एका विशालकाय हॉल मध्ये चहू बाजूना यंत्रांचे जाळे पसरले होते. प्रत्येक मशीनवर असलेल्या अगणित छोट्याछोट्या लेन्स चमकत होत्या ज्यामुळे तो हॉल अत्यंत सुंदर दिसत होता.

परंतु त्या हॉलच्या सौंदर्यापेक्षाही तिकडे सुरु असलेले संशोधनात्मक प्रयोग अधिक महत्वाचा होता.

हि गोष्ट तिकडे उपस्थित डॉ. आनंद वैशंपायन आणि त्यांचे दोन सहकारी विनय आणि गौतम यांना चांगलीच ठाऊक होती.

“ आज काहीही झालं तरी आपला एक्स्पेरिमेंट सक्सेसफुल करायचा आहे.”  डॉ. वैशंपायन म्हणाले.

“ हो सर आज व्हायलाच पाहिजे.” विनय म्हणाला “ गेली दोन वर्ष आपण इकडे घासतोय आता काम नाही झालं ना तर अक्षरशः दुखायला लागेल....”

डॉ. वैशंपायन यांना विनयने केलेला कमरेखालचा विनोद आवडला नाही परंतु त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

“आज यश मिळेलच याची काय गेरेन्टी आहे?” शंकेखोर स्वभावाच्या गौतमने प्रश्न विचारला.

“ जर प्रोफेसर ब्रिजची आज सटकली तर आपल्या प्रोजेक्टला सक्सेस मिळणार म्हणजे मिळणार...” डॉक्टर म्हणाले

“ मग तो ब्रिज  येतोय?” विनयने प्रोफेसर ब्रिज  यांचा एकेरी उल्लेख करून आगाऊपणा केला यावर डॉक्टर वैशंपायन काही बोलणार इतक्यात प्रोफेसर ब्रिज  यांनी त्या प्रयोगशाळेत प्रवेश केला.

“ हाऊ डू यु डू, डॉक्टर एनंद विशम पाईन?” असे म्हणत डॉक्टर ब्रिज  यांनी विनय समोर हात पुढे केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे विनय गांगरला. तो घाबरून त्याचे बॉस डॉ. वैशंपायन यांच्याकडे पाहू लागला.

“ एक्स्क्यूज मी, आय एम डॉ. आनंद. आनंद वैशंपायन.”

“ ओह सॉरी पण मला वाटतं कि माझी मिटिंग यांच्याबरोबर झाली होती....” प्रोफेसर ब्रिज  गोंधळून म्हणाले.

“ माफ करा प्रोफेसर ब्रिज  पण मी आपल्याला भेटायला आलो होतो. तेव्हा तुम्ही कपडे घालायला विसरला होतात आणि मी तुम्हाला माझे कपडे दिले होते.” असे डॉ. वैशंपायन यांनी सांगताच प्रोफेसर ब्रिज  ओशाळले आणि त्यांनी हार मानली. परंतु हे तिघे मात्र विचारात पडले कि इतका मोठा भौतिकशास्त्रज्ञ इतका विसराळू कसा?

“ हे पहा कोण आनंद आहे याच्याशी मला काही कर्तव्य नाही. तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट बद्दल बोला.” प्रोफेसर  

“ प्रोफेसर ब्रिज , तर माझं हे प्रोजेक्ट काहीसं असं आहे...” असे म्हणत आनंद एका टेबलाजवळ पोहोचला. त्या टेबलावर तांब्याच्या तारेच्या दोन कॉईल एकमेकींपासून काही अंतरावर ठेवल्या होत्या.

“ मी पहिल्या  कॉईल मध्ये एसी करंट पास केला आहे आणि आपणास दिसत असेल कि दुसऱ्या कॉईलशी जोडलेला अमीटर आहे त्यात देखील करंट दिसतोय. फैरेडेच्या इलेक्ट्रोमैगनेटिक इंडक्शन नियमानुसार दोन्ही कॉईल एकमेकांशी जोडलेल्या नाहीत तरीही त्या इलेक्ट्रिक रूपाने जोडल्या जातात.” वैशंपायन

“ तुम्ही काय फालतुगिरी चालवली आहे? जगातील एका सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञाला तुम्ही हायस्कूल लेवल फिजिक्स सांगताय?” प्रोफेसर ब्रिज  आता वैतागले होते.

“ मी हे सांगतोय कारण हे सांगितल्याशिवाय हा प्रयोग मी तुम्हाला समजावून सांगू शकत नाही.” वैशंपायन शांतपणे म्हणाले.

“ ठीक आहे बोला...” ब्रिज  

पुढे डॉ. वैशंपायन बोलू लागले. “ दोन अगदी भिन्न भिन्न कॉईलना जोडण्याचे काम इलेक्ट्रोमैग्नेटिक चार्जने प्रभारीत कण म्हणजेच फोटोन करतात.”   

“ माहित्ये मला....” प्रोफेसर ब्रिज  शांतपणे म्हणाले परंतु त्याचा सूर असा वाटत होता कि ते कोणत्याही क्षणी भडकतील.


“ हो पण आता यापुढे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला माहित नसेल. मी याच इलेक्ट्रोमैगनेटिक इंडक्शनचा उपयोग मी दोन शरीरे जोडण्यासाठी करणार आहे. म्हणजे एक शरीर जिवंत असेल तर दुसरे शरीर असेल त्याचे इलेक्ट्रोनिक प्रतिरूप."

“ म्हणजे?..” आता मात्र प्रोफेसर ब्रिज  आश्चर्यचकित झाले होते.

“एखाद्या जिवंत शरीराची प्रत्येक हालचाल एका विद्युत स्पंदनामुळे घडून येते. ती स्पंदने त्या शरीराच्या मेंदुमधून निर्माण होत असतात तर कधी मेरूदंड म्हणजे पाठीच्या कण्यातून. मेंदूने दिलेले आदेश शरीरातील न्यूरॉनच्या माध्यमातून शरीराच्या त्या अवयवापर्यंत पोचते ज्या अवयवासाठी तो आदेश मेंदूने दिलेला असतो. आणि त्याचा परिणाम असा होतो कि तो अवयव हालचाल करतो. उदाहरणार्थ माझा मेंदू जेव्हा माझ्या हाताला एखादी गोष्ट लिहिण्याचा आदेश देईल तेव्हा तो आदेश न्यूरॉनच्या माध्यमातून हाताला मिळेल आणि मग हात पेन उचलून जे काही लिहायचे आहे ते लिहायला सुरुवात करेल.”

प्रोफेसर ब्रिज  आता शांतपणे डॉ. वैशंपायन यांचे म्हणणे ऐकून घेत होते. त्यांना आता हे पटले होते कि डॉ. वैशंपायन काहीतरी महत्वाचे आणि रंजक सांगत आहेत.   

“ आता या विद्युत स्पंदनाची विशेषता हि आहे कि ते स्थिर नसून सतत बदलत असतात. त्यामुळे त्यांना आपण फैरेडे यांचा हा नियम लागू करू शकतो. म्हणजेच याचा अर्थ असा कि एखाद्या सजीवाच्या शरीराजवळ एखादी कॉईल ठेवली तर त्यात विद्युत स्पंदने निर्माण होतील. हा विद्युतप्रभार इतका सूक्ष्म असेल कि अत्यंत सेन्सेटिव अमीटर देखील त्याचे मापन करू शकणार नाही.”

“ठीक आहे..” प्रोफेसर उत्सुकतेने ऐकत होते.

“ परंतु एक पद्धत आहे जिच्यात आपण हं विद्युतप्रभार वाढवू शकतो.” 

“कोणती?..” प्रोफेसर

“ शारीरिक विद्युत धारा किंवा कॉईल यांच्यातील विद्युतप्रभार निर्माण करण्याचे काम फोटोन करतात जर काहीतरी युक्ती करून आपण या फोटोनची एनर्जी वाढवण्याचे काम केले तर कॉईल मधील विद्युत धारा इतकी वाढू शकेल कि तिचा आपण वापर करु शकू...” वैशंपायन म्हणाले

“ परंतु फोटोनची एनर्जी कशी वाढवणार...?” प्रोफेसर ब्रिज  यांनी विचारले.

“ यासाठी आपल्याला लेन्सेस, प्रिझम आणि एलसीडी सारख्या प्रकाशीय यंत्रांचा उपयोग करावा लागेल. या प्रयोगशाळेतील संपूर्ण सेटअप याच थिअरीवर आधारित आहे.”  डॉ. वैशंपायन म्हणाले.

“ परंतु अशा प्रकारे कॉईलचा करंट वाढवून तू नक्की साध्य काय करणार आहेस?”

‘‘फैरेडे च्या नियमानुसार ज्या पैटर्न मध्ये पहिल्या कॉईल मध्ये जो विद्युत प्रभार वाहतो तोच पैटर्न दुसऱ्या कॉईल मध्ये दिसून येतो. अगदी याच नियमानुसार जिवंत शरीराचा मेंदू ज्याप्रमाणे आदेशाची शृंखला निर्माण करेल त्याचप्रमाणे कॉईलद्वारा उत्पन्न झालेला विद्युतप्रभार कार्य करेल. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण विद्युतप्रभाराच्या रुपात एक असे सूक्ष्म शरीर निर्माण करू शकू जे संपूर्णपणे जिवंत शरीराच्या मेंदूशी जोडलेले असेल आणि त्याच्या सर्व आदेशांचे पालन करेल.”

“ अप्रतिम कल्पना आहे. मला वाटतं कि हे सूक्ष्म शरीर आपल्यासाठी खूपच महत्वाचे असेल.” प्रोफेसर ब्रिज  म्हणाले.

“ हो नक्कीच. कारण हे सूक्ष्म शरीर हाडामासाचे नसेल त्यामुळे आपण त्या शरीराला कुठेही पाठवू शकू जसे अंतराळ, समुद्र किंवा एखाद्या जिवंत शरीराच्या आतमध्ये, कधीही, कोणत्याही वेळी. अशाप्रकारे आपण कोणत्याही जागी जाऊन प्रत्यक्ष न जाता संशोधन करू शकू. इतकेच काय तर आपल्या सूक्ष्म शरीराच्या सहाय्याने आपण दोन अणू देखील एकमेकांशी जोडू शकू, एखादी सूक्ष्म सर्जरी करू शकू किंवा शरीरात उपस्थित बैक्टीरिया शी आपण लढा देऊ शकू...” डॉ. वैशंपायन खूपच उत्कटतेने सांगत होते. 

“ मग वाट कसली पाहताय. प्रयोग सुरु करा...” प्रोफेसर ब्रिज  म्हणाले.   

“ इथेच तर गाडी अडकली आहे. प्रॉब्लेम असा आहे कि आम्ही हा संपूर्ण प्रयोग किमान ५०० वेळा करून पहिला आहे. परंतु सूक्ष्म शरीर निर्माण करणे आम्हाला अजून पर्यंत शक्य झालेले नाही.” वैशंपायन.

“ हम्म... मी तुझ्या प्रयोगाचे मैथैमेंटिकल मॉडेल पाहू इच्छितो.” ब्रिज

डॉ. वैशंपायन प्रोफेसर ब्रिज  यांना त्यांच्या कॅबीन मध्ये घेऊन गेले. त्यांनी त्यांच्या हातात एक फाईल दिली. प्रोफेसर ब्रिज  एक एक पान उलटू लागले. थोड्या वेळाने ते म्हणाले,

“ डॉ. विषम पाईन, तुम्ही फोटोन च्या पाथची इक्वेशन लिहिली आहे त्यात प्रोबेबिलिटीचा वापर केलेला दिसत नाही.?”    

“ त्याची काय आवश्यकता आहे? फोटोनचा पाथ तर निश्चित असतो ना?”

“हीच तर चूक झाली तुमची.. क्वांटम लेवल वर कोणत्याही कणाची गती आणि पाथ निश्चित नसतो. यासाठी आपण प्रोबेबिलिटीचा वापर करतो.” ब्रिज

“ होय का. हरकत नाही...वापरूया न मग...” डॉ. वैशंपायन म्हणाले.

“ आता जा ...मला यावर काम करू दे...निघा.” प्रोफेसर ब्रिज  प्रचंड तुच्छपणे म्हणाले.

अपमान होऊन देखील डॉक्टर वैशंपायन काही बोलले नाहीत कारण त्यांना प्रोफेसर ब्रिज  यांच्या मदतीची अपेक्षा होती. ते बाहेर जाताना पुटपुटले..

“अडला हरी.....ब्रिज  चे पाय धरी ....  

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel