तो: मृत्यूपत्र लिहीते आहेस
ती: हो
तो: माझा वाटा लिहीलास?
ती: कोण तू
तो: विसरलीस?
ती: नाही. विसरले नाही. मृत्यूपत्रात तुझ्यासाठी
लिहीण्याजोगं काही उरलं नाहीय माझ्याकडे
तो: खरंच?
(तिनं पेन बंद केलं, खुर्चीत मागे ज़रा रेलून बसली, थेट
त्याला डोळा भिडवत म्हणाली)
ती: हो!
तो: एके काळी खूप प्रेम होतं तुझं माझ्यावर
जगणं माझ्या नावे करून टाकण्याची भाषा होती
आता वेळ आली तर हे असं?
(कानामागे केसांची बट सारत ती म्हणाली)
ती: होय. असंच.
अवस्था होती रे ती फ़क्त, जगता जगता आलेली,
जगता जगता संपलेली.... एक अवस्था
तो: माहिती आहे मला, परिस्थीती नावाचा विचित्र
प्रकार असतो, त्याला जिंकायचीच सवय असते
ती: मीही खूप काही शिकलेय आता. सोड ते.
तू आज इथे कसा, ते सांग.
तो: समजलं मला, तुझी आवरा- आवर सुरू झाली
आहे, म्हटलं यावं पाहून मला कुठे जागा देतेस ते!
ती: तुला खरंच जागा नाही कुठे. आठवणीही
पूसट झाल्या आहेत.
तो: मला त्या गडद करू देशील?
ती: कुठल्या हक्काने विचारू शकतोस
तो: तुझ्या क्षणांवर मी राज्य केलंय कधीकाळी,
त्याच्या जोरावर
ती: मी वेडी होते
तो: पण मनमुराद जगली होतीस, माझं गारुड
जगण्यावर घेऊन.
आज आलोय मी तुला हवी असलेली साथ द्यायला
ती: कुठली साथ?
जगताना रिकाम्या राहिलेल्या जागा भरायच्या?
मागे जाऊन? वेडेपणा आहे सारा
तो: असं पाहू नकोस!
(तिने नेटाने पेन उघडलं, लिहायला घेतलं, तो तसाच, तिथेच)
ती: काय हवं तरी काय तुला?
तो: तुझ्या मृत्यूपत्रात माझ्या नावे काही लिहीशील?
ती: मी सगळं सोडलंय इथेच... तुला वेगळं काय हवं.
बरं माग, तरीही माग, घे मागून. देईन मी!
तो: मी निघून गेल्यानंतर ज्या आठवणींवर जगलीस,
त्या आठवणी देशील?
ज्या क्षणी मनाने मला त्यागलंस तो क्षण देशील?
(तिच्या हातातलं पेन तसंच उघडं राहिलं,
हाताखालचा अर्धा लिहीलेला कागद कितीतरी वेळ फडफडत
राहिला........)
-बागेश्री
--/\--
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel