राजेशने हिम्मत करून हलक्याच आवाजात विचारलं, "को... कोण आहे तिथे?"
पण उत्तर मिळालं नाही. सरकण्याचा आवाज आता बंद झाला.
हिम्मत करून त्याने टेबलावरची टॉर्च उचलून ती चालू केली आणि टॉर्चच्या प्रकाशात पलंगाखाली बघितलं. तिथे एक जुनी, पिवळसर खेळण्याची मोठी बाहुली हालचाल न करता निपचित पडलेली होती, जिचे हिरवे डोळे त्याच्याकडे टक लावून बघत होते.
बाहुलीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. राजेशने घाबरून ती बाहुली बाहेर काढली आणि त्या बाहुलीचे तो निरीक्षण करू लागला. अचानक ही बाहुली रूम मध्ये कशी काय आली? खिडकीतून? पण मला तर दिसली नाही?
बाहुलीच्या कपड्यांमध्ये त्याला काहीतरी लपवलेलं आहे असं जाणवलं. त्यात एक घडी केलेली चिठ्ठी सापडली. टॉर्चच्या उजेडात त्याने चिठ्ठी उघडून बघितली. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, "तुला माझ्यासोबत खेळायला आवडेल का?"
आता राजेशच्या शरीरभर सारसरून थंडगार काटा उभा राहिला आणि तो उभा राहिला. त्याने ती बाहुली खाली टाकली. पळत जाऊन त्याने खोलीचा दरवाजा उघडला पण त्याला बाहेर जाता येईना. दरवाजा आपोआप जोराने बंद झाला आणि राजेश खोलीच्या आत फेकला गेला.
एक भयानक हास्य असलेला आवाज आला, "खेळ तर आता सुरू झाला आहे. एकटेपणा कसा घालवायचा हे आता तुला कळेल. मी तर कित्येक वर्षांपासून एकटीच आहे. मी सुद्धा जोडीदार शोधत होते. त्या खिडकीसमोरच्या झाडावर बसून रोज मी तुला बघत होते. पण आज तू मला बोलवलेस आणि मी आले."
अचानक राजेशला आठवले की, आज सकाळी तो एका सिद्ध योगी बाबांकडे गेला होता. त्यांची सेवा करून झाल्यानंतर राजेश जेव्हा त्यांच्या पाया पडला तेव्हा त्यांनी आशीर्वाद देताना त्याला सांगितले होते की, "आज तुझी मनातली एक इच्छा पूर्ण होईल. पण मनातली इच्छा मागताना जो विचार करशील तो व्यवस्थित विचार करून माग. शब्द आणि वाक्य काळजीपूर्वक निवड. एकच इच्छा दहा वेळा मनात बोलून झाल्यानंतर ती पूर्ण होईल. काळजीपूर्वक शब्द आणि वाक्य नाही निवडले तर ती इच्छा पूर्ण तर होईल, पण ती इच्छा कशा पद्धतीने पूर्ण होईल हे सांगता येणार नाही."
सकाळची ही गोष्ट राजेश पूर्णपणे विसरून गेला होता. त्याला विश्वास नव्हता की असे काही घडू शकते आणि मनातली इच्छा पूर्ण होऊ शकते. आता त्याच्या हातातून टॉर्च खाली पडली. ती बाहुली आता गायब झालेली होती.
बाहेर अचानक विजेचा जोरात कडकडाट झाला आणि त्या उजेडात राजेशला त्याच्या बेडवर उशीला टेकून, पाय लांब करून कुणीतरी बसलेलं दिसलं. त्या आकृतीचे डोळे राजेशकडे रोखून पहात होते आणि पुन्हा आवाज आला, "खेळ तर आता सुरु झाला आहे!"
खिडकी समोरील सुनसान जागेवर असलेल्या त्या झाडाच्या फांदीवर वर्षानुवर्षे कुणीतरी बांधून ठेवलेली एक बाहुली आता तिथून नाहीशी झाली होती!
(समाप्त)