गुहेच्या आत खूप अंधार होता. हातात प्रकाशमय लेड असल्याने ते आपला रस्ता शोधात होते. दरड कोसळली असल्यामुळे नक्की कुठल्या दिशेने जावे याचा त्या सर्वांना अंदाज येत नव्हता. डॉ.अभिजीत एकूण चार गट पाडतो. सैनिकांसह एक गट डॉ.अभिजीतसोबत असतो जो पूर्व दिशेने जातो, दुसरा गट अॅंजेलिनासह उत्तरेकडे, तिसरा गट डॉ.मार्कोसह उत्तर-पूर्व दिशेने आणि चौथा गट डॉ.एरिकयांच्यासह दक्षिण-पूर्व दिशेने जातो.
डॉ.अभिजीतच्या गटाला थोडं पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी प्रकाश दिसतो. व्हॉकी-टोकीने तो सर्वांना पूर्व दिशेला बोलावतो. सगळे त्या प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागतात. जसजसे ते जवळ जातात, तसतसा त्यांना एका मंत्रोच्चाराचा ध्वनी ऐकू येतो.
"आतमध्ये कुणी आहे का?" अभिजीत मोठ्याने ओरडून विचारतो. त्याच्या आवाजाने आत असलेली वटवाघळे मोठ्याने पंखांचा आवाज करत बाहेर निघून जातात. अभिजीत पुन्हा आवाज देतो. आत असलेला प्रकाश आता त्यांच्या दिशेने येऊ लागतो. सर्व सैनिक त्यांची हत्यारे तयार ठेवतात.
"घाबरण्याचं काही कारण नाही. आम्ही तुम्हाला इजा पोहोचवायला नाही आलोत. कृपया आपली ओळख सांगा." डाॅ.अभिजीत म्हणतो.
तो प्रकाश आता इतका वाढतो की, त्यासमोर डोळे उघडून स्पष्टपणे बघणं अशक्य होतं. सगळे डोळ्यावर हात ठेवून डोळे बंद करतात. आता तो प्रकाश हळूहळू मंद होतो. डाॅ.अभिजीतसह सर्वजन डोळे उघडतात आणि समोर पाहतात तर एक प्रचंड मोठी उंची असलेले एक वृध्द व्यक्तीमत्व त्यांच्यासमोर उभं होतं. लांब सफेद केस आणि तेवढीच लांब दाढी-मिशा असलेले ते डाॅ.अभिजीतकडे बघून ते स्मितहास्य करत होते.
"माफ करा, आम्ही आपणांस ओळखलं नाही." डाॅ.अभिजीत म्हणतो. ते वृध्द व्यक्तीमत्व होकारार्थी मान हलवतं.
"तुम्हा सर्वांपैकी कुणीही आम्हाला ओळखलं नसेल आणि ते उचितच आहे." ते वृध्द गृहस्थ म्हणतात. वृध्द असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं. एखाद्या देवतेप्रमाणे त्यांचा चेहरा तेजस्वी होता.
"कृपया मार्गदर्शन करावे. आम्हाला खरंच माहित नाही आपण कोण आहात." डाॅ.मार्को म्हणतात.
"आम्ही रुद्रस्वामी आहोत. साधारण ४,००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर आमचे वास्तव्य होते. सध्याचे जग ज्या संकटाचा सामना करत आहे त्याची सुरुवात आमच्या काळात झाली आहे." ते वृध्द गृहस्थ म्हणजे प्रत्यक्षात रुद्रस्वामी होते.
डाॅ.अभिजीत, डाॅ.मार्को, डाॅ.एरिक, अॅंजेलिना आणि समोर उभे असलेल्या प्रत्येकाला नक्की काय झालंय ते कळत नव्हतं. रुद्रस्वामींना हे सर्वकाही कळत होतंच. ते सर्वांना शांत व्हायला सांगत गुहेच्या वरच्या भागाकडे बघतात. बघता बघता गुहा प्रकाशमय होते. सैनिकांपैकी अनेकजन त्यांच्यासमोर नतमस्तक होतात.
"ते दानव निष्पाप लोकांना का मारत आहे?" डाॅ.एरिक रुद्रस्वामींना विचारतात.
"मुळात ते दानव नसुन मानवाच्या रक्षणासाठी महायज्ञाद्वारे पृथ्वीवर अवतरलेले अग्निपुत्र आहे." रुद्रस्वामी म्हणतात.
"मानवाच्या रक्षणासाठी? स्वामीजी त्यांनी आतापर्यंत एक संपुर्ण देश नश्ट केला आहे आणि आता तो इतर देशांचा विनाश करण्यासाठी निघाला आहे." डाॅ.मार्को म्हणतात.
"रुद्रस्वामीजी, आम्ही आपला आदर करतो. आपले वाक्य ऐकून आम्ही सर्वजन कोड्यात पडलो आहोत, कृपया आम्हाला आणखी स्पष्टपणे सांगावे." अॅंजेलिना म्हणते.
"४,००० वर्षांपूर्वी अर्धसर्पानुष्य प्रकारचा एक जीव होता, ज्याचं अर्ध शरीर मनुष्याचं आणि अर्ध शरीर सापाचं होतं. सुर्वज्ञ नावाच्या राजाच्या नेतृत्वाखाली त्यांनी पृथ्वीवर अनेक ठिकाणी मनुष्याचा संहार केला. त्याचं कारण मुर्खपणाचं होतं, पण अनेक ठिकाणी लोक मृत्यूमूखी पडले होते. याची सुचना आम्हाला मिळताच जवळ असलेल्यांना सोबत घेऊन आम्ही त्यांच्याविरुध्द युध्द केले ज्यात आमचा विजय झाला. त्यांचा राजा सुर्वज्ञला मी स्वतःच्या हाताने मारले." रुद्रस्वामी बोलतच होते की डाॅ.अभिजीत मध्येच म्हणाला.
"हो... हो... अगदी बरोबर... मी स्वतः हे सर्व पाहिलं आहे... मागच्या वेळेस जेव्हा आम्ही इथे संशोधन करण्यासाठी आलो होतो तेव्हा एका पोकळीमध्ये मी हे दृश्य पाहिलं होतं."
"होय. अगदी बरोबर." रुद्रस्वामी म्हणतात.
"नाही, पण अग्निपुत्राचा जन्म नक्की का आणि कसा झाला? हे कोडं काही उलगडलं नाही." अॅंजेलिना म्हणते.
"सुर्वज्ञचा वध केल्यानंतर आमच्या लक्षात आले, पृथ्वीवर असे अनेक जीव आहेत ज्यांच्यापासून मनुष्य प्राण्याला धोका आहे. मनुष्य जातीच्या पुढील पिढीला हा त्रास होऊ नये यासाठी मी आणि माझ्यासोबत असलेल्या विद्वानांनी अग्निपुत्राला यज्ञाद्वारे पृथ्वीतलावर आणण्याचे ठरविले. त्यासाठी आम्ही समुद्रमार्गे पुर्वेकडे जाण्याचे ठरविले. ते ठिकाण आता जपान या नावाने ओळखले जाते. भुतलावर त्या ठिकाणी मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त होते. त्या ठिकाणी आम्ही १०० मृतदेहा घेऊन गेलो. तिथे असलेल्या पवित्र ज्वालामुखीमध्ये त्यांचा बळी देत आम्ही अग्निपुत्राला जन्म देण्याचा प्रयत्न केला.’’ रुद्रस्वामी म्हणाले.
‘‘मग याचं रुपांतर राक्षसामध्ये कसं काय झालं?’’ डाॅ.मार्को विचारतात.
‘‘माझ्या अनुयायांच्या मुर्खपणामुळे...’’ रुद्रस्वामी म्हणतात.
‘‘म्हणजे?’’ डाॅ.अभिजीत विचारतो.