कारखानदार, कंपन्या, व्यापारी यांची ही दशा तर सार्वजनिक संस्थाही अशाच सडलेल्या. परवा मुंबईत घर पडले. दोनतीन माणसेही दगावली म्हणतात. मी तेथे जवळच होतो. मी म्हटले, 'काही काही घरे फारच जुनाट झाली आहेत. पावसाळयात आता ही पडतील ' म्युनिसिपालिटी यांना सांगत का नाही? घरे पडेपर्यंत मालक भाडे घेणार ? प्रणाचेही मोल शेवटी घेणार का ? तर जवळचे एक सद्-गृहस्थ म्हणाले, 'म्युनिसिपालिटीने जरी मालकाला अमुक दुरुस्ती करा वगैरे कळवले तरी दहा रुपये दिले की दुरुस्ती झाल्याचे सर्टिफिकेटही मिळू शकते !' ते गृहस्थ मजकडे बघून रागाने म्हणाले, 'जेथे वाटेल तो मनुष्य विकत घेता येतो असा हिंदुस्थानच असेल ! ' माझ्या डोळयांत पाणी आले. भारताविषयी मला किती प्रेम नि भक्ती ! नाशिकच्या तुरुगांत असतांना आम्ही बगीच्या कामाला गेलो की मी हळूच तेथील माती माझ्या कपाळी लावायचा. त्यावेळेस मी पुढील चरण मनांत गुणगुणे -
तुझ्या धूलीमाजी वाटे लोळणे सुखाचे
इथे पाय पावन फिरले राम-जानकीचे
त्या भारतभूमीची का आज अशी अवनत दशा व्हावी ? महात्माजींचा ना हा देश ?
परवा खेडेगावातला एक मित्र आला होता. आम्ही बोलत होतो. तो म्हणाला, ' गुरुजी, या देशाचे कसे व्हायचे ? मोठेही खोटे बोलणारे, आणि खालची जनताही तशीच ! कोणी शेतीसाठी म्हणून तगाई घेतो, परंतु शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून तिचा विनीयोग होईल तर शपथ ! बैलांसाठी म्हणून सरकार कर्ज देते, परंतु बैल विकत घेतले जात नाहीत. कोणी शेतीसाठी खते मिळवतात आणि मग त्याचा काळाबाजार करतात. विहीरीसाठी पैसे घेतात नि ते लग्नात खर्च केले जातात. शेतीच्या इंजिनासाठी खानदेशकडे काहींनी पैसे घेतले, परंतु यातून त्या राष्ट्राला मोबदला काय मिळणार ? अन्नोत्पादन वाढावे, या देशाला भाकरीसाठी तरी दुस-याच्या तोंडाकडे बघण्याची पाळी येऊ नये, असे कुणाला वाटत आहे ? देशाची, समाजाची भावनाच नाही. स्वार्थ हा सर्वांचा धर्म आहे. मग तो बावळट, भोळा समजला जाणारा शेतकरी असो वा जगाशी आयातनिर्यात करणारा बडा व्यापारी असो ! 'मी ऐकत होतो. शेवटी मी डोळे मिटून पडून राहिलो. मला ते बोलणे ऐकवेना. हे राष्ट्र इतक सत्त्वशून्य कसे, याचे मला राहून राहून वाईट वाटत होते.