(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
*प्रिया*
हा स्वप्नील कधी मला प्रपोज करील असे वाटत नाही.त्याच्या डोळ्यात मला माझ्याविषयी प्रेम दिसते.आमची सामाजिक प्रतिष्ठा, आमची आर्थिक परिस्थिती, यामुळे तो दबावाखाली आहे असे वाटते.शिवाय तो व त्याचे वडील आमच्या इथे नोकरी करीत असल्यामुळे माझ्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणे, स्वप्नच आहे असे त्याला वाटत असावे .कारण काहीही असो परंतु तो पुढाकार घेईल असे मला दिसत नाही .मलाच पुढाकार घेतला पाहिजे .त्याला मी प्रपोज केले तर तो नक्कीच होकार देईल .परंतु आर्थिक स्तर सामाजिक प्रतिष्ठा यामुळे हे कसे शक्य नाही ते मला समजावून सांगत बसेल.
त्याला प्रपोज करायचे .त्याचा होकार आहेच परंतु त्याची नक्की खात्री करून घ्यायची,आणि पुढचे सगळे काही मी सांभाळून घेईन म्हणून त्याला आश्वस्त करायचे, असे मी ठरविले.जवळच्या एका खेड्यात माझ्या मैत्रिणीकडे काहीतरी कार्यक्रम होता .मला सोडण्यासाठी स्वप्नील आला होता . मी त्याला वाटेत मोटार थांबविण्यास सांगितले .माझे मन त्याच्याजवळ मोकळे केले .माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याने त्याची संमती केव्हाच आहे म्हणून सांगितले .नंतर मात्र पण परंतू इत्यादी सुरू केले.मी त्याला काहीही बोलू न देता ते सगळे मी बघून घेईन म्हणून सांगितले.
दुसऱ्या दिवशी मी आईजवळ स्वप्नीलबद्दल मोकळेपणाने बोलले.आई म्हणाली हे मी केव्हाच ओळखले होते .तुझ्या तोंडून तू केव्हा सांगतेस म्हणून वाट पाहात होते.मी आईला विचारले आम्ही दोघे पळून जाऊ असे तुला वाटले नाही का ?ती म्हणाली तू किंवा स्वप्नील अशा मुलांपैकी नाही हे मला माहीत आहे .आम्हाला विचारून आमच्या संमतीने नंतरच तुम्ही लग्न कराल हे मी जाणते .पुढे ती म्हणाली, माझा प्रश्न नाही. माझी संमती आहे.मला स्वप्नील जावई म्हणून पसंत आहे. मी तुझ्या वडिलांशी याबद्दल बोलेन परंतू त्यांची संमती मिळणे मला कठीण दिसते.
दुसऱ्या दिवशी बाबांना विचारण्याचे आईने कबूल केले.बाबांची समजूत घालण्याचा, त्यांची संमती मिळवण्याचा ,प्रयत्न करीन असेही सांगितले.मात्र त्यांची संमती मिळविणे कठीण आहे असेही सांगितले .
* काकासाहेब *
उगीच मी एवढे पावसाळे पाहिले नाहीत .प्रिया व तिची आई यांची काहीतरी कुजबुज कुजबुज चालली आहे हे माझ्या लक्षात आले.प्रियाची आई कशाबद्दल बोलणार आहे याचाही अंदाज आला.त्याप्रमाणे रात्री प्रियाच्या आईने तिच्या लग्नाचा विषय काढला .मीही माझ्या चार मित्रांना सांगून ठेवले आहे .माझा व्याप व्यवस्थित सांभाळील असा जावई पाहिजे हेही सांगितले आहे. अण्णासाहेब जाधवांचा भाचा लग्नाचा आहे.तो हुषार आहे. त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात तो त्यांना मदत करतो . प्रियासाठी तो अनुरूप आहे.त्यावर तिची आई म्हणाली ते सर्व खरे परंतु मुलीच्या मनाचा विचार केला पाहिजे .तिच्या मनासारखा मुलगा असला तर तिला सुख लागेल.ती आनंदी तर अापण आनंदी .तिच्या मनाविरुद्ध जर लग्न केले तर कुणालाच सुख लागणार नाही.त्यावर मी तिला म्हणालो, तिच्या संमतीशिवाय मी तिचे लग्न कसे काय ठरवीन? असे तुला वाटले तरी कसे ?
त्यावर तिने अपेक्षेप्रमाणे स्वप्नीलचे नाव पुढे केले .हा मुलगा लहानपणापासून अापण ओळखतो. प्रिया व स्वप्नील दोघेही बरोबरच खेळले वाढले आहेत .मी प्रियाचे मन जाणते.तिचा होकार आहे. माझाही होकार आहे.तुमच्या संमतीची आम्ही सर्व प्रतीक्षा करीत आहोत .
यावर मी सांगितले स्वप्नील मध्ये सर्व काही चांगले आहे.त्याच्याजवळ धडाडी ईर्षा मोठे होण्याची इच्छा नाही तेवढेच कमी आहे .मला माझा व्यवसाय सांभाळणारा मुलगा पाहिजे .मी त्याची परीक्षा घेईन .नंतर पुढचे पुढे आपण पाहू .असे म्हणून मी तो विषय बंद केला .
*स्वप्नील*
काकासाहेबांनी मला अकस्मात त्यांच्या आॅफिसमध्ये बोलवून घेतले .त्यांना माझ्याशी खासगीत काहीतरी बोलायचे होते .दोन दिवसांपूर्वीच प्रिया माझ्याजवळ स्पष्टपणे तिच्या मनातील प्रेम बोलली होती.मी सर्व काही बघून घेईन म्हणून तिने सांगितले होते.ती काकासाहेबांजवळ बोलली असणार. त्या संदर्भातच काकानी मला बोलावले आहे हे माझ्या लक्षात आले .
त्यानी मला स्पष्टपणे सांगितले.मी तुझी परीक्षा घेणार आहे .तू उद्यापासून माझ्याकडे नोकरीवर नसशील.तू उद्यापासून वर्षभर प्रियाला भेटणार नाहीस. वर्षभरात दोन लाख रुपये कमावून मला दाखवायचे आहेत.तू फक्त दहावी पास आहेस.आजकाल नोकऱ्या चटकन मिळत नाहीत.मिळाली तरी तुला पगार तुझे जेमतेम भागेल एवढाच मिळेल.मला तुझ्यातील धडाडी, ईर्षा,व्यवसाय कौशल्य, पाहायचे आहे.या कसोटीत तू यशस्वी झालास, तर माझा व्यवसाय व्यवस्थित संभाळशील. प्रिया तुझीच आहे.
मी त्यांचे आव्हान स्वीकारले .उद्याच शहरात जायला निघतो असे त्यांना सांगितले.
*प्रिया*
मला स्वप्नीलचा फोन आला. त्याने बाबांजवळ झालेले त्याचे बोलणे मला सांगितले.उद्याच शहरात जात आहे हेही सांगितले.बाबांची अट ऐकल्यावर मी त्याला म्हटले.तू काळजी करू नकोस .मी तुला दोन लाख रुपये देते .ते तू बाबांना एक वर्षाने नेऊन दे .त्यावर त्याने उत्तर दिले मला तुझ्या बाबानी स्वकष्टार्जित पैसे आणायला सांगितले आहे . आणि मी ते आणणार आहे.मला त्याचे उत्तर आवडले .दुसऱ्या दिवशी तो एक वर्षाने परत येण्यासाठी शहरात निघून गेला.
*दौलतराव*
माझे सर्वत्र लक्ष असते. प्रिया व स्वप्नील यांचे प्रेम आहे हे मला केव्हाच समजले होते.स्वप्नील काकासाहेब बाईसाहेब कुणीतरी काहीतरी बोलतील म्हणून मी वाट पाहत होतो.शेवटी स्वप्नील माझ्याजवळ काकासाहेब काय म्हणाले ते बोलला . दुसऱ्याच दिवशी तो शहरात जाण्यासाठी निघाला .त्याचा एक मित्र शहरात असतो .त्याच्याकडे तो उतरणार आहे .काय करायचे ते तो तिथे गेल्यावर ठरवणार आहे .जाताना मी त्याला दहा हजार रुपये दिले.
*स्वप्नील*
शहरात येऊन मी माझा मित्र काशीनाथ याच्याकडे उतरलो.काशीनाथ आमच्या गावचा आहे .आमच्या वर्गातच तो होता .मला नोकरी मिळेल परंतु त्यातून दोन लाख रुपये साठवणे शक्य होणार नाही हे आमच्या लक्षात आले होतेच.चोरी लांडीलबाडी दरोडा या मार्गाने पैसे मिळवायचे अर्थातच नव्हते.
एखादा धंदा केल्याशिवाय पैसे मिळवणे शक्य नाही हे माझ्या लक्षात आले होते .तो एका वडापावच्या गाडीवर काम करीत होता . तो म्हणाला,आपण दोघांनी वडापावची गाडी टाकू.त्या बरोबरच इतरही काही पदार्थ आपल्याला ठेवता येतील .प्रथम हातगाडी आपण भाड्याने घेऊ .धंदा चालेल तसे पुढे पाहता येईल.
बाबांनी दिलेले दहा हजार रुपये आम्हाला सुरुवातीला उपयोगी पडले.आम्ही वडापावची गाडी टाकली.मला स्वयंपाकाची आवड आहे .घरी असतानाही मी निरनिराळे चटकदार पदार्थ करून पाहात होतो.माझ्या हाताला चव आहे असे आई बाबा म्हणत असत.त्याचा अनुभव वडा पावची गाडी सुरू केल्यावर आला .महिन्याभरात आमचे नाव सर्वत्र झाले.कितीही माल तयार केला तरी त्याचा उठाव होत होता .
सहा महिन्यातच मी दोन लाख रुपये मिळविले.एक वर्षाची प्रियाला न भेटण्याची अट होती.मी प्रियाला फेसबुक व फोनवर मधून मधून भेटत होतो.कामामुळे मला वेळ मिळत नसे.
*प्रिया*
स्वप्नीलच्या अंगात एवढे पाककौशल्य असेल अशी कल्पना नव्हती .थोड्याच महिन्यात त्याने कमालीचा जम बसविला.एक लहानशी जागा सहा महिन्यांच्या छोट्याश्या अवधीत त्याने भाड्याने घेतली . त्याचे छोटेसे रेस्टॉरंट तुफान चालत आहे.बँकेकडून त्याने कर्जही घेतले आहे .त्याच व्यवसायात शहरात रहावे,हॉटेल रेस्टॉरंट केटरींग व्यवसाय करावा असे तो म्हणत आहे .
(क्रमशः)
७/७/२०२०©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com