- २ -

जेरिमियाच्या जीवनकथे भोवतालच्या सर्व कल्पनारम्य कथा आपण दूर करू या.  अर्वाचीन मानसशास्त्राच्या कठोर प्रकाशांत हें जीवन अभ्यासूं या.  या जीवनांतील भव्यता तोंडांत बोट घालायला लावते.  हा महात्मा आजहि जिवंत असता तर आमच्या काळाच्या हजारों वर्षे तो पुढें आहे असें म्हणावें लागलें असतें.  अत्याचार शांतपणें सहन करा असें तो सांगे.  त्याचा हा धीरोदात्त संदेश आजहि बधिर कानांवरच पडेल.  उपड्या घड्यावर पाणी ठरेल.  आजच्या या सुधारलेल्या विसाव्या शतकांतहि जेरिमियाची ती शिकवण झेंपणार नाहीं, पचणार नाहीं.  मग स्वत:च्या काळांत तो एक वेडा मनुष्य म्हणून ठरला यांत आश्चर्य तें काय ?  त्याच्या समकालिनांनीं त्याला वेडा म्हणूनच वागविलें.

खेड्यातील एका धर्मोपाध्यायाचा तो मुलगा होता.  बापाचा धंदा त्यानें पुढें चालवावा या हेतूनें त्याला धर्माचें शिक्षण देण्यांत आलें होतें.  लहानपणीं त्यानें देशभर पसरलेल्या ज्या धर्मोपदेशकांविषयीं पुष्कळसें ऐकले असेल ते ज्यू प्रेषित मोठे चमत्कारिक व जहाल मताचे असतात असें त्यानें ऐकलें.  भटाभिक्षुकांना त्या प्रेषितांचा उपयोग नसे.  ते प्रेषित म्हणजे भिकारडे जीव.  गिरिकंदरांत ते रहात ; कंदमुळें खात ; ते बहुतकरून गरिबींत जन्मलेले असत.  शेतकर्‍यांपैकीं असत.  कधीं कधीं ते गवतसुध्दां खात.  फुलें, मध यांवरहि जगत.  ईश्वराची इच्छा काय तें आम्हीच फक्त सांगूं शकूं असें लोकांना ते ओरडून ओरडून सांगत.  जेरिमियाचा पिता एक अहंकारी उपाध्याय होता.  त्याचे नांव हिल्किया.  त्या ज्यू प्रेषितांचें वरीलप्रमाणें चित्र त्यानें आपल्या मुलासमोर अनेकदां रंगविलें असेल.  सुशिक्षित पॅलेस्टाइन मनुष्य अशा भिकारड्या फकिरांना आपल्या घरीं कधीं बोलावील हें शक्य नव्हतें.  त्या ज्यू धर्मप्रेषितांचे विचार चमत्कारिक असत.  एवढेंच नव्हे, तर ते विचार ज्या भाषेंत व ज्या पध्दतीनें ते मांडीत, ती भाषा व ती पध्दतीहि मोठी चमत्कारिक असे.  त्यांची वागणूकहि विचित्र असे.  उदाहरणार्थ, इसैआ जेरुसलेमच्या रस्त्यांतून दिगंबर फिरे. 'या शहरानें जें अपरंपार पाप केलें आहे त्याचें प्रायश्चित्त म्हणून सर्व नगरवासियांना उघडें व्हावें लागेल ; त्यांच्या अंगावर चिंधीहि राहणार नाहीं.' हें पटविण्यासाठीं तो तसा नग्न होऊन हिंडे.  दुसरा एक प्रेषित, स्वत:ची भाकरी खाण्यापूर्वी तो ती अपवित्र करी, मलिन करी, व म्हणे ईश्वर या राष्ट्राला असेंच धुळीस मिळविणार आहे.  यामुळें हे असले विचित्र प्रेषित उपहासास्पद होत असत.  विशेषत: प्रतिष्ठित वर्ग तर या अवलियांची खूपच टिंगल करी.

परंतु जेरिमिया जसजसा वयानें मोठा होऊं लागला तसतशी त्याला नवीन दृष्टि आली.  वेड्याप्रमाणें दिसणार्‍या त्या ज्यू प्रेषितांकडे तो निराळ्या दृष्टीनें पाहूं लागला.  हे प्रेषित नेहमीं गरिबांची बाजू घेतात, छळकांची बाजू न घेतां छळल्या जाणार्‍यांची घेतात, ही गोष्ट जेरिमियाच्या ध्यानांत आली.  त्या प्रेषितांना न्यायाची तहान होती.  जगांत न्याय असावा म्हणून ते तडफडत असत.  त्यांचें धैर्य असामान्य असे.  राजाच्या राजवाड्यांत शिरून त्याच्या प्रत्यक्ष तोंडावर त्याच्या जुलमाविषयीं ते जळजळितपणें बोलत.  त्याची कानउघाडणी करीत.  भय त्यांना माहीत नसे.  मंदिरांतील पूजाविधींचें पोकळ अवडंबर त्यांना मुळींच खपत नसे.  या दिखाऊ अवडंबराविरुध्द त्यांचें बंड असे.  ईश्वराला तुमच्या पूजाअर्चांची, तुमच्या प्रार्थनांची व यज्ञांची जरूर नाहीं असें ते उद्धोषीत.  तुम्हीं न्यायानें वागावें व सर्वांवर प्रेम करावें, तुम्हीं दयाळू व मायाळू असावें, हीच ईश्वराची इच्छा आहे ; प्रभु एवढेंच तुमच्यापासून अपेक्षितो, असें ते सांगत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel