अध्याय ७ वा
सहाव्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत आपण कर्माचा महिमा पाहिला. कर्म हातून नीट व्हावें म्हणून सहाव्या अध्यायांत भगवंतांनी साधनाहि सांगितली. आता सातव्या अध्यायापासून बाराव्या अध्यायापर्यंत भक्तीचा ऊहापोह आहे. भक्तिम्ङणजे साधनांचा राजा. इतर साधनें म्हणजे साबण, रिठे, सोडा हीं भरपूर असून पाणी नसेल तर कपडे स्वच्छ कसे करावयाचे? परंतु साबण, रिठे वगैरे नसले तरी सूक्ष्म मळ शेवटीं भक्तीनेंच धुतले जातात.
या सृष्टीत एकाच तत्वाचा सारा पसारा आहे. जसा एकादा कुशल चित्रकार एकाच ब्रशानें व एकाच रंगानें नानविध पशुपक्षी रंगवितो, मानव रंगवितो, निसर्गातील दृश्ये रंगवितो, तसेंच तो विश्वभर करीत असतो. सर्वत्र एकच मसाला. बाह्य रूपरंग निराळें. परंतु आंत एकच तत्व. सर्व ब्रह्मांडांतील बाह्य विविधतेच्या आंत असलेला तो परमात्मा पाहणें, त्याची कळा ओळखणें ही मुख्य गोष्ट आहे. ही दृष्टि ज्याला आली त्याला सारें कांही मिळालें. ही दृष्टि ज्याच्याजवळ नाही त्याला इतर कांही मिळाले तरी व्यर्थ होय.
त्या परमात्म्याला सर्वत्र पाहणें म्हणजे खरी भक्ति. परमेश्वराकडे आपण निरनिराळ्या मार्गांनी जात असतों. भक्तीचे निरनिराळे प्रकार असतात. या अध्यायांत भक्तांचे चार प्रकार आहेत.
आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी व ज्ञानी असे हे चार प्रकार आहेत. या चारी भक्तांना “उदार” हें विशेषण लावलेलें आहे. “उदारा: सर्व एवैते” अर्जुना, हे सारे भक्त उदार असतात. उदारतेशिवाय भक्ति संभवतच नाही. किंबहुना असेंहि म्हटलें तरी चालेल की उदारता म्हणजेच भक्ति.
आपल्यासारखेच दुसरे आहेत ही जी एक भावना, तिच्या पोटीं भक्तीचा जन्म आहे. आर्त म्हमजे दुस-याच्या दु:खाने विव्हळ होऊन परमेश्वरास हांका मारणारा तो आर्त भक्त नव्हे. अर्थात् स्वत:चे सुखदु:खहि देवाजवळ सांगणारा तो कांही कमी प्रतीचा असें नाही. ती गोष्ट सुद्धां या जगांत दुर्मीळ आहे. सतराजणांसमोर तोंड वेंगाडण्यापेक्षां त्या जगच्चालकाचीच करूणा भाकणें ही गोष्टहि सामान्य आहे. एकदां एक फकीर अकबर बादशहाकडे कांही मागण्यासाठी म्हणून आला. त्यावेळेस बादशहा
मशिदीत प्रार्थना करीत होता. देवाजवळ अधिक धनदौलत, अधिक राज्य मागत होता. बादशहाची ती प्रार्थना ऐकुन फकीर मुकाट्यानें परत चालला. परंतु प्रार्थनेनंतर बादशहास नोकर म्हणाला कीं फकीर आला होता, परंतु तो तसाच माघारा गेला. अकबरानें त्या फकीरास बोलावून आणलें. त्यानें त्याला विचारलें “माझ्याकडे येऊन असा विमुख कां जातोस? काय हवें तें माग” तो फकीर म्हणाला “राजा, तुझ्याजवळ मागण्यांत काय अर्थ? तूंहि माझ्या सारखा एक भिकारीच आहेस ! ज्या परमेश्वराजवळच मलाहि मागूं दे.”
तुकारामांनी म्हटलें आहे:
“जाऊंदेवाचिया गांवा
देव देऊल विसावा
देवा सांगूं सुखदु:ख
देव निवारील भूक”