एका उद्योगी माणसाने एक लहानशी बाग केली होती व तिच्याभोवती भिंत घालून आत जाण्यास फक्त एकच दार ठेवले होते. ते दार लोखंडी गजाचे असून ते वाटेल तेव्हा खाली सोडता यावे अशी व्यवस्था केली होती. बागेच्या आसपास बरेच लांडगे होते. एके दिवशी एक लांडगा बागेत शिरला असता बागेतील नोकराने युक्तीने त्याला एका खड्ड्यात पाडून पकडले व झाडाला बांधून ठेवले. इतके केल्यावर पुढे काय मजा होते ती पाहण्यासाठी तो थोडा वेळ दुसर्‍या झाडाखाली जाऊन बसला. काही वेळाने तो लांडगा गुरगुरू लागला व त्यामुळे आसपासच्या लांडग्यांचा मोठा कळप येऊन बागेत शिरला. सगळे लांडगे आत आलेत असे पाहताच नोकराने ते लोखंडी दार वरून खाली सोडले. त्याचा आवाज ऐकताच सारे लांडगे बाहेर पडण्यासाठी दाराजवळ येऊन धडपड करू लागले परंतु दार अगदी पक्के असल्याने काहीच उपयोग होईना. मग रागाने ते सगळेजण पहिल्या लांडग्याकडे गेले व एका क्षणात त्याला सर्वांनी मिळून मारून टाकले.

तात्पर्य

- आपणास संकटात पाडण्यास कारण झालेला जरी आपल्या जातीचा असला तरी कोणासही त्याचा राग आल्याशिवाय राहणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel