पायाला ठेच लागली, जीव किती तळमळतो
दगडांनी ठेचून मारतात... कसं वाटत असेल?
साधा चटका बसला, जीव किती चरफडतो
साले जिवंत जाळून मारतात... कसं वाटत असेल?
बोटाला सुई टोचली, माणूस किती कळ्वळतो
सुरे-तलवारी खसाखस भोसकतात... कसं वाटत असेल?
नकळत पदर ढळला, बाई किती शरमते
नग्न धिंड काढतात... कसं वाटत असेल?
किती अपमान, किती अवहेलना,
किती यातना, किती वेदना... कसं सोसत असेल?
किती काळ हे असंच चालायचं?
किती काळ सारं निमूट झेलायचं?
आता ठरवलंय... ठेवलेलं हत्यार खोलायचं
माणसातलं जनावर आरपार सोलायचंच
करायचीच माणसं आतून बाहेरुन शुद्ध
अन जागवायचा आता प्रत्येक माणसात
एक बुद्ध... एक बुद्ध... एक बुद्ध...
कवी-बबन सरवदे
काव्यसंग्रह-आता सुर्यच आमचा आहे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel