जपानमध्ये सैन्यदल अग्निपुत्रावर बेसुमार गोळीबार करते, विमानांमधून ग्रेनेडचा मारा करण्यात येतो. मात्र यांपैकी कोणत्याही गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. तो फक्त एका दिशेने चाल करत असतो वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तो विध्वंस करतो. संपूर्ण जग जपानमध्ये घडत असलेल्या घडामोडींची दखल घेत असतं. अमेरिका, फ्रान्स, भारत, चीन आणि रशिया या देशांमधून तिथे मोठ्या प्रमाणात सैन्यदल रवाना होते. मात्र कोणत्याही शास्त्राचा त्याच्यावर उपाय होत नाही. हि गोष्ट थेट युनेस्कोपर्यंत जाते. शांततेसाठी सुरु करण्यात आलेल्या युनेस्को जपानवर पुन्हा अनुविस्फोट करण्यासाठी एकमताने ठराव पास करते. अनेक देश त्याला विरोध दर्शवतात.

"हा निर्णय चुकीचा आहे . आधी सर्वोतपरी प्रयत्न तर करून पहा. एका दानवासाठी तुम्ही लाखो लोकांचा जीव नाही घेऊ शकत." ऑस्ट्रेलियामधून आलेले अधिकारी म्हणतात.

"आपल्या सूचनांचा आम्ही आदर करतो. परंतु अनेक प्रकारचे शास्त्र वापरून देखील ते दानव मरत नसल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय." फ्रान्स चे अधिकारी म्हणतात.

"आपल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करून पहा. मागच्या वेळी जेव्हा जपानवर अनुविस्फोट करण्यात आला होता ते परिणाम सध्यास्थितीत देखील जाणवत आहेत. त्यानंतर अनु संरचनेत अनेक बदल करण्यात आले आणि त्याची क्षमता वाढविण्यात आली. ही क्षमता आपला संपूर्ण ग्रह नष्ट करू शकते." ऑस्ट्रेलियाचे अधिकारी म्हणतात.

"आम्ही आपल्याशी पूर्णपणे सहमत आहोत. मात्र इतक्यात त्याचा विनाश नाही केला तर तो इतर देशांवर देखील हल्ला करण्याची शक्यता आहे." भारतीय अधिकारी म्हणतात.

सभागृहात चर्चा सुरु असताना अध्यक्ष सर्वांना शांत व्हायला सांगतात.

"कृपया सर्वांनी शांत व्हावे. जपानमधील दानवाबाबत एक महत्वपूर्ण बातमी प्राप्त झाली आहे." सभागृहामध्ये शांतता पसरते.

"जपानमधून नुकतेच वृत्त प्रसारित झाले आहे कि विध्वंस करणारा तो शक्तिशाली दानव आता चीनच्या दिशेने चाल करत आहे. यासाठी त्याने समुद्राखालून चाल सुरु केली आहे." युनेस्कोचे अध्यक्ष म्हणतात.

सभागृहात पुन्हा गोंधळ सुरु होतो. इतर देश ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणतात आणि शेवटी अग्निपुत्राला मारण्यासाठी अनुविस्फोट करण्याच्या निर्णयाला मान्यता मिळते. पण आणखी एक प्रश्न समोर उपस्थिती राहतो, तो म्हणजे आता तो दानव जपानमध्ये नसून चीनमध्ये आहे. त्यासाठी एक निश्चित स्थान निवडून त्या ठिकाणी अनुविस्फोट करण्याच्या दिशेने विचार सुरु होतो.

पूर्व चीनमधील नागरिकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरु होते. एका विध्वंसक दानवाचा नाश करण्यासाठी संपूर्ण जग एकत्र येतं.

दरम्यान डॉ.अभिजीत त्याची टीम आणि भारतीय सैन्यासह हिमालयामध्ये पोहोचतो. ज्या ठिकाणी त्यांना अवशेष सापडले होते, त्या ठिकाणी भूकंपामुळे बराच ढिगारा होता. अवकाळी पावसामुळे तिथे खूप चिखल झाला होता. सैन्यदलाचे अधिकारी उत्खनन सुरु करतात. रिमझिम पाऊस सुरूच असतो. त्यावेळी डॉ.मार्को हे डॉ.अभिजीतजवळ येतात.

"आशा करतो इथून आपल्याला काही मार्ग नक्की मिळो." डॉ.मार्को म्हणतात.

"हो, मी देखील आशेवरच आहे." डॉ.अभिजीत त्यांच्या डोळ्यात बघतो, त्याला वेगळेपण जाणवतं, "डॉक्टर, मला असं का वाटतंय की तुम्हाला वेगळ्या विषयावर बोलायचंय?"

"हो. मला जॉर्डनबद्दल बोलायचं आहे." डॉ.मार्को म्हणतात.

"जॉर्डन बद्दल? बोला." डॉ.अभिजीत म्हणतो.

"खरं तर माझ्यानंतर आणि डॉ.एरिक नंतर जॉर्डन हा आपल्यामध्ये अनुभवी आहे. तरीही त्याने माघार घ्यावी हे तुला योग्य वाटत आहे का?" डॉ.मार्को विचारतात.

"डॉक्टर, खरं सांगायचं तर आतापर्यंत त्याने फक्त पुरातत्व विभागातच काम केलं आहे. आणि मी लहानपणापासून संकटांना सामोरे जात आहे. त्याच्याशी मला व्यक्तिशः काही बोलायचं नाहीये. मला संकटांची आता सवय झाली आहे." डॉ.अभिजीत म्हणतो. डॉ.मार्को जरा गोंधळलेल्या नजरेने बघतात.

"जरा सोप्या भाषेत सांगतो. भगदवदगीतेमध्ये श्रीकृष्णानं म्हणाले आहेत कि, आपण आपल्या विचारांना संकुचित न ठेवता दूरगामी आणि व्यापक ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. उदाहरण द्यायचं झालं तर पांडव मेणाचं लाक्षागृह फसले असताना त्यांना केवळ एक उंदीर भेट म्हणून दिला त्यामुळेच पांडवांना लाक्षागृहातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला आणि त्यांनी स्वत:चा जीव वाचवला. हा दूरगामी विचारच ठरला होता. तसंच तुमच्या समोर समस्या असतील तर त्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही या संकटांना धैर्यानं तोंड देण्यात अपयशी ठरत असाल तर थोडं चिंतन करा आणि संकटांना सामोरं जा. संकटांना घाबरून त्यापासून दूर राहण्यापेक्षा त्यांचा सामना करण्यामुळेच त्यावर उत्तर मिळतं." डॉ.अभिजीत बोलत असतो.

"भगवद्गीतेचा तुमच्यावर मोठा प्रभाव आहे वाटतं." डॉ.मार्को म्हणतात.

"हो, भगवद्गीतेमध्ये लिहिलंय, श्रीकृष्णाला ऋषिकेशही म्हटलं जातं. ऋषक आणि इश म्हणजेच... इंद्रियांवर ताबा मिळवणारा स्वामी... आपल्या विचारांवर, बुद्धीवर, भावनांवर विजय मिळवणं तुम्हाला सफलतेकडे घेऊन जातं. गीतेच्या एका अध्यायानुसार, तुम्ही मनात आणलं तर तुम्हाला हवेवर नियंत्रण मिळवणंदेखील कठिण नाही... परंतु, तुम्हाला तुमच्या मेंदूवर नियंत्रण ठेवणं मात्र थोडं कठिण आहे." डॉ.अभिजीत बोलत असतो.

"बस्स डॉक्टर बस्स. आपण नंतर कधीतरी भगवद्गीतेवर चर्चा करू." डॉ.मार्को म्हणतात आणि दोघे हसू लागतात.

"डॉ.अभिजीत... डॉ.मार्को... लवकर इथे या... गुहेचं द्वार उघडलं आहे." डॉ.एरिक म्हणतात.

सैनिकांनी दरड बाजूला सरलेली असते. गुहेचं तोंड उघडं होतं. आतमध्ये धोका असल्याने सार्वजन आतमध्ये शस्त्र घेऊन जातात.

(क्रमशः)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel