नीला सत्यनारायण यांचा आजच्या सकाळ मधला लेख अमेरिकेत "9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला,
त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे. दोन विमाने
वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर दुसऱ्या.मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, जवळच्याच विमानतळावर विमाने लॅंड करा आणि पुढील आदेशाची वाट पाहा.

"डेल्टा-15‘ या विमानालाही असाच संदेश आला. हे विमान कॅनडाहून येत होते. विमानाचा मार्ग बदलण्याचे कारण काय हे कुणालाच समजले नाही. वैमानिकही याबाबतीत अनभिज्ञ होता. कॅनडातील एका गावातील विमानतळावर विमान उतरले, तेव्हा प्रवाशांना कळाले, की अमेरिकेकडे जाणारी आणखी 52 विमाने तेथेच उतरली आहेत.

या सगळ्या विमानांतील प्रवाशांची संख्या दहा हजारांवर होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावात हा विमानतळ होता, त्या गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास होती. म्हणजे अक्षरशः गावाच्या लोकसंख्येएवढे पाहुणे तेथे आले होते.

वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत तीन दिवस लागले. तोपर्यंत या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी गावावर होती. गावातील प्रशासनाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सर्व शाळा बंद केल्या. जवळपासच्या घरांतून पलंग, खुर्च्या, जेवणाचे सामान प्रत्येक शाळेत पोचविले.

पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली. या सर्व व्यवस्थेचे संयोजन रेड क्रॉस सोसायटी करीत होती.

"डेल्टा-15‘मध्ये एक गर्भवती तरुणीही होती. तिची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. तीन दिवस गावातील लोकांनी पाहुण्यांना गावभर फिरविले. बोटीमधून त्यांच्या सहली काढल्या. एकूण काय, गावाने पाहुण्यांना एकटे वाटू दिले नाही. आल्या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता घेतली.

तीन दिवसांनंतर पुन्हा वैमानिकाला संदेश आला. त्याला अमेरिकेला परतायची परवानगी मिळाली होती. प्रवासी विमानात चढू लागले, तसे गावकऱ्यांना व प्रवाशांनाही रडू आवरेना. तीन दिवसांत त्यांच्यात एवढा स्नेह निर्माण झाला होता, की आता स्वगृही जायचे असूनही प्रवाशांचा पाय निघत नव्हता.

एवढ्या लोकांच्या आदरातिथ्याचा ताण पडला, तरी त्याचा त्रास गावकऱ्यांना वाटला नव्हता. गावकऱ्यांनी सर्व खर्च आपसांत वाटून घेतला. अशा कठीण प्रसंगात आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो अशी सर्वांची भावना होती.

विमानात गेल्यानंतर एका प्रवाशाने वैमानिकाला सांगितले, की "मी जे बोलणार आहे ते आपल्या नियमात बसत नाही. मला माझ्या सहप्रवाशांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. विशेष बाब म्हणून मला बोलण्याची परवानगी द्यावी.‘

सहसा वैमानिक अशी परवानगी देत नाहीत. परंतु तो प्रसंगच इतका हळवा होता, की वैमानिकालाही प्रवाशांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. ती परिस्थितीच अशी होती, की वैमानिकाने त्या प्रवाशाला बोलायला मनाई केली नाही.

प्रवासी म्हणाला, "या गावाने तीन दिवस आपली एवढी सेवा केली आणि आपल्याला एवढे सांभाळले, की मला वाटते आपण सर्वांनी त्यांचे कायम कृतज्ञ राहायला हवे. आपण सर्वांनी आपापल्या शक्तीनुसार काहीतरी पैशांची मदत माझ्याकडे द्यावी. मी एक निधी उभारणार आहे. त्यात हे पैसे टाकून या गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे माझ्या मनात आहे. मी जो ट्रस्ट उघडणार आहे त्याचे नाव 'डेल्टा-15‘ हेच ठेवणार आहे."

बघता बघता एकेक प्रवासी पुढे आला. ज्याने त्याने यथाशक्ती जमेल तेवढी रक्कम त्या प्रवाशाकडे सुपूर्द केली. सर्व प्रवाशांकडून आलेली रक्कम मोजली असता, थोडे थोडके नव्हे, तर तब्बल चौदा हजार डॉलर जमले होते. ज्याने हा प्रस्ताव मांडला होता, तो स्वतः अतिश्रीमंत उद्योजक होता. त्याने आपल्या पदरचे तेवढेच पैसे त्या गंगाजळीत घातले. नंतर त्याने वैमानिकाच्या मदतीने ज्या डेल्टा कंपनीचे विमान होते, त्या कंपनीलाही भरघोस निधी देण्याची विनंती केली. विमान कंपनीचे विमानही वाचले होते आणि त्यातील प्रवासी सुखरूप होते. त्यांना काही इजा झाली असती, तर कंपनीला मोठी भरपाई द्यावी लागली असती. विमान अमेरिकेला सुखरूप परतल्यावर कंपनीनेही त्या दानशूराच्या रकमेत भरीव
निधी घातला.

'डेल्टा 15‘ हा ट्रस्ट सुरू झाला, तेव्हा त्यांच्याकडे चक्क दीड कोटी डॉलर गोळा झाले होते.

दरवर्षी ट्रस्टच्या वार्षिक अहवालात किती मुले ट्रस्टच्या पैशातून शिकली हे प्रसिद्ध होत गेले. ज्या लोकांनी ट्रस्टसाठी पैसे दिले होते, त्यांना कॅनडाच्या त्या गावात काढलेले तीन दिवस आठवले. ट्रस्टसाठी आपण दिलेल्या पैशांचे चीज झाले, असे त्यांना वाटले व ते समाधान पावले. कॅनडामधील ते छोटेसे गाव आनंदाने हरखून गेले. ट्रस्टच्या पैशांच्या मदतीने त्या गावातील अनेक मुले विविध क्षेत्रांतील नामवंत म्हणून प्रसिद्ध झाली. अशी ही 'डेल्टा-15‘ची हृदयस्पर्शी कहाणी.

आपल्याकडे असा काही आणीबाणीचा प्रसंग आला, की आलेल्या पाहुण्यांना कसे लुटले जाते, त्यांचा गैरफायदा कसा घेतला जातो, त्यांच्यासाठी दिलेली मदत दुसरीकडे कशी वळवली जाते, याच्या कथा आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि मनोमन दुःखी होतो. मग तो दुष्काळ असो, प्रलय असो अथवा दुसरे कुठले अस्मानी संकट असो. आपली मनोवृत्ती मदत करण्यापेक्षा लुटण्याकडे आहे, असे वारंवार सिद्ध होते.

'डेल्टा-15‘ची ही कहाणी कदाचित आपल्या देशातही असेच देशप्रेम जागृत करेल एवढीच अपेक्षा आहे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel