एका अरण्यातील झाडाखाली एक बोका व एक कोल्हा बोलत बसले होते. कोल्हा म्हणाला, 'अरे बोकोबा, कदाचित आपल्यावर जर एखादं संकट आलं तर हजार युक्त्या करून मी त्यातून निभावून जाईन पण तुझं कसं होईल याची मला काळजी वाटते.'

बोका म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एकच युक्ती माहीत आहे. तेवढी चुकली तर मात्र माझी काही धडगत नाही. कोल्हा म्हणाला, 'बाबा रे, तुझी मला फारच काळजी वाटते. अरे, एक दोन युक्त्या मी शिकवल्या असत्या पण आजचा काळ असा आहे की ज्यानं त्यानं आपल्या स्वतःपुरतं पहावं. दुसर्‍याच्या उठाठेवी करू नयेत. बरं तर येतो मी. रामराम !' इतके बोलून कोल्हा निघाला तोच मागून शिकार्‍याची कुत्री धावत आली. बोक्याला झाडावर चढता येत असल्याने तो पटकन् झाडावर चढला. पण कोल्ह्याच्या हजार युक्त्यांपैकी एकही त्याच्या उपयोगी पडली नाही. तो घाबरून थोडसा पुढे पळत नाही तोच शिकारी कुत्र्यांनी त्याला पकडले.

तात्पर्य

- दुसर्‍यापेक्षा मी अधिक शहाणा अशी बढाई मारणार्‍यास त्याचे शहाणपण वेळेवर उपयोगी पडत नाही. पण ज्याला तो कमी शहाणा समजतो त्याचेच शहाणपण वेळेला उपयोगी पडते. एखाद्याला एकच विद्या चांगली येत असेल तर तिच्यामुळे जे काम होईल ते अनेक अपुर्‍या विद्यापासून होणार नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel