आयव्हीएफ तंत्रामुळे १९७८मध्ये जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्मली. त्याच्या २० वर्षांनंतर, म्हणजे १९९८ मध्ये औरंगाबादेत पहिला टेस्ट ट्यूब बेबी बॉय जन्माला आला. तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळेच 'आयव्हीएफ'चा सक्सेट रेट ७ ते १० टक्क्यांवरून ६० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, लवकरच विस्तारित पीजीडी तंत्रज्ञानामुळे पाहिजे त्या रंगरूप-उंची-आकार आणि अनुवंशिक गंभीर-दुर्धर आजार-विकार टाळून खात्रीशीर सुदृढ मूल जन्माला घालणे शक्य होणार आहे. पाश्चात्य देशांत हे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भारतामध्येही अशा प्रकारची 'डिझानर बेबी' नजिकच्या भविष्यात कधीही जन्मू शकते, अशी परिस्थिती आहे. डॉ. रॉबर्ट एडवर्ड व डॉ. पॅट्रिक स्पेप्टो यांच्या अथक परिश्रमातून आणि शंभरपेक्षा जास्त प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर १९७७मध्ये 'इन व्हिट्रो फर्टिलायझेशन' (आयव्हीएफ) तंत्र यशस्वी झाले आणि १९७८मध्ये लुईस ब्राऊन ही पहिली टेस्ट ट्यूब बेबी लंडनमध्ये जन्मली. १९९८ मध्ये आैरंगाबादेतील पहिली टेस्ट ट्युब बेेबी बॉय जिल्ला हॉस्पिटलमध्ये जन्मला. यासंदर्भात जिल्ला हॉस्पिटलच्या ज्येष्ठ स्त्रीरोग-वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. मंजू जिल्ला 'मटा'ला म्हणाल्या, 'लुईस ब्राऊनला झालेली दोन्ही मुले ही नैसर्गिक प्रसुतीद्वारे झाली आहेत आणि अशी अनेक उदाहरणे आहे. त्यामुळे आयव्हीएफ तंत्राचा कुठलाही दुष्परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले. पाश्चात्य महिलांमधील 'फॅलोपियन ट्यूब'च्या मोठ्या समस्येमुळे या तंत्राला प्रचंड मागणी होती व तंत्रज्ञान झपाट्याने विकसित गेले. स्त्री बिजकोषामध्ये थेट शुक्राणू सोडण्याच्या 'इक्सी' तंत्राने सक्सेस रेट वाढला. 'पीजीडी' तंत्रज्ञानाने शंभर टक्के निर्दोष गुणसूत्रांची निवड करणे शक्य झाले असून, त्यामुळे सक्सेस रेट ६० ते ७० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. अर्थात, लॅबमधील अत्युच्च तंत्रज्ञान, तज्ज्ञांवर सक्सेस रेट अवलंबून असून, सर्वसाधारणपणे भारतात ५० टक्क्यांपर्यंत हा रेट आहे. आता तर जन्माला येणाऱ्या मुला-मुलीचा अपेक्षित रंग-केशरचना-उंची व इतर शरीररचनाही तीन प्रकारच्या पीजीडी तंत्रामुळे शक्य झाले आहे.'
इक्सी, लेझर अॅसिस्टेड तंत्र, लॅबमधील क्लास १०० तंत्र, औषधी-इंजेक्शनमुळे सक्सेस रेट ५० टक्क्यांपर्यंत आणणे शक्य झाले आहे. अर्थात, अजूनही तंत्रज्ञान विकसित होण्यास मोठा वाव आहे. वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असताना हे तंत्रज्ञान मानवासाठी कल्याणकारी ठरत आहे.