर सरांनी तिला आपल्यापासून विशिष्ट अंतरावर ठेवण्याचा प्रयत्न केला होता.ती लक्षात घेत नाही. तिला समजत नाही किंवा समजूनही ती न समजल्यासारखे वागते हे लक्षात आल्यावर त्यांनी तिला स्पष्टपणे त्यांच्या प्रेमविवाहाबद्दल कल्पना दिली होती.तिला सर्व कांही समजले होते.तरीही तिला कांहीही समजले नव्हते.तिची इच्छा अतृप्त राहिली होती.सरांशी  तिला संसार करायचा होता.सरांबरोबर संपूर्ण आयुष्य घालवण्याचे स्वप्न ती पाहत होती.

ती हे जग सोडून गेली नव्हती.तिचा अतृप्त आत्मा इतस्ततः   भटकत होता.शहराजवळ एक नैसर्गिक तलाव होता.त्याच्या काठी वड पिंपळ चिंच यासारखी अनेक   झाडे होती.झाडांच्या गर्द राईमळे दिवसासुद्धा तिथे अंधार वाटत असे.आकाशात ढग असत त्यावेळी आणि पावसाळ्यात तर तिथे बऱ्याच वेळा तिन्हीसांज झाल्यासारखे भरदुपारी वाटत असे.एका चिंचेच्या झाडाच्या कांही फांद्या तलावावर वाकलेल्या होत्या.

*त्या झाडावर सुमित्रेने आपला मुक्काम ठोकला होता.*

* तिची इच्छा कशी पूर्ण होणार होती?*

*ती आपली इच्छा कशी पूर्ण करून घेणार होती?*

*अपूर्ण इच्छा असताना ती पुढील गतीला जाणार   होती का?*

*कांही चमत्कार होऊन ती पुन्हा मानवरूपात येणार होती का?*

*त्यावेळी तिची सरांशी भेट होणार होती का?*

*तिच्या इच्छा आकांक्षा कशा पूर्ण होणार होत्या?*

*तिच्या जगात ती सराना घेऊन जाणार होती का?*

*ती नंदिनीला सरांबरोबर संसार करू देणार होती का?*

*जे मला मिळत नाही ते मी तुलाही मिळू  देणार नाही अशा हट्टाला ती पेटणार होती का?*

*या जगात असताना ती चांगली, सत्प्रवृत्तीची, सद्गुणी, सज्जन, सुस्वभावी, मुलगी होती.भूतयोनीतही ती तशीच होती का?*

*का तिच्या स्वभावात या जगात आल्यावर कांही विष मिसळले होते?*

*त्यामुळे सरांच्या संसारावर अशुभाची, गडद छाया पसरणार होती का?*.

*असे अनेक प्रश्न होते.भविष्यकाळच त्याचे उत्तर देणार होता.*

*भविष्याच्या पोटात काय दडले आहे ते कुणालाच माहीत नव्हते.* 

(क्रमशः)

७/३/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel