स्फोट खुप मोठा होता. अनेक पोलिस अधिकारी त्यात जखमी झाले. दुकानाच्या आत एका स्त्रीचा मृतदेह सापडला, पण एकूणच प्रकार प्रत्येकाच्या समजण्यापलीकङे असतो. वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या या गोष्टीचा चांगलाच समाचार घेतात. अनेक तर्क-वितर्कांना तोंड फूटतं. कुणी म्हणतं ती व्यक्ती चोर असावी, तर कुणी म्हणतं ती व्यक्ती अग्निपुत्र असावी. पण खरं काय ते कुणालाच माहित नव्हतं. डॉ.अभिजीतच्या सुरक्षेत वाढ करण्यात येते आणि संपूर्ण जग कोड्यात पडतं.
डॉ.अभिजीत तो राहत असलेल्या गुप्त ठिकाणी निवांत बसलेला असतो. त्याच्या हातात भगवद्गीता असते. चौथा अध्याय वाचून नुकताच त्याचा डोळा लागला होता. काही क्षणातच त्याला गाढ़ झोप लागली आणि त्याला एक स्वप्न पडलं.
पृथ्वीचा सर्वनाश झाला आहे आणि मनुष्याचा फडशा पडून सर्वत्र फ़क्त मृत मनुष्याचा नुसता ढिगारा पडून आहे. सूर्य आणि चंद्र, दोन्ही आकाशात कुठेतरी हरवले आहेत आणि आकाशाचा रंग निघुन तिथे आता ज्वालामय ढग आले आहेत. समुद्राचा रंग लाल झाला आहे, आणि त्यातून मनुष्याचा वास येत आहे. सगळीकडे भयान शांतता आणि त्या शांततेत एक विद्रूप हास्य, आवाज एका पर्वतावरुन येत होता. डॉ. अभिजीतने त्या पर्वताकडे पाहिले असता त्याला तिथे हातात त्रिशूल घेऊन उभा असलेला अग्निपुत्र दिसतो. तो डॉ.अभिजीतकडेच बघत हसत होता. हसता हसता थांबून तो म्हणाला, "तू मनुष्यप्राण्याला वाचवु शकला नाहीस. अशा प्रकारे मी माझं कर्म पूर्ण केलंय."
डॉ.अभिजीतला लगेच जाग येते. त्याच्या संपूर्ण शरीर घामाने ओले झाले होते. त्याने घड्याळ पहिलं तर रात्रीचे २ वाजले होते. ऊठून तो बाथरुममध्ये गेला. तोंडावर पाणी शिंपडल्यावर त्याने आरशात पहिलं तर त्याच्या पाठीमागे रूद्रस्वामी उभे होते.
"स्वामी? तुम्ही इथे?" असं म्हणत तो त्यांचे चरणस्पर्श करतो.
"दीर्घायुष्य प्राप्त होवो." असं म्हणत ते अभिजीतच्या डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवतात.
"स्वामी? तुम्ही आलात, खुप बरं झालं. माझ्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत." डॉ. अभिजीत म्हणतो.
"मला त्याची पूर्ण कल्पना आहे." डॉ. अभिजीतच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं, "मोठ्या जिद्दीने आणि साहसाने तू ती दैव्य शक्ती असलेली तलवार मिळवलीस खरी, पण तू अग्निपुत्राचा नाश नाही करु शकलास. मी तुला अगोदरच सांगितलं होतं, तुम्हा दोघांपैकी केवळ एकच या पृथ्वीतलावर जिवंत राहू शकेल, आणि तू त्याला संहार करायला सोडून दिलंस." रुद्रस्वामी म्हणतात.
"पण आम्ही त्याला शोधायचा खुप प्रयत्न केला. पण तो आमच्यापैकी कुणालाही सापडला नाही." डॉ. अभिजीतने खुलासा केला, "म्हणजे तो खरंच जिवंत आहे?"
"त्याला असंच मरायचं असतं तर तुला मी समुद्रात का पाठवलं असतं?" रुद्रस्वामी प्रतिप्रश्न करतात.
"मग तो नक्की कुठे गेला आहे?" डॉ. अभिजीतने विचारलं.
"तो फ़क्त काही काळापुरता शांत बसला आहे, तुझ्या मृत्यूची वाट बघत." रुद्रस्वामी म्हणाले.
"माझ्या मृत्यूची वाट बघत?" डॉ. अभिजीत आश्चर्याने विचारतो.
"होय. तुझा मृत्यु. हे खरे आहे की त्याचा मृत्यु तुझ्याच हाताने होणार आहे. पण जर तुझा मृत्यु झाला, तर त्याला कुणीही मारू शकणार नाही." रुद्रस्वामी म्हणाले.
"पण इतकी मोठी सुरक्षाव्यवस्था असताना माझ्या जीवाला खरंच धोका आहे का? मृत्युला मी घाबरत नाही. पण मला कोण मारणारआहे?"डॉ.अभिजीत विचारतो.
"तुला कोणी मारणार नाहिये. पण तू अजुन किती वर्षे जगणाऱ आहेस? जास्तीत जास्त तू आणखी ५५ वर्षे जगशील. त्यानंतर तर तुला मृत्यु येणारच ना! तेव्हा तो परत येईल. ४००० वर्षे थांबलाच होता न तो, मग आणखी ५०-५५ वर्षे त्याला जड नाहीत. तो डोक्याने काम करतोय आणि तुम्ही मनुष्य प्राणी डोकं असून ते बाजूला ठेवल्यासारख वागत आहात. फ़क्त ठराविक वेळेपुरता विचार करु शकता तुम्ही लोक? मुळात तुमच्याकडे दुरदृष्टिच नाहिये." एवढं बोलून रुद्रस्वामी पुन्हा अदृश्य होतात.
"स्वामी मला माझी चूक लक्षात आली आहे. पण मी त्याला कसं शोधु?" डॉ. अभिजीत म्हणतो.
"जसं त्याने तुला शोधलं होतं..." आणि तो आवाज बंद होऊन रुद्रस्वामी पुन्हा एकदा अदृश्य होतात.
डॉ. अभिजीत त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न करतो, पण ते तिथून केव्हाच निघाले होते. आता अग्निपुत्राला कसं शोधव हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित होता. त्याचं डोकं काम करत नव्हतं, हताशपणे तो हॉलमधील सोफ्यावर बसतो. समोर ठेवलेल्या दैव्य तलवारीकडे पाहत असताना त्याला एक गोष्ट चटकन आठवते. फुजियामा पर्वतावर जेव्हा अग्निपुत्राचा जन्म झाला तेव्हा माझ्यात सुद्धा दैव्य शक्तींनी प्रवेश केला. पण मी तो ओळखु तरी कसा?
अग्निपुत्र तिथे माझ्या नैसर्गिक मृत्यूची वाट बघतोय आणि मी इथे हातावर हात ठेवून त्याची वाट बघतोय. कुठे गेली होती माझी बुद्धि? तेवढ्यात त्या तलवारीजवळ काही हालचाल होते आणि तलवार बोलू लागते, "उठ, अग्निपुत्र यज्ञ करत आहे. त्याचा यज्ञ पुर्ण झाला तर तो अर्धसर्पानुष्य, डायनोसोर आणि तुमचे अतिप्राचीन पूर्वजांची नव्याने रचना करेल. ते सगळे मग त्याचे गुलाम होतील. अर्थातच तो त्या सर्वांना मनुष्याचा नाश करण्याची आज्ञा करेल. यज्ञ पूर्ण होईपर्यंत तुझा मृत्यु झाला तर तो यज्ञ थांबवेल नाहीतर यज्ञातून मिळालेल्या सैन्याच्या आधारे तो मनुष्याचा संहार करेल. उठ आणि संपूर्ण शक्ती एकवटुन अग्निपुत्राचा नाश करण्यासाठी सज्ज हो..."
उठून अभिजीत ती तलवार आपल्या हातात घेत डोळे बंद करतो, आणि सर्व शक्ती एकवटून ती तलवार आकाशाच्या दिशेने वर उचलतो. आकाशात वीज कड़कडून ती अंगावर कोसळावी तशी एक अद्भुत शक्ती अभिजीतच्या शरीरात संचारु लागली.
(क्रमशः)