दरम्यान स्पेनमध्यें पाँपेच्या इनायस व सेक्स्टस नामक दोघां मुलांनीं रोमविरुध्द म्हणजेच सीझरविरुध्द बंड केलें व तें दिवसेंदिवस वाढणार असे दिसू लागलें.  उपेक्षा करून चालण्यासारखें नव्हतें म्हणून सिझरला पुन: एकदां सैन्याचें आधिपत्य घेणें भाग पडलें.  त्यानें स्पेनमधील पुंडावा मोडला व पाँपेच्या दोन्ही मुलांना ठार केले.  सीझरनें रोमला परत येतांच आमरण हुकुमशाही जाहीर केली.

त्यानें या प्रसंगीं अत्यंत भयंकर चूक केली.  पाँपेच्या मुलांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ होणार्‍या सार्वजनिक उत्सवांत तो स्वत:चा सत्कार करून घेणार होता.  त्याचा हा अहंकार अक्षम्य होता.  क्षुद्रतेचें तें प्रदर्शन असह्य होतें.  रोमन लोकांनीं आतांपर्यंत खूप सहन केलें.  पण आपसांतील यादवीमुळें झालेल्या रोमनांच्याच कत्तलीप्रीत्यर्थ होणारा सत्कार-समारंभ त्यांना असह्य वाटला.  आपल्याच बांधवांचें रक्त सांडल्याबद्दल व शिरकाण केल्याबद्दल ऐट मारणें हें त्यांच्या मतें माणुसकीला काळिमा फांसणारें होतें.

देव कधीं चुकत नाहीं या विश्वासानें सीझर सत्कार-समारम्भाची योजना पुरी करण्याच्या खटाटोपास लागला.  ख्रि.पू. ४४ सालच्या मार्चच्या पंधराव्या तारखेस तो सीनेट-हाउसमध्यें आला तेव्हां तो अत्यंत आनंदी दिसत होता.  कारण, रोमबाहेरील सर्व रोमन प्रांतांचा रोमन सम्राट् म्हणून त्याची नेमणूक त्या दिवशीं सीनेटरांकडून होणार होती.  त्यानंतर खुद्द रोमचा सम्राट् म्हणून त्याच्या नांवानें द्वाही फिरण्यास कितीसा अवकाश होता ? पण ....!

हातांत मुकुट घेऊन सीनेटर आपल्या स्वागतार्थ पुढें येतील अशा आशनें सीनेट-हाऊसमध्यें पाऊल टाकणार्‍या सीझरला मुकुट-प्रदानाऐवजीं खंजिरांच्या तेवीस प्रहारांची सलामी मिळाली !

सीझरवर प्राणान्तिक प्रहार करणार्‍यांत त्याचे पुष्कळ जिव्हाळ्याचे स्नेहीहि होते.  त्यांतील एक प्रमुख कटवाला ब्रूटस हा आपला अनौरस पुत्र आहे असें सीझरला वाटण्यास भरपूर पुरावा होता.

- ७ -

इतिहासाच्या ग्रंथांमध्यें सीझरचें वर्णन 'एक थोर व मोठा मुत्सद्दी' असें करण्यांत येत असतें.  पण इतिहासकारांनीं वाहिलेल्या स्तुतिसुमनांजली दूर करून सीझरचें खरें स्वरूप पाहिल्यास काय दिसेल ? तो पक्का गुंड व खुनी, बुध्दिमान् खुनी होता.  तो प्रचंड प्रमाणावर कत्तली करण्याच्या योजना आंखणारा कर्दनकाळ होता.  तो वेडा पीर होता.  त्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठीं एकट्या रोम शहराला एक लक्ष साठ हजार लोकांना मुकावें लागलें !

त्याचें जीवन म्हणजे रोमन लोकांना खरोखर शापच होता.  पण तो मेला तरीहि रोमन लोकांना हायसें वाटलें नाहीं.  सीझरचा खून होतांच त्याची जागा बळकावण्यासाठीं अनेक गुंड पुढें आहे.  रोमची मालकी मिळविण्यासाठीं आपल्याच बांधवांच्या कत्तली करीत राहणें हा पुष्कळ प्रमुख रोमन पुढार्‍यांचा अनेक वर्षेपर्यंत एकच धंदा होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel