ही ध्येयभूत वस्तु कोणीं, कधीं, केव्हां निर्मिली ? एवंविध कांही प्रश्नांना प्लेटोजवळ उत्तर नाहीं.  येथें प्लेटो निरुत्तर आहे.  कांहीं प्रश्नांना तो गुळमुळीत व संदिग्ध अशीं उत्तरें देतो.  परंतु तीं उत्तरें म्हणजे खात्री न पटविणारीं अशीं गूढगुंजनें आहेत.  अज्ञानाच्या अनंतर सिंधूंत तो फारच पुढें जातो.  स्वत:स न झेंपणार्‍या खोल पाण्यांत तो शिरतो.  त्याच्या पाठोपाठ जाण्यांत अर्थ नाहीं ; आपण बुडूं.  जगांतील सर्वांत थोर व बुध्दिमान् अ‍ॅरिस्टॉटल, तत्त्वज्ञान्यांचा व बुध्दिमंतांचा तो अनभिषिक्त सम्राट्, त्यालाहि कधीं कधीं प्लेटोच्या त्या गूढगुंजनांचे आकलन होत नसे.

ईश्वराविषयींच्या कल्पनांचे जाळें विणणें जेव्हां प्लेटो थांबवितो, ईश्वराविषयींचे सिध्दान्त मांडीत बसणें बंद करतो व स्वत:च्या मनांतील विचार बोलूं लागतो, तेव्हां जगांतील परम थोर आचार्य म्हणून तो यथार्थपणें शोभतो.  प्लेटो कधीं जुना वाटत नाहीं.  तो चिरंजीवपणे अर्वाचीन आहे.  तो नित्य नवीन आहे.  कोणत्याहि युगांत तो नवीनच वाटेल.  त्याचीं राजकीय व सामाजिक मतें त्याच्या काळाच्या फार पुढें होती; एवढेंच नव्हे, तर आजच्या काळाच्याहि फार पुढें गेलेलीं आहेत असें म्हणावें लागेल.  तो विसाव्या शतकांतील विचारांच्याहि पुढें गेलेला आहे.  आजचा असा एकहि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नाहीं कीं, जो प्लेटोनें चर्चिला नाही.  मानवी नाटकाचें सर्वांगीण व सर्वकष असें निरिक्षण, परीक्षण, त्यानें केलें आहे.  मानवाचें विश्वबंधुत्व, सुप्रजाजनन-शास्त्र, संतातिनियमन, सामुदायिक पत्नीत्व, कुटुंबपध्दतीचा अस्त, मुलांची स्टेटकडे मालकी, स्त्रीपुरुषांची समानता, खाजगी मालमत्तेचा अस्त, अनिर्बंध मोकळें प्रेम, ग्रंथनियंत्रण, दारुबंदी, इत्यादि शेंकडो प्रश्नांवर प्लेटोनें प्रकाश पाडला आहे.  त्या संवादांतून अशा अनेक समस्यांवर त्यानें चर्चा केली ; परंतु या ज्या चर्चा त्यानें केल्या, त्यांचा हेतु काय ? प्लेटोसमोर एकच ध्येय होतें, एकच उद्दिष्ट होतें.  पृथ्वीवर न्यायाची प्रस्थापना व्हावी हाच एक ध्यास त्याला लागलेला आहे.  अंतर्बाह्य न्याय-राज्यसंस्थेंत न्याय, व्यक्तिच्या अंतरंगांत न्याय.  त्याला अशा प्रकारची शासनव्यवस्था हवी होती, असें जग हवें होतें कीं, जेथें सॉक्रे़टिसासारख्यांचा वध न होतां त्यांना राजा म्हणून सिंहासनावर बसवितां आलें असतें.

- ४ -

प्लेटोच्या त्या अमर ग्रंथांचें नांव 'रिपब्लिक' असें आहे.  या रिपब्लिकमध्यें प्लेटोनें आपलें ते आदर्श जगत् मांडलें आहे.  प्लेटोच्या रिपब्लिकची आपणांस नीट कल्पना येण्यासाठीं आपण त्या रिपब्लिकमधील नागरिकांच्या जीवनाकडे पाहूं या.  जन्मल्यापासून मरेपर्यंत ते आपलें जीवन कसें कंठितात तें पाहूं या.

त्या रिपब्लिकमधील मुलें म्हणजे सामाजिक सामुदायिक संभोगाची फळें आहेत.  उत्कृष्ट संतति जन्मावी म्हणून उत्कृष्ट पुरुषांचा उत्कृष्ट स्त्रियांशीं संयोग घडवून आणावयाचा.  पुरुषांची या स्त्रियांवर जणूं सामुदायिक मालकी ! वैयक्तिक विवाह नाहींत, खासगी कुटुंबें नाहींत ! मुलें जन्मतांच शासनसंस्थेनें तीं ताब्यांत घ्यावयाचीं ; आईबापांपासून घेऊन त्यांना सरकारी बालसंगोपनगृहांत नेऊन ठेवायचें.  आईबापांना मुलें आणि मुलांना आईबाप ओळखतां येत नाहींत असें होईल तरच मानवी विश्वबंधुत्व कल्पनेंत न राहतां प्रत्यक्षांत येणें शक्य होईल ; कारण अशा साम्यवादी शासनसंस्थेंत प्रत्येक जण खरोखरच दुसर्‍याचा भाऊ होणें शक्य होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel