रुद्रस्वामींचे शब्द प्रत्येकाच्या कानात घोंगावत असतात. विशेष करुन डॉ.अभिजीतच्या, कारण या सर्व घडामोडींचा शेवट त्याला करावयाचा असतो. सगळे शांतपणे त्या गुहेतून बाहेर येतात.
“सर तुम्ही काय विचार केला आहे?” एक सैनिक शांततेचा भंग करत डॉ.अभिजीतला विचारतो.
“मी अजून काही विचार केला नाहीये.“ डॉ.अभिजीत म्हणतो.
“पण संपुर्ण जगाला तुम्हीच वाचवू शकता... मनात आणलं तर...” तो सैनिक पुढे म्हणतो.
“मी तुझ्या भावना समजू शकतो. त्या अग्निपुत्राचा शेवट करायलाच हवा. मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल.” डॉ.अभिजीतचे हे शब्द ऐकून तिथे उभे असलेल्या सर्वांना दिलासा मिळतो.
शेजारी असलेले एक वरिष्ठ अधिकारी फोनवर बोलत होते. हिमालयातुन आता सर्वांना दिल्ली येथे जावयाचे होते . थोड्याच वेळात त्यांचं बोलणं पुर्ण होतं आणि ते डॉ.अभिजीतच्या दिशेने वळतात.
“तुम्हा सर्वांना तातडीने जर्मनीला जायला हवं. अग्निपुत्राला मारण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने अनुविस्फोट करायचं ठरवलं आहे.” वरिष्ठ अधिकारी डॉ.अभिजीतकडे बघत म्हणतात.
“पण त्याचा मृत्यू तर डॉ.अभिजीतच्या हातून होणार आहे.” डॉ.मार्को म्हणतात.
“होय. पण हे फक्त आपल्यालाच माहित आहे, त्यांना नाही.” वरिष्ठ अधिकारी म्हणतात.
“मग हे त्यांना लवकरात लवकर सांगावं लागेल.” डॉ.अभिजीत म्हणतो.
“जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्हाला हे करावं लागेल, कारण अग्निपुत्र चीनमधून भारताच्या दिशेने निघाला आहे. आणि माझी खात्री आहे की तो डॉ.अभिजीत यांच्या मागावर आहे.” वरिष्ठ अधिकारी म्हणतात.
“मला काहीही करुन त्यांच्याशी बोलायलाच हवं.” डॉ.अभिजीत म्हणतो.
“कुणाशी? अग्निपुत्राशी?” अॅंजेलिना विचारते.
“नाही, राष्ट्रसंघातील सदस्यांशी.” डॉ.अभिजीत म्हणतो.
“मी माझ्या सहका-यांशी बोललो आहे. इथून निघाल्यावर मनाली येथे तुमच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या विमानाने तुम्ही थेट जर्मनीला जाऊ शकता. तिथे भारतीय दुतावास तुम्हाला मदत करेल.” वरिष्ठ अधिकारी म्हणतात.
“हे सर्व तुम्ही इतक्या लवकर केलंत?” डॉ.मार्को म्हणतात.
“आम्ही भारतीय सैन्यदलाचे अधिकारी आहोत. देशाच्या रक्षणासाठी तातडीने निर्णय घेण्याचे आम्हाला पुर्ण अधिकार आहेत.” ते अधिकारी स्मिहास्य करत म्हणतात.
एवढं बोलून सगळे त्या ठिकाणाहून निघतात. हिमालयातून डॉ.अभिजीत आणि त्यांची टीम विशेष गाडीने मनालीपर्यंत पोहोचतात. तिथे त्यांच्यासाठी भारतीय वायुसेनेद्वारे विशेष विमानाची व्यवस्था केलेली असते. एक अधिकारी तिथे त्यांच्यासाठी एक लिफाफा घेऊन उभा असतो.
“या लिफाफ्यामध्ये काय आहे?” डॉ.अभिजीत त्या अधिका-याला विचारतात.
“जर्मनी येथे तातडीने तुम्हा सर्वांची रवानगी करण्यात आली आहे, त्यासाठी विशेष अधिकाÚयांनी या पत्रकामध्ये सह्या केल्या आहेत.” डॉ.अभिजीतच्या हातात लिफाफा देत तो अधिकारी म्हणतो.
“भारतीय सैन्यदलामध्ये इतक्या जलदगतीने कामं होतात याची मला कल्पना नव्हती.” डॉ.अभिजीत म्हणतात.
“हे तर फक्त पत्रक आहे. प्रसंगी देशासाठी प्राण देण्याची आणि घेण्याची देखील आमची तयारी आहे.” त्या अधिका-याच्या डोळ्यात डॉ.अभिजीतला विशेष चमक दिसली. त्याची पाठ थोपाटत अभिजीतसह त्याची टीम विमानामध्ये जाते. काही क्षणांत ते विमान जर्मनीच्या दिशेने उड्डाण करते.
विमानामधून डॉ.अभिजीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकृत संकेतस्थळावर मेल करतो आणि भारतीय सैन्यदलाकडून देखील त्यांना विशेष निरोप देण्यात येतो, ज्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ आपली मोहिम डॉ.अभिजीत आणि त्याची टीम येईपर्यंत थांबवते.
“त्यांना मेल पाठवला का?” डॉ.एरिक अभिजीतजवळ येत त्याला विचारतात.
“हो. त्यांचा रिप्लाय सुध्दा आला आहे. त्यांनी त्यांची मोहिम आपण येईपर्यंत थांबवली आहे.” अभिजीत म्हणतो.
“जागतिक स्तरावर आपल्यासारख्या सामान्य संशोधकांची इतकी मोठी दखल घेतल्यावर खुप अभिमान वाटतो.” डॉ.एरिक म्हणतात.
“मला त्याहीपेक्षा भारतीय सैनिकांचा अभिमान वाटतोय.” डॉ.मार्को आणि अॅंजेलिना देखील त्यांच्याजवळ येतात.
“म्हणजे बघा ना! आपण जेव्हा ही मोहिम हाती घेतली होती, तेव्हा भुकंप होऊन सुध्दा ते आपल्याला वाचवण्यासाठी आले होते. मग आपण चीनमधून आलो, तरीही भारतीय सैनिकांनी कसलीही आडकाठी न घेता आपल्याला चीनमधून इथे आणलं, आपल्याला हिमालयापर्यंत नेलं, तिथे त्यांनी आपल्याला गृहेच्या आतमध्ये नेलं, तिथून सुखरुप बाहेर आणलं, रुद्रस्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवत त्यांनी आपल्यासाठी विशेष विमान उपलब्ध करुन दिलं, आणि आपण जर्मनीला पोहोचेपर्यंत त्यांनी अनुविस्फोटाची मोहिम देखील थांबवली. त्यांच्या बोलण्यात जो आत्मविश्वास आणि सार्थ अभिमान आहे त्याला खरोखरंच माझा सेल्युट.” डॉ.अभिजीत म्हणतो.
“होय ना! आणि सैनिकांच्या या गोष्टींची कुणी दखल घेत नाही.” अॅंजेलिना म्हणते.
“भले अग्निपुत्र विध्वंस करायला आला आहे, पण त्याच्यामुळेच आपल्याला सैनिकांच्या इतक्या धाडसी आणि तत्पर वृत्तीचं दर्शन घडलं. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्यासाठी तरी मी अग्निपुत्राला नक्कीच मारेन. मी बम्र्युडा त्रिकोणामध्ये जाणारच...” डॉ.अभिजीत म्हणतो.
(क्रमशः)