प्रकरण २ रें
संन्यासी पीटर : अमीन्सचा माथेफिरू भिक्षु
- १ -

रोमन चर्चची संघटना मानवजातीला अशीर्वादरूप व्हावी म्हणून करण्यांत आलेली होती.  शांतीच्या निशाणाखालीं सार्‍या जगाचें एकीकरण करण्याचा तो ऐतिहासिक कालांतील पहिला प्रयत्न होता.  चर्चचे पहिले पहिले कांहीं पाद्री व धर्मोपदेशक खरोखरच देवाचे लोक होते.  नम्रता, सहिष्णुता, नि:स्वार्थ व जनसेवा या गोष्टी त्यांच्या जीवनांत भरलेल्या दिसत.  ते गॅलिलीच्या थोर दैवी धर्म-संस्थापकाचे सच्चे अनुयायी भासत.  या अनेक शतकांच्या इतिहासांत कॅथॉलिक चर्चनें कित्येकदां तरी अन्यायविरुध्द न्यायाची बाजू घेतलेली आहे, द्वेष सोडून शांतीची घोषणा केली आहे व युध्दांतील विनाशाऐवजीं सौंदर्यनिर्मितीवर भर दिला आहे.

पण चर्चचे वरचे पदाधिकारी मात्र नेहमींच हृदयांतील देवाचा आवाज ऐकत नसत.  त्यांचे दुसरे धंदे असत.  बिशप व पोप पुष्कळदां क्षुद्र राजकारणांत रंगून जात.  पृथ्वीवर न्यायाचें राज्य करण्याऐवजीं आपले खिसे सोन्यानें कसे भरतील येवढेंच ते पाहत.  त्यांच्या हातीं चर्च हें दुसर्‍यांना अमानुषपणें छळण्याचें, मारण्याचें व त्याच्यावर जुलूम करण्याचें साधन मात्र झालें.  शार्लमननंतरच्या पांचशें वर्षांचा इतिहास हा मानवजातीच्या इतिहासांतला अत्यंत किळसवाणा व लज्जास्पद भाग होंय.  या काळांत चर्चमध्यें सतत स्पर्धा व मत्सरच दिसतात, धर्मवेडेपणास ऊत आलेला दिसतो आणि कत्तली, लुटालुटी व ख्रिश्चन आणि मुसलमान यांतील धर्मयुध्दें यांचा सुळसुळाट झालेला दिसतो.  या पांच शतकांचा इतिहास निरनिराळ्या इतिहासकारांनीं निरनिराळ्या दृष्टींनीं लिहिलेला आहे.  अनेकांनीं त्याची ओढाताण केली आहे.  या विद्रूप व भेसून काळाच्या इतिहासावरील रक्ताचे डाग, त्याच्याभोंवतीं दिव्य तेजावलयें निर्मून लपविण्याचे प्रयत्न कित्येकांनीं केले आहेत.  वेल्स सुध्दां आपल्या 'जगाच्या इतिहासाची रूपरेषा' या ग्रंथांत मध्ययुगासमोर जणूं भक्तिभावानें गुडघें टेंकतांना आढळतो.  तो म्हणतो, ''ख्रिश्चन चर्चनें पवित्र युध्दांच्या नांवानें लोकांतील उत्कट भावनांचें संघटित एकीकरण केलें, ही फारच मोठी गोष्ट होती.  हें काम महत्त्वाचें व फारच चांगलें होतें.  ही 'पवित्र युध्दां' ची चळवळ पेटविणारा पीटर नामक ख्रिश्चन यति होता !  तो रक्तपिपासु कोल्हा असूनहि वेल्सला जणूं हिब्र्‍यू प्रेषितच वाटतो !  तीं धर्मयुध्दें वाचून, त्या हकीकती ऐकून वेल्स नाचूं लागतो, उत्साहानें वेडावून जातो व लिहितो, 'या काळाचा इतिहास मोठा आकर्षक आहे.  लेखणीवर बसून या इतिहास-क्षेत्रांत खूप रमावेंसें वाटतें.  युरोपजवळ कांहीं ध्येय आहे असें या काळांतच आपणांस प्रथम आढळतें.  युरोपला आत्मा आहे, ही गोष्ट या काळांतच प्रथम दिसून येते.''

वेल्सला जें 'ध्येय' व जो 'आत्मा' या काळांत दिसल्याचा भास झाला त्याची वास्तविक किंमत काय आहे हें पाहूं या.  या काळाचें बिनचूक चित्र मी थोडक्यांत देतों.  या मारामार्‍यांचें सविस्तर वर्णन कंटाळवाणें होईल.  मी तर या गोष्टींकडे गंभीरपणें पाहूंच शकत नाहीं.  पण जरा फेरफटका मारून येऊं या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel