कुमारांनो, उद्याचा भविष्यकाळ तुमचा आहे. उद्याची ध्येय तुमच्याभोवती प्रदक्षिणा घालीत आहेत. सर्व प्रकारची संकुचितता, प्रांतीयता, जातीयता झडझडून फेकून उभे रहा.
घालून अकलेचा पवाड । व्हावे ब्रह्मांडाहुनि जाड ॥
तेथे कैचें आणिलें द्वाड । करंटेपण ॥
असे समर्थ म्हणाले, वेदांमध्ये सरस्वती-वाणीदेवता म्हणते :
'अहं राष्ट्री संगमनी जनानाम्'
'मी वाणी राष्ट्रासाठी आहे. सकल लोकांचे संगमन-संगम-एकत्र स्नेहसंमेलन करू पहाणारी मी आहे. 'हे ऋषींचे ध्येय तुमच्याही वाणीचे असो. ज्ञानेश्वर म्हणाले,
' भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचे॥'
माझ्या लिहिण्याने स्नेह वाढो. खरी मैत्री उत्पन्न होवो. गडयांनो, द्वेष वाढेल असे लिहू नका. निर्भयता, स्वाभिमान या निराळया गोष्टी; आणि सूड, द्वेष या निराळया गोष्टी. गटे म्हणाला, ' मी द्वेषाची गाणी गाणार नाही.'
आज सारे जग जवळ येत आहे. सारे जग जणू तिमजली घर होत आहे. कोठेही सूडबुध्दीने आपण धक्का मारला तरी या तुमच्या घरावरच त्याचे आघात. तुमच्या बोटीलाच भोके. सारे एकाच बोटीत बसलेले-कोणी या टोकाला, त्या टोकाला, एवढाच फरक. हे सांगण्या-बद्दल माझ्यावर टीका होतील. होवोत. तरीही मला सांगितलेच पाहिजे की सावधगिरीने, भावना भडकल्या तरी विवेकाचा ब्रेक लावून तुम्ही बोला नि लिहा. वाणी ही महान वस्तू आहे. तुम्हाला तरी उज्वल, मंगल भविष्य दिसो. भारतात सारे गुण्यागोविंदाने नांदत आहेत, द्वेष शमले आहेत, परस्परांची संस्कृती अभ्यासित आहेत, अनेक भाषा शिकत आहेत, विकास करून घेत आहेत, ज्ञानविज्ञान वाढत आहे, कला फुलत आहेत. सर्व जनता त्यांच्या संवर्धनात सामील हात आहे, व्यक्ति-स्वातंत्र्याचीही मर्यादित प्रतिष्ठा ठेवणारा समाजवाद आला आहे, वर्ग नष्ट झाले आहेत, स्पृश्यास्पृश्ये इतिहासात जमा झाली आहेत, गावे गजबजली आहेत, मोठे उद्योगधंदे राष्ट्रीय होत आहेत, प्रगतीसाठी राष्ट्र आवश्यक गरजा भागवून अनंत हात पसरून पुढे जात आहे, अज्ञान, रूढी, रोग नष्ट होत आहेत. प्रयोग चालले आहेत, हिमालयावर चढत आहेत, आकाशात उडत आहेत, ता-यांवर जाऊ पहात आहेत, सागराच्या तळाशी ज्ञानासाठी जात आहेत. ज्ञानासाठी नचिकतेप्रमाणे मृत्यूशी स्नेह करीत आहेत. असा हा भारत शास्त्रीय नि ध्येयवादी तुमच्या डोळयांसमोर उभा राहू दे. तुमची स्वप्ने, तुमच्या आशाआकांक्षा, यातूनच नवा भारत बनायचा आहे. तुम्हीच भारतभाग्यविधाते. तुमचा जय हो.