सृष्टीचें दर्शन घ्यावें, आहारांत परिमितता ठेवावी, थोडें फार खेळावें. खेळ ही पवित्र वस्तु आहे. भगवान् कृष्ण गोकुळांत खेळत असत. त्यांचा तो सवंगडी पेंद्या, तो का कोणी विसरेल? यमुनेच्या तीरी गोपाळबाळांबरोबर कृष्ण परोपरीचे खेळ खेळे. टिप-या खेळे, हमामा, हुतूतू, चेंडू, लगो-या, सारे खेळ खेळे. भगिनी निवेदिता यांनी एके ठिकाणी म्हटलें आहे “श्रीकृष्णांनी खेळांनाहि दिव्यता दिली आहे.”
अशा प्रकारें आहार, विहार, इत्यादि क्रिया परिमित प्रमाणांत कराव्यात. निसर्गाचें. आकाशाचें दर्शन घेत जावें. संयम राखावा.
शरिर, मन, बुद्धि, सतेज निकोपी राहतील असें करावें. म्हणजे आपणांस स्वधर्मकर्म सदैव नीट आचरतां येईल.
“मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धिचें कारण”
असें तुकारामांनी म्हटलें आहे. शरिर प्रसन्न असणें म्हणजे मनहि प्रसन्न राहील. तिमच्या अंतर्बाह्य प्रसन्नतेनें इतरांसहि समाधान लाभेल. त्यांनाहि उत्साह व आशा येईल. अशा रितीनें जीवनांत निर्दोष कर्मोग आणण्यासाठी पराकाष्ठा करावी. कृपाळू भगवंतांनी बारिकसारीक सूचना जणुं येथें दिल्या आहेत. त्या सदैव ध्यानी धराव्या व जीवन होईल असें करावें.