सर्वोच्च अशी जी जीवनाची कला तींत अस्पाशिया पारंगत होती.

परंतु दुर्दैव, की धार्मिक बाबतींत ती स्वतंत्र मताची होती.  अनॅक्झेगोरसचीं अज्ञेयवादी मतेंच तिनेंहि स्वीकारलीं होती.  पेरिक्लिसच्या शत्रूंना प्रेमाच्या बाबतींत ती बंधनातीत आहे, प्रेमाच्या बाबतींत तिचे स्वतंत्र विचार आहेत.  याचें कांही वाटलें नाहीं.  परंतु देवांवर अविश्वास दाखविणें हें फार वाईट असें त्यांना वाटलें.  अथेन्समध्यें अशा अपराधाला मरणाची शिक्षा असे.  अस्पाशिया गिरफदार केली गेली.  तिच्या बचावाचें काम स्वत: पेरिक्लिसनें आपल्या शिरावर घेतलें.  न्यायाधीशांसमोर भाषण करतां करतां तो भावनाविव्हल होऊन रडूं लागला.  त्या निर्मळ व उत्कट अश्रूंनीं न्यायाधीशांवर परिणाम झाला.  अस्पाशिया मुक्त केली गेली.

अस्पाशियाचा खटला ज्यूरीसमोर चालला होता.  ही ज्यूरी-पध्दती पेरिक्लिसनेंच सुरू केली होती.  लोकशाहीच्या विकासांतील ती एक नवीन गोष्ट होती.  पूर्वी वरिष्ठ वर्गांतील न्यायाधीशांचें एरिओपागस नांवाचें न्यायमंदिर असे.  परंतु त्यांची सत्ता काढून घेऊन लोकनियुक्त न्यायाधीशांच्या ज्यूरीकडे ती सत्ता देण्यांत आली.  हें जें लोकनियुक्त न्यायमंदिर त्याला दिकास्टेरीस या नांवानें संबोधण्यांत येत असे.  ही लोकशाही ज्यूरीची पध्दत पेरिक्लिसनें सुरू केलेली नसून ती सोलाननें सुरू केली असें कांहींचें म्हणणें आहे.  परंतु या सर्व ज्यूरर्सना सरकारी तिजोरींतून पगार मिळावा असा कायदा पेरिक्लिसनेंच केला.  या बाबतींत मात्र सर्व इतिहासकारांचें एकमत आहे.  म्हणून पेरिक्लिसलाच ज्यूरी-पध्दतीचा पिता असें मानण्यांत येतें.

आजकालच्या आपल्या ज्यूरीपेक्षां अथीनियन ज्यूरी निराळ्या प्रकारची होती.  ज्यूरींतील सभासद चिठ्ठया टाकून निवडण्यांत येत.  परंतु खटला चालविण्यासाठीं बाराच ज्यूरर्स नसत, तर शेंकडों असत.  एकाद्या महत्त्वाच्या खटल्याच्या वेळेस कधीं कधीं एक हजारपर्यंत ज्यूरर्स बसत.  ज्यूरर्स जास्त नेमण्यांत लांचलुचपतीच्या प्रकारास आळा बसावा असा हेतु असे.  शेकडों ज्यूरर्स असले म्हणजे किती जणांत लांचलुचपत देणार ?

अथीनियन ज्यूरी-पध्दतींतील गुणदोष कांहींहि असोत, तीमुळें पेरिक्लिसला ज्यूरर्सच्या भावना उचंबळवून अस्पाशियाला वाचवतां आलें हें खरें.  ज्यूरर्सच्या मनोवृत्ती त्यानें आपल्या वक्तृत्वानें व अश्रुंनीं विरघळविल्या.  तुरुंगापासून व मृत्यूपासून अस्पाशिया सुटली.  पूर्वीचें ते प्रतिष्ठित वर्गातील भावनाशून्य न्यायाधीश तेथें असते तर पेरिक्लिसला आपल्या प्रियकरणीचे प्राण वांचविणें कठिण गेलें असतें.  पेरिक्लिसनें जें नवीन न्यायदानयंत्र निर्माण केलें, त्याच्यायोगानें अस्पाशियाचे प्राण वांचावें यांत एक प्रकारें काव्यमय न्याय आहे.  त्या मिळालेल्या न्यायांत जणूं नवरसांचें मिश्रण आहे !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel