"अभिजीत, मला सांग, फुजीयामा पर्वतावर नक्की काय घडलं होतं?" रुद्रस्वामी डॉ.अभिजीतला विचारतात. डॉ.अभिजीत विचार करू लागतो.
"त्या वेळी आम्ही तीन गट पाडले होते, अँजेलिना, डॉ.मार्को आणि इम्रान यांना माउंट ओंकटो येथे संशोधनासाठी काही विशेष पुरावे मिळाले नव्हते. साकुजीमा येथे लिसा, डॉ.एरिक आणि ब्रूस यांची देखील तीच अवस्था होती. म्हणून फुजीयामा इथेच आम्हाला पुरावे मिळतील याची जॉर्डनला खात्री होते. आम्ही लगेच पुढच्या चढाईला सुरुवात केली. पहाटेपर्यंत आम्ही दोघेही फुजीयामा ज्वालामुखीच्या टोकाला पोहोचलो. उजाडल्यानंतर आम्ही कामाला लागलो. तिथे अनेक पर्यटक आले होते. त्यांच्या समोर आम्हाला संशोधन करणे जरा कठीणच जात होतं. अगदी ज्वालामुखी कुंडापर्यंत देखील आम्हाला म्हणावे तसे पुरावे मिळत नव्हते. त्या ठिकाणी जास्त वेळ थांबता येत नाही म्हणून सैनिकांनी आम्हाला खाली उतरण्याची विनंती केली." डॉ.अभिजीत बोलत होता आणि सगळे ऐकत होते.
"आम्ही निराश झालो होतो, तिथून निघणार तोच तिथे असलेल्या एका काटेरी वृक्षाला माझा हात लागला. मग अचानक भूकंप झाला. पायथ्याशी असलेल्या लष्कराने लगेचच पर्वताच्या दिशेने हेलिकॉप्टर पाठवले. पर्वतावरील सर्व पर्यटक सैरवैर धावत होते. शक्य तितक्या लवकर आम्हाला पर्वतावरून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. बस्स अजून काही नाही झालं." डॉ.अभिजीत म्हणाला.
"आता पुढे ऐक, मुळात ज्वालामुखी पर्वतावर अग्नीकुंडाजवळ कोणतेही वृक्ष नसते. तिथे जास्तीत जास्त झुडुपे असतात. पण तुझा हात जिथे लागला तिथे काही क्षणापूर्वीच ते वृक्ष अवतरले होते आणि त्या वृक्षाला हात लागून तुझ्या हातातून रक्त आले. त्या रक्ताचे थेंब त्या पवित्र अग्नीमध्ये पडले आणि तो अग्निपुत्र पुन्हा जिवंत झाला." रुद्रस्वामी म्हणाले. अँजेलिनाला आता भीती वाटू लागली होती.
"सर मला खूप भीती वाटतेय." अँजेलिना डॉ.मार्को यांना म्हणते.
"रुद्रस्वामी जी, आता तुम्हीच आम्हाला यातून बाहेर काढू शकता." डॉ.एरिक म्हणतात.
"अभिजीतने मनावर घेतलं तर अग्निपुत्राचा नाश होऊ शकतो." रुद्रस्वामी डॉ.अभिजीतकडे बघत म्हणतात. डॉ.अभिजीतच्या डोळ्यासमोर ब्रूस आणि जॉर्डन यांचा चेहरा येतो. अग्निपुत्रामुळे त्याने आपले दोन मित्र गमावले होते. एकाला स्वर्गवास झाला तर दुसऱ्याला मानसिक आघात झाला. तो आपले डोळे घट्ट बंद करतो, मनाशी काहीतरी ठरवतो आणि रुद्रस्वामी यांच्याकडे बघतो.
"मी त्याच्याशी दोन हात करायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगा त्याला कसं मारायचं आहे." डॉ.अभिजीत म्हणतो.
"ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाहीये. अग्निपुत्राला पृथ्वीवर आणण्यासाठी आम्हाला कुणाचाही बळी द्यायचा नव्हता आणि म्हणूनच आम्ही त्सुनामीमध्ये मृत असलेल्या व्यक्तींना अग्निकुंडात टाकले. म्हणजे त्यांच्या रक्ताने अग्निपुत्र आकार घेत होता. आता जो अग्निपुत्र विनाश करत आहे त्याच्या शरीरात तुझं देखील रक्त आहे. त्यामुळे जरी तू त्याच्यासाठी दिलेला बळी असलास तरी तू त्याचा जनक आहेस." रुद्रस्वामी म्हणतात.
"एका दानवाचा जनक होण्यात कसला आनंद आहे? त्याचा नाश कसा करू यासाठी मार्गदर्शन करा स्वामी जी..." डॉ.अभिजीत म्हणतो.
"अर्जेंटिनापासून जवळच एक समुद्री त्रिकोण आहे. लोक त्याला बर्मुडा त्रिकोण म्हणतात." रुद्रस्वामी म्हणतात.
"हो, आम्हाला माहित आहे. तिथे गेलेलं एकही जहाज आणि विमान परत आलं नाहीये." डॉ.मार्को म्हणतात. रुद्रस्वामी स्मितहास्य करत होकारार्थी मान हलवतात.
"अभिजीतला तिथे समुद्राच्या तळाशी जायचं आहे." रुद्रस्वामी म्हणतात.
"काय? डॉ.अभिजीतला बर्मुडामध्ये पाठवत आहात? तिथून कुणीही परत येत नाही." अँजेलिना म्हणते.
"तिथून फक्त अभिजीत परत येऊ शकतो. समुद्राच्या तळाशी एक गुहा आहे. तिथे त्याला एक संदुक दिसेल जी फक्त त्याच्याच हातून उघडू शकते. त्या संदुकमध्ये एक तलवार आहे. त्या तलवारीच्या सहाय्याने अभिजीतने अग्निपुत्राच्या हृदयात वार करायचा आहे ज्याने अग्निपुत्राचा कायमचा अंत होऊन जाईल." रुद्रस्वामी म्हणतात.
"स्वामी, पण बर्मुडा त्रिकोण? तिथे?" डॉ.अभिजीत म्हणतो.
"होय. अग्निपुत्राला प्राप्त करण्याचा अपूर्ण यज्ञ आम्ही फुजीयामा पर्वतावर केला. खरे पाहता हा यज्ञ आधी समुद्राच्या मधोमध करण्यात आला होता. अग्निपुत्र हा मनुष्य प्राण्याचा रक्षक असेल असा विचार करून आम्ही यज्ञाला सुरुवात केली होती. मात्र त्याच्यापासून आपल्याला अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच त्याचा नाश करण्यासाठी आम्ही दिव्य तलवार तयार केली जी एका संदुकमध्ये बंदिस्त करण्यात आली. आम्ही ती संदुक त्याच ठिकाणी समुद्रात सोडून दिली आणि त्या तलवारीचं रक्षण करण्यासाठी दिव्य त्रिकोण तयार करण्यात आला. त्या त्रिकोणामुळे दिव्य आजतागायत त्या तलवारपर्यंत कोणतही मनुष्य प्राणी पोहोचू शकला नाही." रुद्रस्वामी म्हणतात.
"म्हणजे मला तिथे काही धोका नाही?" डॉ.अभिजीत म्हणतो.
"पृथ्वीतलावर अशी कोणतीही गोष्ट नाही जिच्यात धोका नाही किंवा जिच्यामुळे धोका नाही. सस्तन प्राण्याला जन्म घेत असतानाच अनेक शुक्राणूंना मागे टाकून स्त्रीबिजात प्रवेश करायचा असतो. तेव्हा त्याच्यामुळे इतर शुक्राणूंना आणि इतर शुक्राणूंमुळे त्या शुक्राणूला धोका असतोच. जन्माला आल्यानंतर देखील प्रत्येक सस्तन प्राण्याला दुसऱ्या प्राण्याकडून धोका असतो, जसा आपल्याला अर्धसर्पानुष्य जातीपासून होता." रुद्रस्वामी त्याला शब्दात खेळवतात.
"रुद्रस्वामी जी, असे कोड्यात नका बोलू." डॉ.अभिजीत म्हणतो.
"फुजीयामा पर्वतावर जेव्हा तुझ्या हातातून रक्त आलं तेव्हाच तुझ्यात दिव्य शक्तीने प्रवेश केला. जितक्या लवकर तुला त्याचं ज्ञान होईल तितक्या लवकर अग्निपुत्राचा नाश होईल." एवढं बोलून रुद्रस्वामी अदृश्य होतात.
"रुद्रस्वामी... रुद्रस्वामी... आपण कुठे आहात?" सगळे ओरडू लागतात तेव्हा रुद्रस्वामींचा आवाज येतो, 'मार्ग दाखवणं माझं काम आहे, त्या मार्गाने जाऊन मनुष्यजातीचा संहार वाचवणं तुमच्या हातात आहे.' आणि मग भयाण शांतता पसरली.
(क्रमशः)