एका गुराख्याचे पोर मेंढ्या चारीत असता संध्याकाळ झाली. तेव्हा तो सगळ्या मेंढ्यांना घराकडे घेऊन जाण्यास निघाला, पण एक मेंढी मागे राहिली होती, ती एका खडकावर उभी राहून तेथले कोवळे गवत खाऊ लागली. तिला आपल्याबरोबर येण्यासाठी त्याने दोनतीन वेळा ओरडून सांगितले. पण ती येईना तेव्हा रागाने एक दगड उचलून त्याने तिला मारला. तो तिच्या कानाला लागला व तेथून रक्त वाहू लागले. ते पाहून मेंढीचा मालक आपल्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही असे त्याला वाटले. मग तो त्या मेंढीजवळ जाऊन म्हणाला, 'अग, मी जो दगड फेकला तो तुझ्या कानाला लागावा म्हणून नाही, 'तरी तू ही गोष्ट घरी गेल्यावर आपल्या मालकाला सांगू नकोस.' त्यावर मेंढी म्हणाली, 'ही गोष्ट मालकापासून लपवून ठेवता येणार नाही, कारण मी जरी ती सांगितली नाही तरीही ते कानाचं रक्त पाहिल्यावर एकूण सगळा प्रकार मालकाच्या लक्षात येऊन तो तुला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही.'
तात्पर्य
- अपराधाबद्दल होणारी शिक्षा कधीही टाळता येत नाही.