- ५ -

प्रथम भटांभिक्षुकांचें बंड त्यांनीं मोडलें.  ते विधी, ते यज्ञ, त्या नाना भ्रामक रूढी, सर्वांच्या मूळावर बुध्दांनीं घाव घातला.  मोक्षासाठीं, स्वत:चा उध्दार व्हावा यासाठीं या गोष्टींची कांही एक जरूरी नाहीं असें ते स्वच्छ सांगत.  देवांचे हे सेवक आधीं दूर करून नंतर त्यांनीं देवांनाहि दूर केलें.  देव नकोत व हे भटजीहि नकोत.  देव आहेत कीं नाहींत याविषयीं बुध्द कांहींच बोलत नसत.  होय वा नाहीं कांहींच ते सांगत नसत.  त्यांनीं त्या गोष्टीची जणूं उपेक्षा केली.  जर कोणीं देवदेवतांविषयीं त्यांना प्रश्न केला तर ते खांदा जरा उडवीत व म्हणत, ''या देवांचा प्रश्न मला महत्त्वाचा वाटत नाहीं.  मला जिवंत माणसांचा प्रश्न अधि महत्त्वाचा वाटतो.''

परंतु त्यांची एक चूक झाली.  स्वर्गातून देवांची हकालपट्टी त्यांनीं केली.  परंतु मानवांना, हिंदूंना त्यांनीं स्वर्गात भरलें.  प्रत्येक मानवप्राणी नाना जन्म घेत घेत शेवटीं स्वर्गात जातो असें ते मानीत. प्रथम त्या ॠषीमुनींच्या सांगण्याप्रमाणें या जन्ममरणाच्या फेर्‍यावर त्यांचा विश्वास होता.  अनेक जन्मांतून जीव जात असतो असें ते मानीत.  जीव नाना देहांतून जातां जातां शेवटीं मुक्त होतो असें ते सांगत.  मग जन्ममरण खुंटतें.  निर्वाण किंवा स्वर्गीय आनंद प्राप्त होतो.  आपल्या शिष्यांस स्वत:च्याहि अनेक जन्मांच्या कथा ते सांगत.  मी एक जन्मीं गोगलगाय होतों असें ते एकदां म्हणाले.

बुध्द जसजसे परिणतवयस्क होऊं लागले तसतसें हें जन्ममरणाच्या फेर्‍याचें त्यांचें तत्त्वज्ञान अधिकच काव्यमय होऊं लागलें.  पुढें पुढें बुध्द निराळ्याच रीतीनें बोलूं लागले.  प्रत्येक जीव स्वत: अनेक जन्मांतून जातो असें ते आतां सांगत नसत.  ते आतां म्हणत, ''प्रत्येक जीव म्हणजे एक पेटती मशाल आहे.  दुसर्‍या मशालीस ती जाऊन मिळते.  आणि याप्रमाणें प्रत्येक जीवाची ज्योत अमृतत्वाच्या विश्वव्यापक ज्योतींत विलीन होते.  किंवा घंटांची उपमा वापरली तर असें म्हणतां येईल, कीं प्रत्येक जीवाचें जीवन म्हणजे उघड्या खोलींतील घंटेचा नाद आहे.  कालसोपानावरील सर्व जीवांच्या जीवन-घंटांतून नाद निघण्यास हा व्यक्तिगत जीवन-घंटेचा नादहि कारणीभूत होत असतो आणि शेवटीं हा नाद स्वर्गाच्या विश्वव्यापक संगीतांत विलीन होतो.

या मताभोंवतालचें काव्य दूर केलें म्हणजे शेवटीं मथितार्थ इतकाच उरतो, कीं प्रत्येक जीवनाचे फार दूरवर पोंचणारे परिणाम होत असतात आणि प्रत्येक मानवप्राणी हा मानवजातीचा एक महत्त्वाचा घटक आहे.

वैयक्तिक अमृतत्वावर बुध्दांचा विश्वास नव्हता.  त्यांना त्याची पर्वाहि नव्हती.  प्रत्येक मानवी जीव, प्रत्येक मानवात्मा विश्वात्म्याचा भाग आहे,  जगदात्म्याचा अंश आहे.  वैयक्तिक अमृतत्वाची इच्छा करणें म्हणजे सर्वांचा प्रश्नादूर सोडून केवळ स्वत:पुरतें पाहणें होय, अंशीला दूर झुगारून अंशानें आपल्यापुरतें पहाणें होय.  बुध्द शिष्यांना सांगत, ''जगांतील सारें दु:ख आपल्या स्वार्थी महत्त्वाकांक्षांमुळें आहे.  मग या स्वार्थी महत्त्वाकांक्षा ऐहिक असोत वा पारलौकिक असोत.''

परंतु जो मानवजातीच्या विशाल व महान् आत्म्यासाठीं स्वत:चा क्षुद्र आत्मा दूर करतो, स्वत:चा आत्मा मानवजातीच्या सेवेंत जो रमवतो, तो जन्ममरणाच्या फेर्‍यांतून मुक्त व्हायला पात्र असतो.  चिरशांतीच्या निर्वाणाप्रत तो जातो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel