पर्वतावर राहणार्‍या एका अस्वलाला असे वाटले की जगभर प्रवास करून निरनिराळे प्रदेश, प्राणी व त्यांची शेतीभाती यांचा अभ्यास करावा. मग ते अस्वल प्रवासाला निघाले असता त्याने बरीच अरण्ये व देश पाहिले. एके दिवशी वाट चुकून ते एका शेतकर्‍याच्या कुंपणात शिरले असता तेथे त्याने एका डबक्याजवळ बर्‍याच कोंबड्या पाणी पीत असताना पाहिल्या. त्या कोंबड्या पाण्याचा एक घोट घेतल्यावर आकाशाकडे तोंड करत व पुन्हा खाली तोंड करून दुसरा घोट घेत. हा प्रकार पाहून अस्वलाला इतके नवल वाटले की त्याविषयी माहिती मिळावी म्हणून त्याने कोंबड्यांना विचारले, ' पाणी पिताना असे सारखे सारखे आकाशाकडे काय बघता ?' त्यावर कोंबड्या म्हणाल्या, ' देवानं आम्हाला जी सुखं दिली त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही असं करतो. ही धार्मिक चाल फार दिवसांपासून चालत आली असून ती जर मोडली तर आम्हाला मोठं पाप लागेल.' हे ऐकताच अस्वल मोठ्याने हसू लागले व धर्मभोळेपणाची टर उडवू लागले. तेव्हा एक कोंबडी रागावून मोठ्या धीटपणे म्हणाली, 'तू या ठिकाणी अगदी नवीन आहेस, त्यामुळे तुझी ही असभ्य अशी वागणूक कदाचित् क्षम्य असेल, पण एक गोष्ट तुला सांगितल्याशिवाय मला राहावत नाही. ती ही की, जे लोक धार्मिक कृत्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या देखत त्या धार्मिक कृत्याची टवाळी करण्यास अस्वलाशिवाय दुसरा कोणताही प्राणी तयार होणार नाही.'

तात्पर्य

- दुसर्‍याच्या धर्माविषयी टवाळकी करणे मूर्खपणाचे होय.फ़

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel