( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
मी या मोठय़ा बंगल्यात?कैद आहे.येथून माझी सुटका होईल कि नाही सांगता येत नाही.प्रथम मी येथे आलो तेव्हा मला खूप छान वाटत होते.इतका सुंदर बंगला मी अगोदर क्वचितच पाहिला होता.मी आता दिवाणखान्यात आहे. दिवाणखान्याच्या लांबीच्या समोरासमोरील दोन भिंतींना फिकट निळा आणि गर्द निळा रंग दिलेला आहे.तर रुंदीकडच्या भिंतींना फिक्कट हिरवा व गर्द हिरवा रंग दिलेला आहे.दिवाणखान्यात दोन सोफासेट,शिवाय कांही खुर्च्या व एक झुलती आरामखुर्ची आहे.बाहेरील दोन बाजूच्या भिंतींना एका बाजूला तीन व दुसर्या बाजूला दोन अशा एकूण पांच खिडक्या आहेत.उरलेल्या दोन भिंतींना दोन दोन दरवाजे आहेत.सुरुवातीला जेव्हां मी या दिवाणखान्यात आलो तेव्हां एकदम खुष होतो.खिडक्यांना फुलाफुलांचे पडदे लावलेले होते.दरवाजावर प्लेन रंगाचे पडदे होते.सर्व पडदे भिंतीच्या रंगाला मॅचिंग होते.दिवाणखान्यात अद्भुत मंद प्रकाश होता.बाहेरच्या बाजूच्या भिंतींना फक्त खिडक्या आहेत दरवाजा नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती.मी आंत कसा आलो?कुणी आणले? कां आणले? कांहीच माहीत नव्हते.आंत आलो खरा परंतु बाहेर कसा जाणार याचा विचारच माझ्या मनात आला नव्हता.
आकाशातून टपकल्यासारखा मी एकदम या दिवाणखान्यात आलो होतो.रात्री नेहमीप्रमाणे मी माझ्या घरी झोपलो होतो.आईवडील गावाला असतात.माझा स्वतंत्र फ्लॅट आहे.माझे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीचे छोटेसे दुकान आहे.माझे एकूण छान चालले आहे.
येथे मी एकटाच असतो. कलिका माझी प्रेयसी,तिच्याबरोबर मी नदीकाठी फिरायला गेलो होतो.नदीवरून येणारा गार वारा अंगात किंचित शिरशिरी निर्माण करीत होता.कलिकेला घट्ट बिलगून मी चाललो होतो.थंडीचे दिवस होते.नदीच्या पाण्यावरून येणार्या गार वाऱ्यामुळे जरी अंगावर काटा उभा राहत होता तरीही,कलिकेच्या उबदार सहवासामुळे त्याचा त्रास होत नव्हता.
कलिकेच्या सहवासात असलेल्या मला अकस्मात कुणीतरी उचलले आणि या दिवाणखान्यात आणून सोडले.मी डोळे उघडले तो हा दिवाणखाना मला दिसत होता.कलिका,नदी,सर्व कांही नाहीसे झाले होते.माझ्या लक्षात आले की मी झोपलो होतो.मला स्वप्न पडत होते.स्वप्नातून मी जागा झालो तो या दिवाणखान्यात होतो.मी दिवाणखान्यात आहे हेही स्वप्न नाहीना असे एकदा मला वाटले. मी स्वतःलाच जोरदार चिमटा काढला.आय आय असा उद्गार नकळत माझ्या तोंडून बाहेर पडला. खिडक्यांवरील पडदे बाजूला करावे आणि बाहेरील नजारा पाहावा,म्हणजे मी नक्की कुठे आहे ते मला कळेल म्हणून मी खिडकीजवळ गेलो.पडद्याला हात घातला तो भिंतीवर घासला गेला. पडदा हातात येत नव्हता.हात भिंतीवर घासत होता.
मग माझ्या लक्षात आले.भिंतीवर खिडकीचे उत्कृष्ट चित्र काढलेले होते. खिडकी, त्यावरील झुळझुळीत पडदा,पडदा अडकवलेली दांडी,पडद्यातून येणारा प्रकाश,या सर्वांचे इतके हुबेहूब चित्र काढले होते कि मी खिडकी आहे असे समजून भिंतीवरील पडदा दूर करण्यासाठी गेलो होतो.आता मात्र मी सतर्क झालो होतो. मी झपाट्याने दुसर्या खिडकीकडे गेलो.तेथेही मला तोच अनुभव आला.एकामागून एक उरलेल्या खिडक्यांकडे गेलो.सर्वत्र तोच अनुभव होता.कांही खिडक्यांवरचे पडदे दूर झालेले होते.काचेतून बाहेरीलआसमंत दिसत होते.खिडकीवर मी हलकेच बुक्की मारून पाहिली.भिंतीवर बुक्की मारल्यासारखी कळ माझ्या मस्तकात गेली.भिंतीवर खिडकी, काच व बाहेरील नजारा याचे चित्र हुबेहूब काढले होते. खरे काय व खोटे काय या संभ्रमात मी पडलो होतो.सर्व चित्रे इतकी हुबेहूब होती कि दरवाजे, सोफासेट, खिडक्या, झुलती खुर्ची, टेबल, खुर्ची, सर्व खरे वाटत होते.यातील खरे काय खोटे काय हे जवळ जाऊन हात लावून पाहिल्याशिवाय खात्री केल्याशिवाय कळणार नव्हते.
प्रत्येक गोष्टीची खात्री करून बघण्याचे मी ठरविले. आता मला दरवाजे तरी खरे आहेत कि खोटे असा संशय येऊ लागला होता.दरवाजावरील पडदा मी दूर करू शकलो.माझ्या नकळत एक सुटकेचा नि:श्वास बाहेर पडला.चला दरवाजा तरी खरा आहे.दरवाजा उघडा होता.दरवाजातून पलीकडे जाऊन काय आहे ते पाहावे असा विचार मी केला.दरवाजातून बाहेर जाऊ लागलो तो भिंतीवर माझे कपाळ जोरात आपटले.याचा अर्थ उघडय़ा दरवाजाचे चित्र भिंतीवर हुबेहूब रंगवलेले होते.
मी एक प्रकारच्या भुलभलैय्यात होतो.मला पांडवांसाठी मयासुराने बांधलेला राजवाडा आठवला.तेथे सपाट जागा दिसे पण पाणी असे. पाणी वाटे पण सपाट जागा असे.तलाव वाटे पण तलाव नसे.अशा अनेक चमत्कृती होत्या.तसाच कांहीसा प्रकार इथे होता.प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागणार होते. सपाट जागा म्हणून मी चालताना एखाद्या विहिरीत पडलो असतो.आणि माझा शेवट येथेच झाला असता.
मी सर्व दरवाजे नीट पाहिले.दोन ठिकाणी दरवाजाचे चित्र होते.दोन दरवाजे खरे होते.एकातून मी बाथरुममध्ये पोचलो.नाहीतरी मला बळकट लागली होतीच.बाथरूम सापडली नसती तर पंचाईतच होती.मी हाताने चाचपून बाथरूममधील नळ कमोड खरे आहेत ना याची खात्री करून घेतली.नंतर मोकळा झालो.बाथरूममधून पुन्हा बाहेर दिवाणखान्यात आलो.दुसऱ्या दरवाजातून मी एका शयनगृहात गेलो.शयनगृहाला खिडक्या व दरवाजे होतेच.त्यांतील कांही दरवाजे खरे व कांही खोटे होते. खिडक्या मात्र सर्व खोटय़ा होत्या. अत्यंत उत्कृष्ट चित्रे भिंतीवर रंगविलेली होती.खरा दरवाजा कोणता आणि चित्र कोणते ते बिलकुल कळत नव्हते. एका खर्या दरवाजातून मी स्वयंपाकघरात गेलो.तेथे मला दोन फ्रीज दिसले.एक चित्ररूप होता. तर दुसरा खरा होता.मी सतत हात पुढे करून चालत होतो.प्रत्येक ठिकाणी स्पर्श करून वस्तू आहे की चित्र आहे ते पाहत होतो.जरा बेसावधानी आणि कपाळमोक्ष अशी परिस्थिती होती.पायसुद्धा सावधानतेने टाकत होतो.सुदैवाने मला एक काठी मिळाली.तीही गंमत झाली.निरनिराळ्या डिझाइनच्या तीनचार काठय़ा एका कोपऱ्यात ठेवलेल्या होत्या.त्यातील एकच खरी होती. बाकी खोट्या होत्या.केवळ सुरेख चित्रे चितारली होती.पुढे काठी करून, काठी जमिनीवर टेकवून, अंदाज घेऊन,मी पुढे सरकत असे.
खरा फ्रीज मी उघडून पाहिला.फ्रीजमध्ये दुधाच्या भरलेल्या दोन पिशव्या सापडल्या.शेगडी चहा पूड होती.मला चहाची तल्लफ आली होतीच.मी चांगला दोन कप चहा करून घेतला.आता मला तरतरी आली होती.मी पुन्हा दिवाणखान्यात आलो.दिवाणखाना, बाथरूम, स्वयंपाकघर,सर्व मी काळजीपूर्वक पाहिले.बाहेर जाण्यासाठी एकही मार्ग उपलब्ध नव्हता.कांही दरवाजे खरे होते,कांही खोटे होते.खोटे दरवाजे बाहेरच्या भिंतींना होते.अंतर्गत भिंतींना असलेले दरवाजे दोन्ही प्रकारचे होते खरे व खोटे(चित्ररूप).या फ्लॅटला दोन शयनगृहे, एक किचन, एक दिवाणखाना,व तीन टॉयलेट्स होती.दोन शयनगृहाना दोन व दिवाणखान्याला एक.मला मिळालेल्या सर्व खिडक्या खोटय़ा होत्या.मी सर्व टॉयलेटच्या खिडक्या चेक केल्या.केवळ चित्रे होती. खिडकी नव्हती.असे असूनही वायुविजन कसे होत होते ते कळत नव्हते.दुसरी न कळणारी गोष्ट म्हणजे आंत प्रकाश कसा येत होता तेही कळत नव्हते.
थोडक्यात मी भुलभुलैयात होतो.मला कांही दिवस तग धरून राहता येईल एवढी येथे व्यवस्था होती. फ्रिजमध्ये कांही टिकाऊ खाद्यपदार्थ होते.त्यावर मी कांही दिवस काढू शकलो असतो.पिण्याच्या पाण्याच्या दोनच बाटल्या फ्रिजमध्ये होत्या.नळाचे पाणी पिऊन मी तग धरु शकलो असतो.
प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागणार होते.बाहेर जाण्याचा एकही मार्ग मला सापडला नव्हता.थोडक्यात मी येथे कैद झालो होतो.कैद झालो होतो म्हणण्यापेक्षा मला कुणी तरी मुद्दाम कैद केले होते.
मला माझा कुणीही शत्रू आठवत नव्हता.रात्री झोपलो असताना,छानपैकी स्वप्नात असताना,प्रिय कलिकेबरोबर आनंदात असताना मी येथे जागा झालो होतो.माझ्या फ्लॅटमधून मी येथे कसा आलो हाही एक मोठा प्रश्न होता.भूत, पिशाच्च, जीन,जादू, याशिवाय हे कसे शक्य होते. हा बंगला जादूचा वाटत होता.किंवा उत्कृष्ट चित्रकारांनी मुद्दाम लोकांना फसविण्यासाठी चित्रे काढली आहेत असा बंगला होता.खिडकी वाटावी ती खिडकी नव्हतीच ते चित्र होते.तीच अवस्था दरवाजाची.मी दोन सोफे पाहत होतो.येथून बाहेर कसे पडावे असा विचार करता करता मी एका सोफ्यात बसलो.प्रत्यक्षात तो सोफा नव्हताच ते उत्कृष्ट त्रिमिती चित्र होते.मी दाणकन जमिनीवर उताणा झालो होतो.माझी पाठ व बूड चांगलेच शेकले होते.
मला कुणी कैद केले असेल?इतका समर्थ कोण आहे?मला कां कैद केले असेल?झोपेत असताना मी येथे कसा आलो?मला येथे कसे आणले असेल?असा चित्रविचित्र बंगला कुणी तयार केला असेल? मला झोपेतून उचलून बंगल्यात आणण्याइतका समर्थ कोण आहे?असे अनेक प्रश्न मला पडले.या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच संभवत होते.
*जादूगार भीमसेन*
जादूगार रघुवीर , जादूगार के.लाल, असे अनेक प्रसिद्ध जादूगार भारतात होते व आहेत.त्यातीलच एक नाव भीमसेन होय.या भीमसेनची मुलगी कलिका हिच्याशी माझी ओळख योगायोगानेच झाली.
या कलिकेशी मी स्वप्नात नदीकाठाने फिरत होतो.अकस्मात मला स्वप्नातून कुणीतरी या जादूच्या विचित्र बंगल्यात आणून ठेवले होते.
मी असा विचार करीत असताना एकाएकी मला समोरच्या टेबलावर एक चिठी दिसली.ती चिठी हे चित्र तर नाही ना असा एक विचार माझ्या मनात आला.वार्यावर ती चिठी फडफडत होती.खिडकी नसताना, पंखा चालू नसताना, वारा कुठून येत होता, तोही एक प्रश्नच होता.प्रत्यक्ष जाऊन काय ते पाहूया असे म्हणून मी जाऊन चिठी उचलली.चिठी प्रसिद्ध जादूगार भीमसेन यांनी मला लिहिलेली होती.
*चिठी अशी होती.*
प्रमोद, मी तुला सावध करीत आहे.माझी मुलगी कलिका माझी जीव की प्राण आहे.तू तिला माझ्यापासून हिरावून घेत आहेस.तिचेही तुझ्यावर प्रेम असावे असे मला वाटते.मी तुझी छोटीशी परीक्षा घ्यायचे ठरवले आहे.त्यात तू पास झालास तर कलिकेशी लग्न करायची तुझी लायकी आहे.या बंगल्यातून बाहेर पडण्याला वाट आहे.माझ्या मनात असते तर मी तुला कायमचा कैद करून ठेवू शकलो असतो.मनात असते तर कुणालाही पत्ता लागू न देता तुझा अंतही करु शकलो असतो.परंतु तसे करावे असे मला वाटत नाही.तुझी परीक्षा मी घेऊ इच्छितो.माझ्या कलिकेशी लग्न करायची तुझी लायकी तुला सिद्ध करावी लागेल. तुला मी या बंगल्यात कैद केले आहे.या बंगल्यातून तू बाहेर पडू शकलास तर कलिका तुझी.बाहेर पडू शकला नाही तर तुझा शेवट येथेच ठरलेला आहे असे समज.या बंगल्यातून बाहेर पडायला वाट जरूर आहे.तुला ती शोधून काढावी लागेल.
खाली सही होती. ~जादूगार भीमसेन. ~
*माझा अंदाज अचूक ठरला होता.*
*या जादूगार भीमसेननेच मला येथे आणून ठेवले होते.*
*आता बाहेर जाण्याचा मार्ग मला शोधायचा होता.
*त्याचे बक्षीस दुहेरी होते.मला कलिका मिळणार होती.माझे प्राणही मला परत मिळणार होते.अन्यथा इथे अन्नाअभावी माझा मृत्यू झाला असता.*
(क्रमशः)
२६/१२/२०२१©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com