- ४ -

एपिक्युरसच्या योजनेंत देवांचें स्थान काय हें मात्र नीट समजत नाहीं.  त्यांना मानवांचे महत्त्व वाटत नाहीं,  मानवांना त्यांचे वाटत नाहीं.  एपिक्युरसला धर्म म्हणजे एक क्षुद्र, नजीवी, अर्थहीन वस्तु वाटत असे.  तरीहि तो अनेक देवदेवतांवरचा विश्वास सोडावयास तयार नव्हता.  अर्थातच हे देवहि नाशवंत अणू आहेत व त्यानें देवांनाहि शून्याच्या किनार्‍यावरील सुखी लोकांच्या बेटावर हद्दपार करून टाकलेलें आहे हें खरें, पण त्यांना बेटाच्या कडेला ओढून विस्मृतीच्या समुद्रांत कायमचें लोटून देण्याचें धैर्य मात्र त्याला झालें नाहीं.

एपिक्युरसच्या विश्वांत या देवदेवतांचें अस्तित्व असलें तरी त्यांना या सृष्टीशीं कांही एक कर्तव्य नाहीं.  त्यांना या आपल्या मर्त्य जगांतील घडामोडींचें सोहेर, सुतक, कांहींहि नाहीं ! हें जीवन म्हणजे एक मूर्खाचा बाजार आहे.  दैवी मेंदूंतून असल्या जगाची कल्पना निघणें शक्य नाहीं. कोणताहि देव स्वत:च्या पूजेसाठीं मन्दिर बांधावयाला सांगून तें आपल्याच विजेच्या गोळ्यानें भस्म करणार नाहीं.  देव असा कसा असूं शकेल ?  दयाळू देव एकाद्या मुलाला आजारांतून बरा करून पुन: लढाईंत मरावयाला पाठवील हें कसें शक्य आहे ?  एपिक्युरसच्या मतें या अकस्मात् उत्पन्न झालेल्या जगांत देव व मानव दोघेहि भयभीतपणें वावरत असतात.  हें जग देवांनीं निर्मिलें नाहीं.  मानवांनींहि निर्मिलें नाहीं, दोघेहि या जगांत अपरिचित पाहुणे आहेत.  त्यांना सदैव धास्ती वाटते.  देवांना स्वत:चीच काळजी वाहावी लागते, चिंता लागलेली असते.  माणसांनीं देवांच्या नांवानें हांका मारण्यांत काय अर्थ ?  जगांत चाललेल्या झगड्यांमध्यें देवहि माणसांप्रमाणेंच निराधार आहेत.

हें जग दुसर्‍या कोणीं निर्मिलेलें नसून अणूंच्या आकस्मिक संघातांतून आपोआप बनलेलें आहे.  तें स्वयंभू आहे.  पण मग अणूंच्या संघातांतून बनलेल्या या जगांत फळे-फुले, पशु-पक्षी, देव-मानवे, इ. विविध प्रकार कसे झाले ? या अणूंतून कोणत्या प्रक्रियेनें व बनावानें डेमॉक्रिटससारखे शास्त्रज्ञ व एपिक्युरससारखे तत्वज्ञ जन्मले ?  एपिक्युरस म्हणतो, ''प्रसंगानें, नाना चुका होत होत, नाना प्रक्रिया होत होत, हें सर्व झाले.'' हे अणू उत्तरोत्तर अधिकाधिक शुध्दतेकडे जात असतात— त्यांचा उत्तरोत्तर विकास होत असतो.  ओबडधोबड आकारांतून सुंदर आकारांकडे वस्तू जात असून जें अयोग्य आहे तें दूर, नष्ट होत असतें, गळून जात असतें व योग्य असेल तें कायम होत असतें.  थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे या निरनिराळ्या वस्तू उत्क्रांतीच्या योगानें बनत आल्या आहेत.  डार्विनपूर्वी बावीसशें वर्षे इतक्या प्राचीन काळीं एपिक्युरसनें उत्क्रांतीचें तत्त्व मांडलें आहे.

- ५ -

एपिक्युरियन मीमांसेनुसार मनुष्य कसा जन्मला, निरनिराळ्या योनी कशा जन्मल्या याचें मोठें सुंदर वर्णन ल्युक्रेशियसनें दिलें आहे.  अनंत काळापासून फिरणार्‍या अणूंपरमाणूंतून पुष्कळशा घटना व विघटना होत होत शेवटीं त्यांतून एके दिवशीं हें आपलें जग निर्माण झालें.  आरंभी या पृथ्वीवर जीव नव्हते.  ती म्हणजे एक नुसता मातीचा गोळा होती.  पण हळूहळू त्या गोळ्यांतून हिरवें गवत वर आलें व त्याचा विकास होत होत त्यांतूनच एक दिवस झुडपें व फुलें दिसूं लागली.  पशूंच्या अंगावर केस येतात किंवा पक्ष्यांना पिसें फुटतात, त्याप्रमाणें वृक्षांना व वनस्पतींना फुलें आलीं.  नंतर जीव उत्पन्न झाले, पक्षी उडूं लागले, आकाशांत गाऊं लागले, पशू जमिनीवर हिंडूं-फिरूं लागले, जंगलांतून गर्जना करूं लागले, पशुपक्ष्यांच्या कांहीं विशिष्ट जाती त्या त्या वातावरणास अनुकूल होत्या म्हणून त्या तेथें तेथें जगल्या व वाढल्या.  या जातींच्या ठायीं धैर्य व धूर्तताहि असल्यामुळें त्या वांढल्या.  कांही जाती दुबळ्या होत्या, कांहींना कमी दिसे, कांहींना ऐकूं येत नसे, कांहींना हलण्या-चालण्याचीं साधनें नव्हती, त्या नष्ट झाल्या.  निसर्गाच्या लहरींतून हे दुबळे प्रकार जन्मास आले व नष्ट झाले.  हेतुहीन, योजनाहीन अशा या जगांतील अंधळ्या प्रयोगाचे ते बळी होते व नष्ट होणें हेंच त्यांचें भवितव्य होतें.  विनाशच त्यांच्या नशिबीं होता.  मानवप्राणी हा या मनोरंजक नाटकातला बलवान् प्राणी होय.  तो या योजनाहीन नाटकांत शेवटीं येऊन उभा राहिला.  तो काटक होता, रानटी होता, उघडा-बोडका होता, इतर प्राण्यांप्रमाणेंच तोहि या भूतलावर भटकत होता, पाला, कंदमुळें कवचीचीं फळें यांवरच जगत होता व रात्रीं उघड्यावरच निजत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel