य़ज्ञ, दान, तप यांचा महिमा सांगून सतराव्या अध्यायाचे शेवटी भगवान् म्हणतात “कोणतेंहि कर्म करतांना ‘ॐ तत् सत्’ असें म्हणत जा.” याचा काय अर्थ? ॐ म्हणजे काय? उपनिषदांत सांगितलें आहे की सारें वाङमय कढवून त्यांतून ॐ हें सारे सार काढलें. ॐ हें परमेश्वराचें नांव. यांत सारें तत्त्वज्ञान आलें. सारे धर्म आले. ॐ चा अर्थ होय असाहि आहे. देव आहे का? ॐ होय, देव आहे. देव म्हणजे सर्वत्र सच्चिदानंदाचे साम्राज्य. सर्वत्र सत् म्हणजे मंगल भावना आहे; चित्त म्हणजे ज्ञान आहे. आणि जेथें हृदय मंगल आहे व बुद्धि शुद्ध आहे, तेथें आनंद दिसणार नाही तर कोठें? म्हणून आपण ॐ म्हणूं या. देव आहे. ??? परिपूर्णता आहे. त्याचे स्वरूप कसें आहे? ‘सत्’ तो देव मंगलमय आहे. ती परिपूर्णता शिवस्वरूप आहे तें जे सुंदर ध्येय आमच्या डोळ्यांसमोर दिसत आहे तें सत् आहे. कोठें आहे तें सत् रूप ? तर उत्तर आहे ‘तत्.’ तें पहा. आमच्या डोळ्यांना स्पष्ट दिसत आहे. ‘ॐ तत् सत्’ या तीन शब्दांचा असा हा अर्थ आहे. न्यायमूर्ति रानडे ??? व्याख्यानांत म्हणाले “तो पहा हिंदुस्थान मला दिसत आहे. तेथें अन्न आहे. वस्त्र आहे; कला आहे; भांडणें नाहीत, रोग नाहीत, दुष्काळ नाहीत. सारे गुण्यागोविंदानें रहात आहेत. उत्तरोत्तर विकास करून घेत आहेत. असा तो हिंदुस्थान पहा. देवाची ही लाडकी भूमि पहा !” न्यायमूर्तीच्या या म्हणण्याचा अर्थ काय ? ॐ तत् सत् हा त्याचा अर्थ. कोणतेंहि कार्य करावयास निघतांना “तें माझें ध्येय, ते परमंगल असें ध्येय” असें म्हणून उभे रहा. हा या ॐ तत् सत् याचा अर्थ. ही श्रद्धा ही निष्ठा घेऊन उभें राहूं तरच कृतार्थ होऊं.
अध्याय १८ वा
आणि आतां शेवटचा अध्याय हा अध्याय. म्हणजे उपसंहार भगवान् सागंतात “काम्य कर्माचा त्याग तर करावयाचाच; परंतु जी स्वधर्माचरणाचीं कर्में करावयाची त्यांच्या फळांचाहि त्याग करावयाचा.” काम्य कर्में सारी निषिद्धच. जी कर्में मुद्दाम स्वार्थानें सुरू केली, तेथें फलत्याग संभवेल तरी कसा? आपल्या देशांतील कपड्यांचे दुकान घालणें हा स्वधर्म आहे. परंतु जवळचे लोक उपाशी मरत असतां परदेशांतील कापडाचें अधिक कमिशन मिळतें म्हणून दुकान घालणें हें काम्य कर्म आहे. अशी कर्में गीता निषिद्ध मानीत आहे. आणि जी स्वधर्माचरणाची कर्में करावयाची ती निष्कामबुद्धिनें करावयाची.
कर्म म्हटलें की थोडा तरी दोष त्यांत येतोच. अग्नीजवळ जसा धूर, तसा कर्माजवळ दोष. केवळ निर्दोष असें कर्म जगांत शक्य नाही. शेतीचें कर्म करतांना पायाखाली किडे तुडवले जातात म्हणून जर शेतीचेंच कर्म टाळूं बघूं, तर लोक उपासमारीनें मरूं लागतील. एक दोष टाळूं जाल, तर दुसरा त्याहून मोठा पदरी येईल. म्हणून ईश्वरार्पणबुद्धिनें कर्म करीत जा. शक्य तितकें निर्दोष कर्म व्हावें म्हणून खटपट करीत राहणें एवढेंच आपल्या हाती. अशा रितीनें कर्में करीत जातां जातां पूर्णता अंगी बाणेल. केवळ निरहंकारी दशा अंगी येईल. सर्वत्र आत्मरूप पाहाल. आसक्ति नष्ट होईल. भेद दुरावतील. असा जो कर्मयोगी, निष्काम सेवक, त्यानें मारलें तरी तें तारणें होतें. आई मुलाला मारते. परंतु मारतां मारतां स्वत: रडत असतें. ते का मारणें असतें ? ती मुलाला नसते मारीत. जणुं स्वत:लाच मारीत असते ! संतांचें मारणें हें अशा प्रकारचें असतें. रवीन्द्रनाथांना म्हटलें आहे “जो प्रेम करतो त्याला मारण्याचा अधिकार आहे.” परंतु आपण आधी मारण्याचा हक्क जणुं बजावूं पहात असतों. शिक्षक मुलाला छडी मारतो. परंतु प्रेम देतो का ? आधीं प्रेम द्या. आणि त्या प्रेमाच्या अधिकारावर शासन करण्याचाहि अधिकार हवा असेल तर मिळवा.