ग्रीस देशातील एका गावाच्या देवळात एका नवीन मूर्तीची स्थापना करायची होती. त्यावेळी ती मूर्ति दुकानातून गावाकडे नेण्यासाठी एका गाढवाच्या पाठीवर घालून गाढव रस्त्याने नेत असता गावातले भाविक लोक त्या मूर्तीला नमस्कार करू लागले. ते पाहून गाढवास वाटले की, लोक हा मान आपल्यालाच देत आहेत. म्हणून त्याने गर्वाने आपले कान उभारले, लाथा झाडल्या व शेपूट उभारले. काही वेळाने त्या गावी येऊन पोहचल्यावर त्याच्या पाठीवरील मूर्ती तेथे काढून ठेवली व त्याचा मालक त्याच्यावर बसला व परत आपल्या गावी येण्यासाठी निघाला. त्याला त्या कामासाठी मिळावे तितके पैसे न मिळाल्यामुळे तो चिडला होता व तो राग गाढवावर काढीत होता. गाढवाला मारीत होता. रस्त्यातील लोकही पूर्वीप्रमाणे गाढवाकडे लक्ष देईनासे झले. तेव्हा त्या गाढवाला समजले की जातेवेळी लोकांनी जो नमस्कार केला तो आपल्याला नाही तर आपल्या पाठीवरील मूर्तीला केला होता.
तात्पर्य
- एखाद्या थोर माणसास लोकांनी मान दिला म्हणजे तो आपणास दिला असे त्याच्या बरोबर चालणारे मूर्ख लोक समजतात, परंतु पुढे खरा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना खजिल मात्र व्हावे लागते.