संयुक्त राष्ट्रसंघाकडून सर्वोतपरी मदत मिळाल्याने डॉ.अभिजीत आणि जॉर्डन अर्जेंटिना येथे जातात. सुरक्षेच्या कारणास्तव अॅंजेलिना, डॉ.मार्को आणि डॉ.एरिक यांना अमेरिका येथे पाठविण्यात येतं, तिथून ते तिघेही अमेरिकी सैन्यदलाच्या माध्यमातून डॉ.अभिजीत आणि जॉर्डनच्या संपर्कात राहणार होते.
अर्जेंटिनामध्ये :
“मी जॉन कस्र्टन, अर्जेंटिना सैन्यदल आपले स्वगत करत आहे. नौसेनेतील सहकारी आपली मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहेत.” जॉन म्हणतो.
“आम्हाला बम्र्युडा त्रिकोणमध्ये जायचे आहे.” डॉ.अभिजीत म्हणतो.
“बम्र्युडा? पण... तिथून... कोणीही परत आलं नाहीये.” जॉन म्हणतो.
“आम्हाला त्याची पुर्ण कल्पना आहे. म्हणून केवळमी आणि डॉ.अभिजीत तिथे जाऊ. तिथून आपण आम्हाला फक्त काही अंतरावर सोडायचं आहे. पुढचा प्रवास आम्ही दोघे करु.” जॉर्डन जॉनला सांगतो.
“आपण पुन्हा नाही आलात तर?” जॉर्डन कस्र्टन विचारतो.
“तुमच्यासारखे सैनिका आणि सैन्यदल अधिकारी आपल्या जीवाशी खेळून आम्हा सर्वांचं रक्षण करत असतं. आमचं देखील काही कर्तव्य बनतं.” डॉ.अभिजीत म्हणतो.
“ठिक आहे, तुम्हाला बम्र्युडापर्यंत पोहोचवण्याची पुर्ण व्यवस्था केली जाईल. आणि तुमच्याबरोबर आमचे 10 सैनिक असतील. पानबूडीमधून आपणा सर्वांना तिथे नेण्यात येईल. पानबुडीची तपासणी सुरु आहे, सर्व चाचण्या झाल्यानंतर दोन तासांमध्ये तुम्हाला बम्र्युडाजवळ नेले जाईल.” जॉन बोलतो आणि पुढे चालू लागतो. नंतर थोडं थांबून तो जॉर्डन आणि डॉ.अभिजीतच्या दिशेने वळतो.
“एक काम करतो, तुमच्याबरोबर मी सुध्दा येतो.” जॉन कस्र्टन म्हणतो.
“सर तुम्ही?” जॉर्डन आश्चर्याने विचारतो.
“का नाही? तुम्ही संशोधक असून इतकी मोठी जोखीम पत्कारु शकता तर मी का नाही?” जॉन जॉर्डनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो.
दुसरीकडे अग्निपुत्राला थांबवण्यासाठी संपुर्ण जग एकत्र आलेलं असतं. जर्मनीहून त्याची वाटचाल अर्जेंटिनाच्या दिशेने सुरु असतेच. वाटेत आफ्रिकेमध्ये त्याच्यासमोर भलीमोठ्ठी फौज येते. अमेरिका, रशिया, भारत, चीन, जपान, ब्राझील आणि फ्रान्सचे सैनिक मोठ्या संख्येने त्याच्यासमोर उभे राहतात. हेलिकॉप्टरमधून कॅमेराद्वारे संपुर्ण जग त्याची वाटचाल बघत असतं. मोठ्या विध्वंसानंतर आणि वाटचालीनंतर अग्निपुत्र पहिल्यांदाच थांबतो.
“माझ्या वाटचालीच्या मध्ये येऊ नका. तुमच्या कोणत्याही हत्याराचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये.” अग्निपुत्र पहिल्यांदाच बोलला होता. सर्व सैनिक आणि सैन्यदल अधिकारी आश्चर्यचकित होतात.
“कोण आहेस तु? आणि तुझा हेतु काय आहे?” अमेरिकी सैन्यदलाचे अधिकारी हेलिकॉप्टरमधून मोठ्या स्पिकरने त्याला विचारतात.
आपले दोन्ही हात आकाशाच्या दिशेने नेत तो जोरात आपले हात जमिनीच्या दिशेने नेतो आणि ओरडतो, “अग्निदेवता आणि १०८ मनुष्यबळाचा आविष्कार आहे मी, तुम्हा मनुष्यजातीचा संहार करणारा देव आहे मी, अग्निपुत्र आहे मी.”
त्याच्या हालचालींमुळे त्याच्यापासून ५०० मीटरपर्यंतच्या परिसरात आग लागते. त्याचा आवाज इतका भयानक असतो की, प्रत्येकाला आपल्या कानावर हात ठेवावा लागतो.
“तुमच्यापैकी कुणीही मला अडवू शकत नाही. माझ्या १०८ व्या बळीचा मृत्यू अजून झालेला नाही. तो मृत्यू झाल्यानंतर मी तुम्हा सर्वांना नष्ट करणार आहे.” अग्निपुत्र म्हणतो.
“पण मनुष्य प्राण्याशी तुझं असं कोणतं वैर आहे की, तुला संपुर्ण मनुष्यजातीचा अंत करायचा आहे?” अमेरिकी अधिकारी पुन्हा विचारतात.
“मनुष्य प्राण्याशी माझं कोणतंही वैर नाही, पण मनुष्य प्राण्याला समुळ नष्ट करायचं हेच माझं उद्दिष्ट आहे. माझ्या वाटेतून बाजूला व्हा.” अग्निपुत्र म्हणतो.
“ठिक आहे, मग आम्हीदेखील मागे हटणार नाही. एकतर मरु किंवा मारु.” अशी घोषणा करत सर्व सैन्यदल त्याच्यावर तुटून पडतं. सहारा वाळवंट असल्याने मनुष्यहानी होणार नव्हती आणि म्हणूनच जगातील सर्व देश आपल्याकडील विध्वंसक क्षेपणास्त्रे त्याच्या दिशेने सोडतात. जवळपास २० मिनिटांपर्यंत त्याच्यावर क्षेपणास्त्रांचा मारा चालू असतो. नंतर सगळं एकाएकी शांत होतं. आता अग्निपुत्र रडारवर देखील दिसत नव्हता. कुठलीही हालचाल होत नाही. प्रचंड प्रमाणात शस्त्रांचा मारा केल्याने बरीच धुळ उडाली होती. साधारण अर्धा तास तरी सगळं शांत राहतं. कोणतीही हालचाल होत नसल्याने सैनिकं हळूहळू पुढे जातात. अग्निपुत्राचा खात्मा झाला या गोष्टीची आता फक्त पुष्टी करायची असते. धुळ बाजूला सरते आणि अग्निपुत्र ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी १ कि.मी. व्यासाचा भलामोठ्ठा खड्डा पडलेला दिसतो. सैनिक त्या खड्ड्यामध्ये उतरतात. तोंडावर विशिष्ट प्रकारचं मास्क आणि हातात अद्यावयत शस्त्र घेऊन ते निश्चित ठिकाणी पोहोचणार तोच रडारवर अग्निपुत्र दिसू लागतो.
“सर्व सैनिकांनी ताबडतोब पाठीमागे व्हा. अग्निपुत्र जिवंत आहे.” हेलिकॉप्टरमधून मोठ्याने घोषणा होते.
तोपर्यंत उशीर झालेला असतो. अग्निपुत्र त्याच ठिकाणी उभा होता, डोळ्यातून अंगारे आणि शरीरातून रक्ताऐवजी ज्वाला बाहेर येत होत्या. सैनिक त्याच्यावर गोळ्या झाडणार तोच त्याने सर्वांवर ज्वाला टाकण्यास सुरुवात केली. मोठमोठे रणगाडे, विमानं, हेलिकॉप्टर आणि गाड्या सर्व उद्ध्वस्त होतात.
अर्जेंटिनामध्ये :
“पाणबूडीची चाचणी पुर्ण झाली आहे. आता बम्र्युडापर्यंत जाण्यात काही धोका नाही. हा पण, तिथे गेल्यावर काय धोका असेल ते सांगता येत नाही.” मेकॅनिक डॉ.अभिजीतला म्हणतो.
“काळजी नका करु, सगळं व्यवस्थीत होईल.” डॉ.अभिजीत स्मितहास्य करत म्हणतो. जॉन आणि जॉर्डन स्विमिंग सूट घालून डॉ.अभिजीतजवळ येतात.
“काय झालं? तुम्हा दोघांचे चेहरे इतके चिंताग्रस्त का आहेत?” डॉ.अभिजीत त्या दोघांना विचारतो.
“आफ्रिकेमध्ये ३,००,००० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले आहेत.” जॉन म्हणतो.
“अग्निपुत्र?” डॉ.अभिजीत विचारतो.
जॉन आणि जॉर्डन खाली मान घालतात.
“आता माघार नाही. एक तर तो जिवंत राहील नाहीतर मी.” डॉ.अभिजीत संतप्त होतो.
(क्रमशः)